Home »Magazine »Rasik» Maharashtra Draught And Politics

दुष्काळाच्या राजकीय झळा

समर खडस | Feb 10, 2013, 03:00 AM IST

  • दुष्काळाच्या राजकीय झळा

गेल्या काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील दोन नेत्यांनी महत्त्वाची राजकीय विधाने केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत म्हणाले की, राष्ट्रवादीचे जे नेते 15 वर्षे मंत्रिपदावर आहेत, त्यांनी आता दिल्लीत यायला हवे. दुसरे विधान, शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे होते. ‘सामना’ या मुखपत्रात दिलेल्या मुलाखतीत ‘मनसे’बरोबर राजकीय मैत्री होऊ शकते का, या प्रश्नावर ते म्हणाले की, टाळी एका हाताने वाजत नाही, ‘मनसे’च्या अध्यक्षांना बरोबर बसवा व हा प्रश्न विचारा. या दोन्ही विधानांनी त्या त्या पक्षांमध्ये व अनुषंगाने महाराष्ट्राच्या राजकारणात होऊ घातलेल्या नव्या बदलांची चर्चा सुरू झाली आहे.

महाराष्ट्र दुष्काळाने अक्षरश: करपतो आहे. या दुष्काळाची व्याप्ती 72च्या दुष्काळापेक्षाही भयावह आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील सरकार व विरोधी पक्ष दोघेही याकडे फारसे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. किंबहुना, या अस्मानी संकटाचे राजकारण कसे करायचे, याचेच गणित दोन्ही बाजूंनी मांडले जाताना दिसते आहे. दुष्काळाचा आणि वरील दोन मोठ्या नेत्यांच्या विधानाचा परस्पर संबंध काय, असा प्रश्न साहजिकच कुणालाही पडेल. नेमका हाच परस्परसंबंध लावल्यास आपल्याला पुढे होऊ घातलेल्या राजकीय धुमश्चक्री व त्यातून सामान्य जनांना भोगाव्या लागणा-या यातनांची कल्पना येऊ शकते.

महाराष्ट्रात सुमारे 7,064 गावांची पैसेवारी 50 पैशांपेक्षाही कमी आलेली आहे. त्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे मराठवाड्यातील आहेत. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद या चार जिल्ह्यांत तर दुष्काळाने पार त्राही त्राही माजवली आहे. जनावरांचा चारा सोडाच, जालन्यासारख्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिन्यातून एकदा पाणी मिळते आहे. म्हणजे, जिल्ह्यातील ग्रामीण ठिकाणी काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. जायकवाडी, बिंदुसरा, मांजरा सर्व महत्त्वाची धरणे कोरडीठाक पडलेली आहेत.

खरे तर पाऊस कमी पडल्याने पर्जन्यछायेच्या प्रदेशात जोरदार दुष्काळ पडणार, हे सरकारदरबारी माहीत होते. म्हणूनच त्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे होते; परंतु सध्याचे नेतृत्व हे स्वच्छ कारभाराच्या प्रेमात पडले आहे. कारभार स्वच्छ करायचा असल्याने धोरणे व उपाय राबवणे कठीण होऊन बसले आहे. कारण कोणतेही धोरण राबवल्यास त्यात केजरीवाल यांच्या ‘क्रांतिकारी’ टीमपासून ते किरीट सोमय्यांसारख्या ‘दक्ष’ नेत्यांपर्यंत अनेकांच्या टीका सहन कराव्या लागतात, असा समज झाला आहे. 72च्या दुष्काळात स्वर्गीय वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रातील जनतेला रोजगार हमी योजनेसारखे धोरण राबवून केवळ जगवले नाही, तर स्वाभिमानाने जगवले होते. एकेकाळी ज्या राज्याचे नेते दुष्काळग्रस्तांच्या व्यथा-वेदना समजून घेत होते, त्याच महाराष्ट्रातील नेते आता दुष्काळापेक्षा वर्ष-सव्वा वर्षात सामोरे जाव्या लागणा-या निवडणुकीच्या दृष्टीने पुढील राजकारण करण्यात कमालीची धडाडी दाखवत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना तळहातावरील रेषांप्रमाणे महाराष्ट्राचा कानाकोपरा माहीत आहे. या दुष्काळाची व्याप्ती व त्यातून संभवणारे परिणाम माहीत असणारे त्यांच्यासारखे दुसरे नेतृत्व सध्या तरी महाराष्ट्रात नाही. त्यांनी राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करून पाहिला. मात्र, त्याचा फारसा परिणाम न दिसल्यामुळे तेही नाराज झाले असावेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा त्या त्या ठिकाणच्या ‘पॉवरफुल’ माणसांचा पक्ष आहे. काँग्रेसच्या विरोधात महाराष्ट्रात इतक्या सक्षमपणे उभा राहिलेला हा इतिहासातील पहिलाच पक्ष आहे. सध्या दुष्काळग्रस्त भागाचा बारकाईने अभ्यास केला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की, दुष्काळ असलेल्या प्रदेशातील प्रतिनिधित्व बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीचेच नेते करत आहेत. कदाचित यामुळेच काँग्रेससह विरोधी पक्ष यावर सकारात्मक विचार करून मात कशी करावी, याचे धोरण आखण्यापेक्षा त्याचे राजकारण कसे करावे, याच विवंचनेत दिसत आहेत. दुष्काळग्रस्त भागाचा हेलिकॉप्टरद्वारे दौरा सुरू केलेल्या शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जालन्याच्या पहिल्याच सभेत त्यामुळे मराठवाड्यातील मंत्र्यांचे राजीनामे मागितले. खरे तर दुष्काळावर मात करण्याची प्रमुख जबाबदारी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आहे. मात्र, उद्धव यांनी त्यांचा राजीनामा मागितला नाही. तसा तो ते मागणारही नाहीत; कारण पृथ्वीराज चव्हाण यांनी कारभार स्वीकारल्यापासून शिवसेना व त्यांच्यातील मधुर संबंध उत्तरोत्तर अधिकच दृढ झाले आहेत.

बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेचे काय होणार, हा सवाल जो तो विचारू लागला आहे. या पार्श्वभूमीवर खरे तर उद्धव
यांना दुष्काळाच्या प्रश्नावर सकारात्मक आंदोलन पेटवून सरकारकडून अनेक कामे करवून घेता येऊ शकतात. मात्र, आपली स्पर्धा केवळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी असल्याचे त्यांनी ठरवून टाकल्यामुळेच ते दुष्काळाच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांवर धारदार हल्ला चढवण्यापेक्षा राज ठाकरे यांच्यासमोर नवनवे राजकीय पेच टाकण्यात अधिक खुश दिसत आहेत. शिवसेना-भाजप युतीत राज ठाकरे आले तर ते लिंबू-टिंबू पार्टनर म्हणूनच येणार. 288 जागांचे वाटप सेना-भाजपमध्ये 171-117 असे केले जाते. मनसे या युतीत आल्यास त्यांच्या वाट्याला 60 जागाही येणे मुश्कील. म्हणजे मनसेच्या रोपट्याचे बोन्साय करण्याचीच ही क्लृप्ती आहे. राज ठाकरे हे उद्धव ठाकरे व शिवसेनेच्या सर्व नेत्यांना अत्यंत जवळून ओळखतात. शिवसेनेची कार्यपद्धती, निर्णय घेण्याची पद्धत, राजकारणाचा घाट हे त्यांना व्यवस्थित माहीत आहे.

टाळी एका हाताने वाजत नाही, या उद्धव यांच्या वाक्याला प्रतिसाद कसाही दिला, तरी ते अडचणीत येऊ शकतात. त्यामुळे त्यांनी गप्प राहणेच पसंत केले आहे. मात्र, यामुळे शिवसेनेच्या खालच्या फळीत प्रचंड संभ्रम आहे. मनसे आल्यास कोणत्या जागा त्यांच्या वाट्याला जातील, याचा अंदाज कार्यकर्त्यांना नसल्याने कार्यकर्ते दुष्काळासारख्या प्रश्नाला भिडण्याऐवजी आपापल्या राजकीय भवितव्याची डागडुजी करण्यातच धन्यता मानत आहेत.

दुसरीकडे, अजित पवार यांचे राज्यभर दौरे सुरू आहेत. मंत्रिमंडळात पुन्हा आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर पंगा घेण्यापेक्षा पक्ष वाढवण्यावर भर दिला आहे. दुष्काळासारख्या प्रश्नातून मार्ग काढायचा असल्यास त्यांच्यासारखेच धडाडीचे नेतृत्व गरजेचे आहे. मात्र, सध्या अजित पवार यांना काँग्रेसपेक्षा स्वपक्षातीलच कट-कारस्थानांना तोंड द्यावे लागत आहे. पक्षाच्या मुख्यालयात बसून अनेक जण त्यांच्या कार्यपद्धतीविरोधात बिनधास्त टीका करत असतात. राष्ट्रवादीचे काही मंत्री, नेते तर अजित पवार हेच आपले भविष्यातील प्रमुख स्पर्धक असून त्यांना कसे नामोहरम करता येईल, याची आखणी करत आहेत. या सगळ्या कटकटीतून कायमचा मार्ग काढण्यासाठीच शरद पवार यांनी पक्षातील या नेत्यांना आता पुढली कारकीर्द दिल्लीत घडवा, असा टोला लगावला आहे. त्यातून तरी काही फरक पडला तर ठीकच म्हणायचे, असाच सर्व कारभार आहे.

एकूणच महाराष्ट्रातील दुष्काळी जनतेच्या वाट्याला राजकीय बेतालपणाचा तेरावा महिना आला आहे. मार्च महिन्यापासून उन्हाचे चटके वाढायला लागले की दुष्काळात होरपळणा-या जनतेने या शहाजोगांना फटके देऊन सरळ केले तर नशीब; नाही तर गावगाडा सुरूच राहतो, असे म्हणून गप्प बसायचे!
samarkhadas@gmail.com

Next Article

Recommended