Home | Magazine | Pratima | mahashwetadevi literature

साहित्यरागिणीचा जीवनगौरव

शेखर देशमुख | Update - Nov 11, 2011, 10:17 PM IST

कुणी स्वान्त सुखाय: म्हणत निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी लेखनकार्यात रमतात, कुणी स्वत:चा अहंगंड सुखावण्यासाठी लेखन सुरू ठेवतात

  • mahashwetadevi literature

    कुणी स्वान्त सुखाय: म्हणत निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी लेखनकार्यात रमतात, कुणी स्वत:चा अहंगंड सुखावण्यासाठी लेखन सुरू ठेवतात, आत्ममग्नतेपलीकडे जाऊन समाजाची घट्ट नाळ जुळलेल्या महाश्वेतादेवींची लेखणी मात्र पीडित आणि शोषित वर्गाच्या उत्कर्षासाठी झटत राहते. कथा असो, कादंबरी असो वा संशोधनपर लेखन असो... त्या वर्गाच्या दु:खाचा आणि वेदनांचा अव्याहत शोध घेत राहते. पिढ्यान्पिढ्या अन्याय, अत्याचाराचे बळी ठरलेल्यांना आधार देतानाच जगण्याचे उद्दिष्टही देत राहते. म्हणूनच ज्ञानपीठ, साहित्य अकादमी, मॅगसेसे, पद्मविभूषण आदी पुरस्कारांनी सन्मानित 87 वर्षीय महाश्वेतादेवींचा ‘मुंबई लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये मानाचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान होतो तेव्हा ख-या अर्थाने त्या पुरस्काराची शान वाढलेली असते. नव्हे, अशा भावना कार्यक्रमाचे संयोजक प्रांजळपणे व्यक्तही करतात तेव्हा जराही आश्चर्य वाटत नाही.
    कुणीतरी स्वत:ला समाजाशी जोडून घेणे हा निव्वळ योगायोग कधीच नसतो. भारतीय साहित्यविश्वात मानाचे स्थान मिळवलेल्या महाश्वेतादेवींच्या बाबतीत तर तो नक्कीच नव्हता. वडील मनीष घटक, कवी आणि कादंबरीकार. भारतीय समांतर चित्रपटांमधला जिनिअस असा नावलौकिक मिळवलेला ऋत्विक घटक हा त्यांचा धाकटा भाऊ. आई धरित्री देवी स्वत: लेखिका. त्यांचे दोन भाऊ म्हणजे महाश्वेतादेवींचे एक मामा संखा चौधरी हे बंगालमधले नावाजलेले शिल्पकार, दुसरे मामा सचिन चौधरी प्रतिष्ठित ‘इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली’चे (ईपीडब्ल्यू) संस्थापक-संपादक. अशा साहित्य-कला आणि समाजकारणाच्या प्रभावात वाढलेल्या महाश्वेतादेवींची वैचारिक जडणघडण पुरोगामी वळणाची असावी यात नवल नव्हते. पुढे संशोधनाच्या निमित्ताने शबर, लोधा आदी उपेक्षित आदिवासी जमातीच्या जगण्याचा वेध घेण्याची त्यांना संधी मिळाली आणि त्या क्षणापासून त्यांच्या साहित्यविषयक लिखाणाला निश्चित असे उद्दिष्टही मिळाले. त्यातून अरण्येर अधिकार, अग्निगर्भ, छोटी मुंडा एवं तार-तीर, दायन यासारख्या मातीशी नाते सांगणा-या साहित्यकृती आकारास आल्या. नक्षलवादी चळवळीमुळे निर्माण झालेल्या सामाजिक बदलांचा वेध घेणारी ‘हजार चुरासिर माँ’ वाचकांपर्यंत पोहोचली. या सगळ्यांतून महाश्वेतादेवींना तळागाळातल्या माणसांबद्दल असलेले कुतूहल दिसत गेले. माणुसकीचा वाटणारा आंतरिक कळवळाही जाणवत गेला. अर्थात महाश्वेतादेवींचे अभिव्यक्त होणे हे लेखनापुरते कधीच मर्यादित नव्हते. त्या लेखनाला विचार आणि कृतीचा मेळ साधणा-या प्रत्यक्षानुभवाची जोडही होती. हा अनुभव आदिवासींसोबत महिनोन्महिने राहण्याचा होता. प्रतिगामी विचारांच्या सरंजामी व्यवस्थेला प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून विरोध करण्याचा होता. पुरोगामी विचारांची पाठराखण करण्याचा होता. आजवर मिळालेल्या पुरस्कारांची मिळालेली जवळजवळ सर्व रक्कम आदिवासींच्या कल्याणासाठी देण्याचा होता. त्यातूनच महाश्वेतादेवींचा केवळ बंगाली साहित्यविश्वातच नव्हे, तर एकूणच राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात नैतिक आणि तात्त्विक दरारा निर्माण होत गेला. प्रश्न आदिवासींना गुन्हेगार ठरवणा-या अमानवी कायद्याचा असो वा नंदिग्राम-सिंगूर येथील जमिनींवर भांडवलदारांच्या अतिक्रमणाचा असो, तळागाळातल्या माणसावर अन्याय होत आहे, असे लक्षात येताच कोणाचीही भीडभाड न ठेवता पंतप्रधान मनमोहन सिंगांपासून प्रणव मुखर्जी, बुद्धदेव दासगुप्ता, ममता बॅनर्जींपर्यंतच्या बड्या राजकीय नेत्यांना खडे बोल सुनावण्यास त्यांनी मागेपुढे पाहिले नाही. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार, मानमरातब, पैसा हे सगळे आजवर महाश्वेतादेवींच्या वाट्याला आले, पण आदिवासींच्या कल्याणापुढे ते सगळेच दुय्यम ठरले. म्हणूनच ‘लिटरेचर फेस्टिव्हल’मध्ये जीवनगौरव पुरस्कार स्वीकारल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम आठवण काढली ती गेल्या 30 वर्षांपासून नाळ जुळलेल्या आदिवासींचीच...

Trending