Home | Magazine | Rasik | maharashtra-sahitya-parishad-karnik

पुण्याची महाराष्ट्र साहित्य परिषद

सुनील कार्णिक, सहायक संपादक / दिव्य मराठी | Update - Jun 02, 2011, 01:27 PM IST

जसे वाचक तसे त्यांचे लेखक, तशा त्यांच्या संस्था आणि तसा त्यांचा कारभार! आपल्या मराठी भाषेला आणि साहित्याला हे वर्णन पूर्णपणे लागू पडते. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उदाहरण पाहा.

 • maharashtra-sahitya-parishad-karnik

  जसे वाचक तसे त्यांचे लेखक, तशा त्यांच्या संस्था आणि तसा त्यांचा कारभार! आपल्या मराठी भाषेला आणि साहित्याला हे वर्णन पूर्णपणे लागू पडते. पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेचे उदाहरण पाहा. गावात तिचा पत्ता विचारलात तर पुणेकरांना तो ठाऊक असेलच असे नाही. ज्या टिळक रोडवर तिची छोटीशी वास्तू उभी आहे, ती चिमुकली इमारत आपल्याला दिसेलच असे नाही. दिसली तरी त्यात हालचाल असेलच असे नाही. आणि हालचाल असली तरी त्यात जिवंतपणा असेलच असे नाही! मग त्या वास्तूचा पुनर्विकास करण्याचा घाट वारंवार घातला जातो; पण तो फोल ठरतो. परिषदेतर्फे पुण्यात साहित्य संमेलन भरवले जाते; पण त्यावर पुण्यभूषण संस्था कब्जा करते. मागाहून त्यांच्याकडून ८२ लाख रुपये उकळल्याचे चोरटे समाधान तेवढे मिळते!


