आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गराज - राजगड

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गडांचा राजा व राजांचा गड असे ज्या किल्ल्याचे वर्णन केले जाते, तो किल्ला म्हणजे दुर्गराज राजगड. मराठा साम्राज्याची पहिली राजधानी म्हणून राजगड ओळखला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कालखंडात अनेक वर्षे राजगड स्वराज्याची राजधानी होती. राजगड हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यात मोडतो. राजगड हा एक बुलंद, बळकट व बेलाग असा किल्ला आहे. शिवाजीराजांनी त्याचा ताबा घेण्यापूर्वी या गडाला मुरुंबदेवाचा किल्ला म्हणून ओळखले जायचे. सातवाहनकाळात ब्रह्मर्षी ऋषींचे वास्तव्य या किल्ल्यावर होते. आजही किल्ल्यावर ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर दिसून येते. कालांतराने हा किल्ला आदिलशाही व निझामशाही राजवटींमुळे फिरत राहिला. त्या काळात राजगडचा बालेकिल्लाच मुख्य किल्ला म्हणून गणला जात होता. शिवाजी महाराजांनी त्याचा ताबा कधी घेतला, याचा लिखित उल्लेख कोणत्याही कागदपत्रांत सापडत नाही. सन 1646-1647च्या सुमारास तोरणासोबत राजांनी हाही किल्ला जिंकून घेतला होता. त्याचे नामकरण त्यांनी ‘राजगड’ असे केले.
मुरुंबदेवाच्या या डोंगराचे चार भाग पाडतात. त्यात संजीवनी, सुवेळा व पद्मावती या तीन माची व बालेकिल्ल्याचा समावेश होतो. त्यामुळे किल्ल्याचा विस्तार प्रचंड मोठा असल्याचे दिसून येते. राजगडावर पोहोचण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे, सिंहगड मार्गे पावे गावातून भोसलेवाडी या गावी येणे होय. पुण्यापासून राजगड 75 कि.मी. अंतरावर आहे. सिंहगड रस्त्याने सिंहगडच्या पायथ्याशी डोणजे या गावी पोहोचल्यावर वेल्हे गावात जाण्याकरिता उजवीकडे एक फाटा फुटतो. या ठिकाणावरून राजगड तीस कि.मी. अंतरावर आहे. या मार्गे बसने फक्त पावे गावापर्यंतच पोहोचता येते. तेथून पुढे कानद नदी पार करून राजगडाच्या पायथ्याशी जाता येते. राजगडचा मुख्य दरवाजा-पाली दरवाजा हा याच मार्गे सर करता येतो. पाली दरवाजाचा मार्ग पाली गावातून येतो. रस्त्यात निम्म्यापर्यंत पायवाट व निम्मा रस्ता पायर्‍यांनी बांधलेला आहे. दरवाजाचे पहिले प्रवेशद्वार हे भक्कम व मोठे आहे. त्यातून हत्तीसुद्धा आत येऊ शकतो. दुसरे प्रवेशद्वार बुरुजांवर बांधलेले व पहिल्यापेक्षा अधिक भक्कम आहे. या प्रवेशद्वाराद्वारे आपण पद्मावती माचीवर येऊन पोहोचतो. डाव्या बाजूला संजीवनी माचीकडे व उजव्या बाजूचा रस्ता सुवेळा माचीकडे जातो. प्रथम संजीवनी माची, नंतर सुवेळा माची, पद्मावती माची व बालेकिल्ला असा क्रम ठेवला तर एका दिवसात किल्ला पाहण्यास सोपे पडते. मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूने एक चिंचोळा रस्ता संजीवनी माचीच्या दिशेने जातो. या माचीची एकूण लांबी सुमारे अडीच किलोमीटर आहे. माचीवरून तोरणा किल्ला स्पष्ट दिसतो. तीन टप्प्यांमध्ये ही माची बांधली गेलेली आहे. अनेक राहत्या घरांचे अवशेष या माचीवर दिसून येतात. शिवाय तिच्या प्रत्येक टप्प्यावर चिलखती बुरुज बांधलेले आहेत. एकंदर 19 बुरुज या माचीवर बांधलेले आहेत. माचीच्या मध्यभागी उंच टेहळणी बुरूज उभारण्यात आलेला आहे. या बुरुजावरून व माचीच्या टोकावरून आजूबाजूचा प्रचंड परिसर न्याहाळता येतो. माचीवरून परत फिरताना उजव्या बाजूला भाटघर धरण दृष्टीस पडते. डोंगरांच्या रांगांत मोठ्या परिसरात भाटघर धरण पसरलेले आहे. संजीवनी माचीकडून सुवेळा माचीकडे जाण्याकरता बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने रस्ता आहे. हा रस्ता म्हणजे, एक पायवाटच असल्याने येथून हळू चालत जावे लागते. सुवेळा माचीही संजीवनी माचीइतकीच प्रशस्त व लांब आहे. तिची लांबी दोन किलोमीटर आहे. मुरुंबदेवाचा किल्ला हस्तगत केल्यावर शिवरायांनी प्रथम या माचीचे बांधकाम केले होते. संजीवनीपेक्षा सुवेळा माचीची रुंदी तुलनेने कमी आहे.
