आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाराष्ट्राचे पोकळ वारसदार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशवंतराव चव्हाणांचे हे जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्ताने यशवंतरावांच्या कार्यकर्तृत्वाचा मागोवा घेताना हे जाणवते की, त्यांनी 1956मध्ये द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री तसेच 1960मध्ये अस्तित्वात आलेल्या संयुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आदर्श राज्यकारभार केला. त्यांनी राज्याच्या आर्थिक विकासाला गती देण्याचे धोरण स्वीकारतानाच मराठी माणसांत उद्योगधंद्याची दृष्टी रुजवण्याचा प्रयत्न केला. सहकार क्षेत्राला व औद्योगिक विकासाला चालना दिली. केंद्र सरकारात संरक्षण, गृह, अर्थ व परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी आपल्या कार्यशैलीची उत्तम छाप पाडली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विरोधकांच्या जहाल तसेच क्वचित पातळी सोडून केलेल्या टीकेला त्यांनी मुत्सद्देगिरीने संयत भाषेत जशी उत्तरे दिली, तद्वतच राज्य नि लोकसभेत दिग्गज विरोधकांच्या प्रश्नांच्या सरबत्तीलाही त्यांनी मोठ्या आत्मविश्वासाने उत्तरे दिली. याचा अर्थ यशवंतराव शंभर टक्के यशस्वी राजकारणी होते, असा मात्र नव्हे. राजकारण हा त्यांच्या जीवनातील एक अपघात होता. यशवंतराव ख-या अर्थाने स्वातंत्र्य चळवळीतून आलेले, सामाजिक जाणिवेचे एक प्रगल्भ असे उत्तुंग लोकनेते होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर विविध क्षेत्रांतील मातब्बर व्यक्तींचा वैचारिक प्रभाव पडलेला होता. सत्तेसाठी राजकारण न करता समाज परिवर्तनासाठी राजकारण करण्यावर त्यांचा भर होता. ‘यशवंतराव राजकारणात न पडते तर एक उत्तम साहित्यिक झाले असते. त्यांच्या कसदार लेखनाला महाराष्ट्र मुकला,’ असे ना. सी. फडके यांनी म्हणून ठेवले आहे ते म्हणूनच खोटे नव्हे. यशवंतरावांचे हे खरे मोठेपण होय.
यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण महात्मा गांधी, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या आचारविचारांच्या प्रभावातून झाली होती. तुरुंगात असताना ह. रा. महाजनी, वि. म. भुस्कुटे, एस. एम. जोशी, आचार्य भागवत, अण्णासाहेब सहस्रबुद्धे अशा दिग्गजांचा त्यांना सहवास लाभला होता. गांधीवाद, समाजवाद, मार्क्सवादाबरोबरच त्यांनी लेनिनचे चरित्र, रशियन राज्यक्रांतीचा इतिहास वाचला होता. रॉयवादाशी ओळख करून घेतली होती. सत्यशोधक समाजाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. डॉ. राममनोहर लोहियांनी यशवंतरावांना गरीब-दलित समाजात जाऊन काम करा, असा सल्ला दिला होता. यशवंतरावांवर लक्ष्मणशास्त्री जोशी, डॉ. राधाकृष्णन, प्रा. हिरेन मुखर्जी, श्रीनिवास शास्त्री प्रभृतींच्या इंग्रजी भाषणांचा मोठा प्रभाव होता. तात्पर्य, यशवंतराव चव्हाण हे चळवळीच्या मुशीतून तयार झालेले एक परिपक्व व्यक्तिमत्त्व होते. देश, राज्य नि समाज परिवर्तनाच्या त्यांच्या संकल्पना तितक्याच व्यापक नि प्रगल्भ होत्या. महाराष्ट्रातील विद्यमान काँग्रेस नेते सरंजामी मनोवृत्तीच्या मानसिकतेतून पुढे आल्यामुळे यशवंतरावांना अभिप्रेत असलेले लोककल्याणाचे समाजहितैषी राजकारण-समाजकारण त्यांना करता आले नाही, हे उघड आहे. सत्तेद्वारे जनहित साधण्यापेक्षा स्वत:चा सरंजामशाही थाट व घराणेशाही कशी जोपासता येईल, याचाच बहुतेक काँग्रेसी पुढा-यांनी आचार-विचार केला. परिणामी यशवंतरावांच्या संकल्पनेतील पुरोगामी सुधारणावादी लोकांच्या प्रश्नांविषयी कळवळा असलेला आधुनिक महाराष्ट्र अस्तित्वातच येऊ शकला नाही, हे एक विदारक सत्य आहे.