  थोडक्यात काय, तर मराठी साहित्याची आणि साहित्य परिषदेची अवस्था सारखीच वाईट आहे. गेल्या शंभर वर्षांत या परिषदेने काय काय अनुभवले हे पाहिले तर त्यात सुखापेक्षा दु:खाचा भाग अधिक दिसतो.
  २७ मे १९0६ रोजी लो. टिळकांच्या आशीर्वादाने साहित्य परिषदेची स्थापना झाली, ती विंचूरकर वाडयात. (पुढे १९३५ मध्ये औंधचे राजे बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांनी ९९९ वर्षांच्या कराराने परिषदेला जागा मिळवून दिली आणि परिषद स्वगृही आली!) १९0६ पासून १९६४ पर्यंत परिषदेतर्फे वार्षिक साहित्य संमेलने भरवली जात. (१९६५ मध्ये ही संमेलने मराठी साहित्य महामंडळाकडे गेली आणि १९९७ साली त्यांचे 'अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन' झाले.) या साहित्य संमेलनांना आरंभापासून आजतागायत पोकळ प्रतिष्ठा आहे. म्हणजे अध्यक्षाच्या निवडीसाठी दरवर्षी हमरीतुमरी होते; पुढे त्यांचे अध्यक्षीय भाषण फुसके निघते; त्या भाषणाचे जाहीर वाभाडे काढले जातात; तरीही त्या सर्व भाषणांचे खंड प्रसिद्ध होतात; आणि त्या रद्दीच्या ढिगाचे पुढे काय करायचे या विचाराने प्रकाशकाची झोप उडते! (उगाच नाही भालचंद्र नेमाडे आणि बाबुराव बागूल आणि वसंत सरवटे आणि कांताशेट नेरूरकर आणि चिं. स. लाटकर अध्यक्षपदापासून दूर राहिले!) या साहित्य संमेलनांचे (पण संमेलनाच्या प्रांगणाबाहेरचे) एकमेव साहित्य आजवर अजरामर ठरले आहे; ते म्हणजे 'माझ्या घालमोड्या दादा - ' या प्रसिध्द शीर्षकाचे म. फुल्यांचे पत्र. असो! साहित्य संमेलनात दरवर्षी अनेक ठराव पास होतात आणि ते नित्यनेमाने विसरले जातात. उदाहरणार्थ, बेळगावचा ठराव! त्याचे इतक्या ठिकाणी इतक्या प्रकारे हसे झाले आहे की आता त्या हसण्यातलीही मजा निघून गेली आहे. अशा वेळी लो. टिळकांचे १९0६ सालच्या साहित्य परिषदेच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमातले अविस्मरणीय उद्गार आठवतात. ते म्हणाले होते, 'केवळ उत्कट इच्छेने कामे होत नसतात तर कर्ते पुरुष पुढे यावे लागतात.' हेही असो म्हणा! परिषदेची आणखी एक कामगिरी म्हणजे 'महाराष्ट्र साहित्य पत्रिका'. १९२१ च्या सुमाराला 'विविधज्ञानविस्तार' मासिकाची पुरवणी म्हणून ती मुंबईतून प्रसिद्ध होऊ लागली, पण १९२८ पासून पुणेकर झाली. तिला द. वा. पोतदार, माधव ज्यूलियन, ना. गो. चापेकर, रा. श्री. जोग, के. ना. काळे, वि. भि. कोलते, दि. के. बेडेकर, श्री. के. क्षीरसागर, असे अनेक नामवंत संपादक लाभले आणि त्यांनी पत्रिकेचा लौकिक वाढवला. विशेषत: वार्षिक वाङ्मयीन आढावे भरघोस असत. वाङ्मयाचा गंभीर वाचक पत्रिका आवर्जून वाचत असे. भा. दि. फडके यांचा 'ज्ञानेश्वर' विशेषांक, आनंद यादवांचा 'ग्रामीण साहित्य' विशेषांक, असे काही अंक चांगले निघाले होते. पण अधूनमधून संपादक आपल्या आवडीप्रमाणे 'पत्रिके'त बदल करू लागले. कवी यशवंतांनी अंकात कविता आणल्या. हळूहळू पत्रिकेचा दर्जा समाधानकारक राहिला नाही, तशी वाचकांनीही तिच्याकडे पाठ फिरवली.
  खरे तर अनेक महत्त्वाची कामे परिषदेने आजवर हातावेगळी केली आहेत. १९९ मध्ये वि. का. राजवाडयांच्या 'मराठयांच्या इतिहासाची साधने'चा एक खंड 'मसाप'तर्फे प्रकाशित झाला होता. तसाच सात खंडांमधला मराठी वाड.