सुवेळा माचीलाही तीन टप्पे आहेत. शेवटपर्यंत तिची रुंदी कमी होत गेलेली आहे. या माचीवरून डावीकडे सिंहगड व समोरच्या बाजूला पुरंदर व वज्रगड पडतात. माचीच्या सुरुवातीला एक टेकडीसारखा भाग आहे. त्याला ‘डुबा’ असे म्हटले जाते. सुवेळा माचीवर मध्यभागी एक उंच खडक लागतो. या खडकावर 3 मीटर व्यासाचे छिद्र आढळून येते. त्यास हस्तीप्रस्तर म्हणतात. माचीवर हस्तीप्रस्तराच्या विरुद्ध बाजूला गुप्त दरवाजा आहे. त्यास ‘मढे दरवाजा’ म्हणतात. हस्तिप्रस्तर संपल्यावरही असाच गुप्त दरवाजा नजरेस पडतो.
सुवेळा माचीवरून परत फिरताना बालेकिल्ल्याच्या उजव्या बाजूने पद्मावती माचीकडे जाता येते. लांबीने कमी असली तरी ही प्रशस्त माची आहे. पद्मावती माची प्रशस्त असल्याने इथे निवासाची बरीच ठिकाणे दिसून येतात. शिवाय पद्मावती देवीचे मंदिर, सईबार्इंची समाधी, पद्मावती तलाव, रत्नशाळा, सदर, हवालदारांचा वाडा, दारूगोळ्याची कोठारे व गुप्त दरवाजा ही ठिकाणे पद्मावती माचीवर आहेत. शिवरायांनी मुरुंबदेव किल्ल्याचे राजगड असे नामकरण केल्यावर पद्मावती मंदिराची स्थापना केली होती. या मंदिरात सध्या 20-25 जणांची राहण्याची सोय होते. तसेच शेजारीच असलेल्या पाण्याच्या टाकांमध्ये पिण्याचे स्वच्छ पाणीही उपलब्ध होते. माचीच्या टोकावर गुप्त दरवाजा आहे. वाजेघर गावातून या दरवाजामार्गे किल्ल्यावर येता येते. राजगडाचा सर्वात उंच भाग म्हणजे बालेकिल्ला होय. पद्मावती माचीकडून बालेकिल्ल्याकडे सरळ रस्ता आहे. हा रस्ता कठीण व अरुंद असल्याने त्यावर सांभाळून चालावे लागते. या रस्त्यावर सध्या संरक्षक कठडे टाकल्याने बालेकिल्ल्याच्या मुख्य दरवाजाकडे जाण्याचा रस्ता फारसा अवघड वाटत नाही. महादरवाजा आजही अत्यंत सुस्थितीत असल्याचे दिसून येते. त्यावर कमळ व स्वस्तिक ही शुभचिन्हे कोरलेली आहेत. दरवाजातून आत गेल्यावर समोरच जननीमंदिर नजरेस पडते व मागे पाहिल्यास महादरवाजातून सुवेळा माचीचे दर्शन होते. बालेकिल्ल्याला साधारण 15 मीटर उंचीची तटबंदी बांधलेली आहे. तसेच चंद्रतळे ओलांडून गेल्यावर उत्तरबुरूज नजरेस पडतो. बालेकिल्ल्यावरून पद्मावती माची, सुवेळा माची व संजीवनी माची पूर्णपणे न्याहाळता येतात. पद्मावती माचीकडे उतरणारी एक वाट सध्या बंद केली गेलेली आहे. उत्तर बुरुजाच्या बाजूलाच ब्रह्मर्षी ऋषींचे मंदिर आहे. शिवाय बालेकिल्ल्याच्या सर्वोच्च ठिकाणी भग्न इमारती, वाडे व दारूगोळ्याच्या कोठारांचे अवशेष दिसून येतात. स्वच्छ वातावरण असेल तर केवळ तोरणा, सिंहगड, पुरंदरच नाही तर रोहिडा, रायरेश्वर, लोहगड, विसापूर व रायगड हेही किल्ले पाहता येतात.
tushar@tusharkute.com