शरद पवार हे यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणवतात, पण उभयतांच्या राजकारणात गुणात्मक फरक आहे. शरद पवारांनी सतत सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्याचे राजकारण केले. दोन वेळेस समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करून भाजपावाल्यांना व समाजवादी साथींना सोबत घेऊन ‘पुलोद’चा प्रयोग राबवला होता. 1980मध्ये ‘पुलोद’चे सरकार बरखास्त झाले. 1986 पर्यंत शरद पवार सत्तेपासून दूर होते. सत्तेविना कासावीस झालेल्या पवारांनी सत्ता मिळवण्यासाठी राजीव गांधींचे नेतृत्व स्वीकारून पुनश्च काँग्रेसमध्ये - प्रवेश केला. पुढे सोनिया गांधींच्या नेतृत्वास आव्हान देताना त्यांच्या विदेशी वंशाचा मुद्दा उपस्थित करून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली.
आता राहुल गांधी सत्तेत महत्त्वाची जबाबदारी घेण्याच्या तयारीत आहेत, असे प्रसिद्ध होताच शरद पवारांनी जुलैअखेरीस केंद्र सत्तेतून बाहेर पडण्याचा देखावा केला. चार दिवस लाल दिव्याची गाडी वापरली नाही. पण केंद्र व राज्य सरकारात तथाकथित समन्वय समित्या स्थापन करण्याचा देकार काँग्रेसकडून मिळताच परत जीव की प्राण असलेली लाल दिव्याची गाडी जवळ केली. मंत्रीपद सोडण्याचे राजकारण करताना पवारांनी जनतेच्या हिताखातर आपण मंत्रीपद सोडतो, असे चुकूनही म्हटले नाही. सारे राजीनाम्याचे नाट्य फिरले ते त्यांच्या मानापमानाभोवतीच!
यशवंतरावांची काँग्रेस पक्षावर शेवटपर्यंत निष्ठा होती. चरणसिंगांनी औटघटकेचे केंद्र सरकार बनवताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून यशवंतरावांना उपपंतप्रधानपद दिले होते. यशवंतरावांनी काँग्रेस पक्ष सोडून ते स्वीकारले, पण यशवंतरावांनी ही आपली चूक होती, असे सांगून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. शरद पवारांचे असे नाही. सत्तेसाठी पक्ष सोडणे, धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी करत सत्तेसाठी प्रसंगी भाजपा-सेनेचे पर्याय खुले ठेवण्यातही त्यांना गैर असे काहीच वाटत नाही. शरद पवारांना ‘जाणता राजा’ म्हणूनही गौरवले जाते, पण या ‘जाणत्या राजा’ची दृष्टी पुतण्या आणि मुलीच्या पुढे जात नाही. (अर्थात हा घराणेशाहीचा रोग सर्वच पक्षप्रमुखांना झालाय; पण फरक इतकाच, की त्यांना कुणी ‘जाणता राजा’ म्हणत नाही.) यशवंतरावांचे मानसपुत्र म्हणवणा-या शरद पवारांची स्थिती जर अशी असेल तर बाकीच्या काँग्रेस पुढा-यांविषयी न बोललेलेच बरे!
यशवंतरावांनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांचा कल राष्ट्रीय विचारांकडे वळला होता. काँग्रेस पक्षाला शेतकरी-कामगारांचे राज्य आणायचे आहे, शोषणरहित समाज निर्माण करायचा आहे, आर्थिक-सामाजिक समता आणायची आहे, म्हणून काँग्रेस बळकट केली पाहिजे, अशी यशवंतरावांची धारणा होती. सामान्य लोकांच्या बाबतीत त्यांना कमालीची सहानुभूती होती. आता महाराष्ट्रातील विद्यमान काँग्रेसी पुढा-यांना लोकांच्या अडीअडचणींविषयी, त्यांच्या प्रश्नांविषयी काही कळवळा वाटतो काय? नाही. तसे जर असते तर सुवर्ण महोत्सवी महाराष्ट्रात शेतक-यांनी आत्महत्या केल्या नसत्या. खेडोपाडी रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षणाच्या सोयी पोहोचल्या असत्या. घोटभर पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल पायपीट करावी लागली नसती. अन्नधान्याने गोदामे भरलेली असताना वाड्या-तांड्यांवर कुपोषणाने बालकांचे बळी गेले नसते. सरकारी योजनांत भ्रष्टाचार न होता त्या मार्गी लागल्या असत्या. मंत्री-आमदार, खासदारांनी आपल्या मतदारसंघाच्या पुढचा विचार केला असता. मंत्र्या-संत्र्यांची नावे घोटाळ्यांत घेतली गेली नसती. यशवंतरावांनी सत्तेची पदे भूषवली, पण पैसा कमावला नाही. पदांचा वापर लोकांच्या सेवेसाठी केला. आता काँग्रेसवाले पदे भूषवत आहेत, पण लोककल्याण न साधता स्वत:च्या मालमत्ता भ्रष्ट मार्गाने वाढवत आहेत. (अर्थात, विरोधी पक्षातही हेच चालू आहे!) यशवंतराव व आजच्या काँग्रेस पुढा-यांत हा खरा गुणात्मक फरक आहे, जो यशवंतरावांचे मोठेपण आधोरेखित करतो.
यशवंतरावांना दलित समाजाविषयी आस्था होती. महात्मा गांधींच्या अस्पृश्योद्धाराच्या चळवळीचा परिणाम म्हणून त्यांनी खेडोपाडी जाऊन दलित समाजाशी संपर्क साधला होता. द्वैभाषिक राज्याचे मुख्यमंत्री म्हणून यशवंतरावांनी 1958मध्ये गुलामीची निदर्शक असलेली महार वतने रद्द करणारे विधेयक संमत करून घेतले होते. महाराष्ट्रात नवबौद्धांना सवलती देतानाच त्यांना पडीक जमिनींचे पट्टे दिले. यशवंतरावांनीच कर्मवीर दादासाहेब गायकवाडांसोबत काँग्रेस - रि. प. युती केली होती. युतीमुळे रि. प. पक्षाला प्रत्येक जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण खात्याचे सभापतीपद मिळाले होते. युती राजकीय कमी व सामाजिक अभिसरणासाठी अधिक होती.