मयाचा इतिहास, गं. बा. सरदारांचे 'संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती', म. श्री. दीक्षितांनी लिहिलेला परिषदेचा इतिहास, 'भाषा : साहित्य व संशोधन'चे तीन खंड, 'मसाप'समग्र सूची, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे इंग्रजी खंड, भीमराव कुलकर्णी संपादित 'मराठी फार्स', इरावती कर्वे यांचे 'महाराष्ट्र एक अभ्यास', अशी काही कामे सांगता येतील. शिवाय १९३२ साली शुद्धलेखनाचे नवे नियम बनवण्यात आले. ३८ ते ७ सालांत मराठीच्या परीक्षा जोरात सुरू होत्या. ३७ मध्ये 'ज्ञानकोश'कार केतकरांच्या निधनानानंतर त्यांचे अंतिम विधी करण्याची जबाबदारी परिषदेने उचलली होती. नंतर त्यांचे स्मारक लकडी पुलानजीक उभारले, ते ६१ मध्ये पानशेतच्या पुरात वाहून गेल्यावर ६३ मध्ये कमला नेहरू उद्यानात नवे स्मारक उभारले. १९४६ सालच्या साहित्य संमेलनात प्रथमच संयुक्त महाराष्ट्राची मागणी करण्यात आली. हळूहळू तिने जोर धरला आणि ६ मध्ये स्वतंत्र मराठी राज्याचे स्वप्र प्रत्यक्षात आले. ७९-८ मध्ये ग्रंथव्यवहार परिषदा भरवण्यात आल्या. ८८ मध्ये लेखक साहाय्य निधी सुरू झाला. या सगळयासाठी वि. द. घाट्यांसारखे परिषदेचे विश्वस्त होते, ग. दि. माडगूळकरांसारखे अध्यक्ष होते, चिं. वि. जोशींसारखे कार्याध्यक्ष होते, धनंजयराव गाडगीळांसारखे कोषाध्यक्ष होते, न. र. फाटकांसारखे चिटणीस होते, म. श्री. दीक्षितांसारखे कार्यकर्ते होते. त्याबरोबरच वि. स. खांडेकरांसारख्यांच्या व्याख्यानमाला होत, सन्मान होत, स्मृतिदिन साजरे होत. आता ते सगळे संपून गेले आहे किंवा त्यांची चटावरची श्राद्धे झाली आहेत. आता इथल्या कार्यक्रमांना पांढ:या केसांची किंवा बिनकेसांची चार डोकी दिसतात. शंभर-दोनशे रुपयांचे मामुली पुरस्कार स्वीकारण्याची तसदी विजेतेही घेत नाहीत. जणू सगळयांची बोलतीच बंद झाली आहे.
  'बडा घर, पोकळ वासा'
  थोडक्यात काय, तर सध्या :हासकाळ चालू आहे. गेल्या दहा वर्षांत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणेच मराठी साहित्यिकांचंही स्खलन सुरू आहे! आता परिषदेच्या पदाधिका:यांमध्ये 'प्रभावी व्यक्तिमत्त्व' दिसत नाही, जे आहेत त्यांच्यामध्ये निधी उभारण्याची कुवत नाही. अशा घसरगुंडीच्या काळातच कोणत्याही संस्थेचे संस्थान होत असते; या न्यायाने परिषदेचे ग्रंथालय ओकेबोके दिसते. इथले अतिथिगृह काही वर्षांपूर्वी न सांगण्याजोग्या कारणाने बंद झाले होते, ते गेली काही वर्षे चालू आहे. तिथे भालचंद्र नेमाडयांसारखे दुर्मिळ पाहुणे कधीतरी दिसतात. ते आपली अवाढव्य कपडयांची बॅग बंद करण्याच्या खटपटीत बॅगेवर उभे राहून जोर करतात, मग अनिल अवचटांसारखे मित्र त्यांना ती बॅग शिस्तशीर लावून देतात... अशा गंभीर आणि गमतीदार कहाण्या अधूनमधून ऐकायला मिळतात!
  तेही असो ! ! तरी अजूनही विदर्भ साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, मुंबई मराठी साहित्य संघ या इतर संघांपेक्षा पुण्याची साहित्य परिषद उजवी मानली जाते. पण 'बडा घर, पोकळ वासा' असाच एकूण प्रकार आहे. अलीकडे पार पडलेल्या परिषदेच्या निवडणुकीआधी दोन प्रतिस्पर्धी पदाधिकाऱ्याचा कलगीतुरा रंगला, तो बोलका होता. खरे तर पुण्याच्या सांस्कृतिक क्षेत्रात अजूनही काही माणसे डोळसपणे काम करताहेत. विवेक सावंत, भानू काळे, दिलीप माजगावकर, सुधीर गाडगीळ, श्याम मनोहर, माधुरी पुरंदरे, संदीप खरे, 'रसिक साहित्य'चे नांदुरकर, 'अक्षरधारा'चे राशिवडेकर, आनंद अवधानी, मोहन आगाशे, चंद्रमोहन कुलकर्णी, सुजित पटवर्धन, आनंद करंदीकर, उल्हास लाटकर, विलास खोले, रेखा इनामदार-साने, सुजाता देशमुख... अशी अनेक नावे डोळ्यांपुढे येतात. परिषदेची आजची स्थिती बदलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. पण सांगायचे कोणी आणि ऐकायचे कोणी? एवढी एक मामुली अडचण बाकी आहे.
  --

Trending