आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

...तरच लोकशाही टिकेल!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेस पक्ष गलितगात्र झाला आहे, की पक्षातील पहिले तीन राष्ट्रीय नेते एकमेकांवर अप्रत्यक्षपणे कुरघोडी करण्यासाठी ही गलितगात्र अवस्था जाणीवपूर्वक दाखवत आहेत, हे ज्याने त्याने आपापल्या तर्कानुसार समजून घ्यावे. मात्र कुठल्याही मुद्द्यावर अस्तित्वहीनता भासवणे हे राजकारणामध्ये कायम धोकादायक असते. भारतासारख्या खंडप्राय व अठरापगड जाती-जमाती, धर्म यांच्या अडगळीतून मार्ग काढताना तर ते फारच खतरनाक ठरू शकते. काँग्रेस नेत्यांच्या या अस्तित्वहीनतेमुळे देशातील सर्वच प्रतिगामी शक्तींना मोठा जोर आल्याचे दिसते आहे. मोदी भारताच्या पंतप्रधानपदासाठी स्पर्धेत आहेत, की त्यांच्या अश्वमेधाचा घोडा सात समुद्र पोहून त्यांना दिग्विजयी घोषित करणार आहे, या संभ्रमात सध्या त्यांच्या समर्थकांचा उन्माद दिवसेंदिवस वाढतानाच दिसतो. याकडे एक वेळ दुर्लक्ष करता येईल. मात्र विविध माध्यमांचा वापर करून समाजामध्ये जाणीवपूर्वक दुहीचे बीज पेरले जात आहे. प्रसारमाध्यमांची त्याला जाणते-अजाणतेपणी साथ मिळते आहे. भारतात पुन्हा एकदा सांप्रदायिक वातावरणनिर्मितीचा पद्धतशीर प्रयत्न सुरू झाला आहे, हे बारकाईने घटनांकडे पाहिल्यास लक्षात यायला वेळ लागणार नाही. पुरोगामी महाराष्ट्रात सगळीकडे आलबेल सुरू असल्याचे सध्या अनेकांना वाटत असेल. राज्याला काँग्रेसने स्वच्छ नेतृत्व दिले आहे. सत्शील गृहमंत्री दिले आहेत. राष्ट्रवादीतील भ्रष्ट मंत्र्यांवर दररोज कोरडे ओढून त्यांना जवळपास नामोहरम केले गेले आहे. सजग विरोधी पक्ष आहे, मग या राज्यात कोणता सांप्रदायिक प्रश्न निर्माण होणार आहे, असे वाटणे साहजिक आहे. मात्र महाराष्ट्राच्या अनेक मुस्लिमबहुल तालुक्यांमधून असाउद्दीन ओवेसी यांच्या ऑल इंडिया मजलीसे इत्तेहादुल मुसलमिन (एआयएमएम) या संघटनेची पोस्टर्स ईदच्या निमित्ताने लावली गेली होती. त्याआधी या संघटनेचे अनेक कार्यकर्ते आंध्र प्रदेशमधून येऊन महाराष्ट्रात पद्धतशीर प्रचाराचे काम करीतच आहेत. पोस्टर्सवर जाणीवपूर्वक ‘हम गिधडों की तरह झूंड में नहीं आते, शेर अकेला आता है...’ अशी भावना चेतवणाया वाक्यांची जाणीवपूर्वक पेरणी असते. नांदेडमध्ये ओवेसी यांच्या पक्षाने मिळविलेले यश पाहता या गोष्टीकडे पुरोगामी पक्षांनी डोळेझाक करून चालणार नाही. अल्पसंख्याकांचा जमातवाद धोकादायक नसतो, अशा मूर्खाच्या नंदनवनात राहणे तर फारच धोकादायक आहे. कारण अल्पसंख्याकांचा जमातवाद धोकादायक असतो की नसतो यापेक्षा तो बहुसंख्याकांमधील जमातवादाला आपोआप खतपाणी घालत असतो, हे जगभरात आणि विशेषत: भारतासारख्या देशात तर वारंवार सिद्ध झाले आहे. ज्या ज्या ठिकाणी ओवेसी यांच्या पक्षाची पोस्टर्स लागली आहेत किंवा बैठका झाल्या आहेत, त्या ठिकाणी प्रतिक्रियेपोटी तत्काळ शिवसेना व बजरंग दलाचे कार्यकर्तेही सक्रिय झाल्याचे पोलिस यंत्रणांचे म्हणणे आहे. एकूण दोन्ही बाजूंनी तयारी जोरात सुरू झालेली आहे. मोदी साहेबांच्या राज्याभिषेकाची आतुरता किती जणांना झाली आहे, ते अशा घटनांवरून स्पष्ट व्हावे. मात्र हे सगळे होत असताना या सांप्रदायिकतेला राजकीय पातळीवर विरोध करण्याचे काम देशपातळीवरील एकही राजकीय नेता करीत नाही, हे दु:खद आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन प्रमुख पक्षांना तर सत्ता हाकण्याच्या पलीकडे कोणताही प्रमुख उद्देश नसल्यासारखीच त्यांची एकंदर वर्तणूक आहे. वास्तविक पाहता 1952, 1957, 1962 या तीन प्रमुख सार्वत्रिक निवडणुकांमध्ये पं. जवाहरलाल नेहरू यांच्या प्रचाराच्या मुद्द्यांमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा फॅसिझमला विरोध हा असे. खरे तर त्या काळी संघ परिवार राजकीयदृष्ट्या इतका कमकुवत होता, की दुर्बिणीतून पाहूनसुद्धा त्यांचे अस्तित्व जाणवले नसते. गांधी खुनाच्या पार्श्वभूमीवर गावागावांमध्ये बहुजन समाजासाठी संघाचे कार्यकर्ते हे हेटाळणीचा किंवा तिरस्काराचा विषय झालेले होते. तरीसुद्धा या खंडप्राय देशाला भविष्य घडवायचे असल्यास त्याला फॅसिझमच्या विरोधात सजग राहून कायम लढाई लढावी लागेल, हे नेहरूंसारख्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला चांगले समजले होते. सध्या परिस्थिती अशी आहे की, फॅसिझम हे एखाद्या मॉलमध्ये उघडलेल्या दुकानाचे नाव आहे, की विदेशी बनावटीच्या गाडीच्या मॉडेलचे नाव आहे, अशी विचारणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून किंवा नेत्यांकडून करण्यात आली तर त्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही.