यशवंतरावांच्या पश्चात महाराष्ट्रात आता काँग्रेसवाले दलित पुढा-यांना एखाद-दुसरे पद देऊन अख्खे दलित मतदान पळवतात. दलित मतांचा वापर करून नंतर त्यांना फेकून देतात. खेडोपाडी दलित समाजावर अन्याय होतच असतात. जागतिकीकरणात दलित तरुणांच्या नोक-यांचा प्रश्न गुंतागुंतीचा झाला आहे. महाराष्ट्रातील भूमिहीन-दलित-श्रमिकांच्या गायरान जमिनी 1990मध्ये कायदा होऊनदेखील अजूनही त्यांच्या नावे रीतसर केलेल्या नाहीत. पडीक-गायरान जमिनीतील पिके तुडवणे, शेतात गुरे घालणे, पिके खुडून नेणे, दलित वस्त्यांवर हल्ले करणे, असे अमानुष प्रकार गावातील जमीनदार-सवर्ण अजूनही करतच असतात. यशवंतरावांनी युतीमुळे नागपूरची दीक्षाभूमी आंबेडकर स्मारक समितीस दिली, पण त्यांच्या माघारी नामांतरासाठी दलितांच्या घरादारांची राखरांगोळी होऊन मराठवाड्यात दलितांचे मुडदे पडले. 17 वर्षांनंतर शरद पवारांनी विद्यापीठाचे नामांतर नव्हे, तर नामविस्तार केला. आता बाबासाहेबांच्या स्मारकासाठी काँग्रेसी केंद्र सरकार मुंबईच्या इंदू मिलची जागा द्यायला खळखळ करते. एकूण काय, तर यशवंतरावांना अभिप्रेत असलेले सामाजिक अभिसरण महाराष्ट्रात झालेच नाही.
यशवंतरावांनी महाराष्ट्र हे मराठा राज्य न होता मराठी राज्य होईल, अशी ग्वाही दिली होती. कन्नमवार यांच्या निधनानंतर मराठा मुख्यमंत्री हवा म्हणून काही मराठा पुढा-यांनी यशवंतरावांची भेट घेतली होती. यशवंतरावांनी ही मागणी नाकारताना म्हटले होते, मुख्यमंत्री नेमताना जातीपेक्षा सर्व मंत्रीमंडळाला कोण बरोबर घेऊन जातो, कारभाराचे कौशल्य कुणात आहे, या कसोट्या महत्त्वाच्या ठरतात. वसंतराव नाईक यांना हीच कसोटी लावून त्यांनी मुख्यमंत्री म्हणून पहिली पसंती दिली होती. यशवंतरावांच्या या जातीनिरपेक्ष दृष्टिकोनाचा काँग्रेसला तर विसर पडलाच आहे, पण महाराष्ट्रात आता मराठा जातीचे संकुचित राजकारण करणा-या काही संघटना उदयास आल्या असून या संघटना ब्राह्मणद्वेष जसा जोपासत आहेत तद्वतच दलित अस्मिताही चेतवत आहेत, ही बाब चिंतनीय म्हटली पाहिजे.
यशवंतरावांना संयुक्त महाराष्ट्र हवाच होता; पण तो चर्चा, वाटाघाटीच्या मार्गाने. त्यांच्या मते, राजीनामे, उपवास, निदर्शने, संप हे कुठलेही ध्येय साध्य करण्याचे मार्ग नव्हेत. यशवंतरावांनी व संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी काही अपवाद वगळता एकमेकांचा आदर करणारे सुसंस्कृत राजकारणच केले. पण आता मात्र महाराष्ट्रात राजकीय संस्कृतीच रसातळाला जात आहे. एकमेकांचा अपमान करण्यात येत आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाले आहे. असहिष्णुता वाढीस लागून धर्मांध, फॅसिस्ट, प्रादेशिक राजकारण करणा-या शिवसेना-मनसेसारख्या पक्ष-संघटना फोफावत आहेत. अण्णा हजारेंसारख्या तथाकथित गांधीवाद्यांचा कंपू लोकशाही संस्थाच मोडीत काढणा-या, अराजक माजवणा-या कारवाया करत आहेत. शरद पवारांनी भविष्यकालीन सत्तेची तरतूद म्हणून भाजप-सेनेचे पर्यायही खुले ठेवले आहेत. तात्पर्य - यशवंतरावांच्या प्रगल्भ समाजहितैषी राजकारणाचा वारसा पेलणारा यशवंतरावांच्या उंचीचा उत्तुंग नेता महाराष्ट्रात निपजला नाही, ही यशवंतरावांचीच नव्हे, तर फुले-शाहू-आंबेडकर, शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची शोकांतिकाच म्हटली पाहिजे, दुसरे काय?