1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्याआधी किमान 10 वर्षे या देशातील सामान्यजनांच्या नेणिवा मुस्लिमविरोधी घडविण्यात आल्या होत्या. बाबरी मशीद इतक्या उघडपणे पाडण्याची अन्यथा संघ परिवाराची हिंमत होणे शक्यच नव्हते. अगदी तशाच प्रकारची मानसिकता सध्या देशपातळीवर घडविण्यात येत आहे. सोनिया गांधी, मनमोहनसिंग, राहुल गांधी यांच्याविषयी गरळ ओकणारे ट्विट्स, फेसबुक कॉमेंट्स, एसएमएस अव्याहत सुरू आहेत. राहुल गांधी यांचे कुटुंबीय मूळचे मुस्लिम असल्याचा जावईशोध लावून तो कसा खरा आहे, याचे पु. ना. ओक स्टायलीत दाखलेच्या दाखले दिले जात आहेत. अनेक राजकीय विश्लेषकांना असे वाटेल, की याचा निवडणुकीच्या राजकारणावर फारसा परिणाम होत नाही. प्रश्न निवडणुकीपुरता उरलेलाच नाही. या देशाचा पाया हा कायम सेक्युलर विचारधारेवरच टिकलेला आहे. अगदी सेक्युलॅरिझम ही संकल्पना पाश्चिमात्य वाटत असली तरी इंग्रज येण्याच्या आधीपासूनच भारतीय भूखंडावर ही विचारधारा सुफी, हिंदू संतांच्या परंपरेतून जिवंत होती. या देशात जर फॅसिस्ट एकाधिकारशाहीला पोषक वातावरण तयार झाले तर पुढील भयंकर घटना घडण्यासाठी फारशी वाट पाहावी लागणार नाही. मात्र असे असताना काँग्रेसचे तळागाळातील कार्यकर्ते जाऊद्यात; काँग्रेसचे नेतृत्व म्हणजे सोनिया गांधी, पंतप्रधान मनमोहनसिंग, राहुल गांधी काय करीत आहेत? या प्रश्नाचे उत्तर देणे कुणालाच शक्य नाही. दुसया फळीतील दिग्विजयसिंग यांच्यासारखे काही ठरावीक नेते केवळ ट्विटरच्या माध्यमातून काही टीका करतात, काही मिनिटांपुरती चॅनल्सवर त्याची बातमी होते. पुन्हा पहिले पाढे पंचावन्न! फॅसिझमच्या विरोधात जमिनीवरील लढाई करण्याची काँग्रेस, राष्ट्रवादी, माकप, भाकप, सपा, अशा कुठल्याही सेक्युलर पक्षाची इच्छा सध्या दिसत नाही. माध्यमांद्वारे सध्या एका बाजूला आर्थिकदृष्ट्या देश डबघाईला आल्याचे चित्र दररोज रंगवले जात आहे. दुसया बाजूला या सर्व प्रश्नांमधून देशाला वाचविण्यासाठीच मोदींचा अवतार झाल्याची चर्चा जोराने सुरू करण्यात आली आहे. मात्र याच्या आडून गावागावात, तालुक्या-तालुक्यात जिथे संधी मिळेल तिथे सांप्रदायिक शक्ती आपापली पाळेमुळे पसरण्याच्या कामाला लागल्या आहेत. 1992 च्या डिसेंबरात बाबरी मशीद पाडण्याच्या काही महिने आधी एका दिवाळी अंकाने देशातील धार्मिक दंगे हा विषय घेतला होता. या दिवाळी अंकासाठी काम करताना जेव्हा अनेक विचारवंतांकडे लेखांची विचारणा केली होती, तेव्हा अनेक पुरोगामी विचारवंतांनी सध्या देशात कुठेही सांप्रदायिक वातावरण नसताना हा कुठला विषय घेतलात, असे सांगत अनिच्छेनेच लेख दिले होते. दिवाळी संपून दोन महिने होतात न होतात तोच डिसेंबरात बाबरी उद्ध्वस्त झाली होती. त्यामुळेच सध्या वातावरण धार्मिक विद्वेषाचे किंवा उन्मादाचे नसल्याच्या भ्रमात राहणे, हे एका परीने देशाला विघटनाच्या खड्ड्यात लोटण्यासारखेच असेल. त्यामुळेच देशभक्त म्हणविणायांच्या कसोटीचा काळ सुरू झाला आहे. देशाला त्याच्या मूळ सेक्युलर विणीपासून दूर नेणाया शक्ती, मग त्या कुठल्याही समाजातील असोत, त्यांना आपापल्या शक्तीनुसार प्रत्येक पावलावर रोखण्याचे काम केले तरच पुढील पिढ्यांसाठी देश आणि लोकशाही या दोन शब्दांना अर्थ राहतील. ते राहिले नाहीत तर पुढील पिढ्यांकडून माफीची अपेक्षा बाळगणेही व्यर्थ ठरेल.