परंपरेला नकार देऊन, वर्तमानाला उभा-आडवा छेद देत नव्या व्यवस्थेची मांडणी करण्यात कादंबरीच्या जन्माचे रहस्य दडले आहे. समग्र मानवी जीवनात वेळोवेळी होत आलेल्या परिवर्तन-प्रबोधनाला
आपल्या पोटात सामावून घेत कादंबरी वाढत आणि विकसित होत आली आहे. कादंबरीचा इतिहास जरी अवघा अडीचशे-तीनशे वर्षांचा असला तरी तिने सातत्याने समाजाचा सामाजिक-सांस्कृतिक वगैरे इतिहास वेळोवेळी अधोरेखित केला आहे. मराठी कादंबरीच्या बाबतीतही हे खरे आहे. ‘यमुनापर्यटन’, ‘पण लक्षात कोण घेतो’, ‘ब्राह्मण कन्या, ‘धग’ या १९६०पर्यंतच्या मराठीतल्या स्थित्यंतराच्या टप्प्यावरच्या महत्त्वाच्या कादंबर्या आहेत. या सगळ्याच कादंबर्यांनी स्त्रीला केंद्रस्थानी ठेवले आहे. हा निव्वळ योगायोग म्हणता येणार नाही. धर्मव्यवस्थेत होणारे स्त्रीचे शोषण (यमुनापर्यटन), कुटुंब व्यवस्था आणि सरंजामी पर्यावरणात होणारी स्त्रीची कुचंबणा (पण लक्षात कोण घेतो), अनौरस संतती, प्रेम या पातळ्यांवर स्त्रीला येणारे दुय्यमत्व (ब्राह्मणकन्या) असो, की नियती स्त्रीचे सर्वांगीण आयुष्य कसे नासवून टाकते, याचा प्रत्यय असो (धग); या कादंबर्या स्त्री आणि प्रबोधन केंद्रस्थानी ठेवतात. याच अंगाने ‘कोसला’ जाते. ती जरी पांडुरंग सांगवीकरची कहाणी असली, तरी मातृसत्ताक परंपरेचे महत्त्व अधोरेखित करणारी आहे. याकडे आपणाला दुर्लक्ष करता येत नाही. हाच धागा माझ्या लेखांमध्ये बांधला जाणार आहे.
कोण काय आणि किती वाचन करते, या प्रश्नाला बाजूला ठेवू. पण मी का आणि काय वाचतो, या प्रश्नाकडे वळतो तेव्हा माझ्या लक्षात येते की, माझ्या सभोवती बर्याच उलाढाली चालू असतात. रोजच भले-बुरे घडत असते. भल्यापेक्षा बुर्याचीच यादी मोठी असते. त्या यादीला आपण काट मारू शकत नाही किंवा ती यादी कमीही करू शकत नाही. इतके आपण सामान्य माणूस म्हणून हतबल होत चाललो आहोत. आपली ही असमर्थता आपणाला बर्यापैकी अस्वस्थ करून सोडते. हे असे का? का घडते? यामागे कार्यकारणभाव काय? आपण हे बदलू अथवा थांबवू शकत नाही का? असे असंख्य प्रश्न भेडसावू लागतात. मग या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी मी वाचनाकडे वळतो. एका अर्थाने ती तात्पुरती पळवाट असते. पण ती शोधण्याशिवाय माझ्याकडे पर्याय नसतो. अशात जेव्हा एखादी चांगली कादंबरी हातात पडते आणि मग त्यातील वास्तवाचे िकंवा कल्पनेच्या जगातल्या घटनांमागचे कार्यकारणभाव समजून घेताना त्यातील िवचार, तत्त्व वाचताना आपणाला काही एक उत्तर स्वत:पुरते साधत जाते.
उदाहरणच द्यायचे झाले, तर उद्धव शेळक्यांच्या ‘धग’चे देता येईल. माझा जन्म बाहत्तरच्या दुष्काळातला. माझा गाव आणि परिसर दुष्काळी अवर्षणग्रस्त पट्टा. तेव्हा दुष्काळ आमच्या पाचवीलाच पुजलेला. टोकाचे दारिद्र्य आणि सुविधांचाही दुष्काळ. अशा वेळी आपण का जन्माला आलो? आपण काय करणार? शिक्षणाने नेमके काय साधणार? असे प्रश्न पडत होते आणि ‘धग’ हाताशी आली. ती अधाशासारखी वाचली. त्यातल्या कोंतिकची शोकात्मिका वाचताना तिच्या दु:खापुढे मला माझे दु:ख खूप छोटे वाटले आणि थोडे बळ आले. तीच अवस्था ‘कोसला’ वाचताना. प्रथम तर मी ती वाचून अधिकच उद्ध्वस्त बनलो. पण जसजसे मी भाऊ पाध्ये, शंकर पाटील, हमीद दलवाई, दीनानाथ मनोहर, रा. रं. बोराडे, आनंद यादव वगैरेंचे लेखन वाचायला लागलो, तसतसे माझे साहित्यविषयक आकलन वाढू लागले. भूक वाढली तसा कादंबरीकडे वळलाे. कादंबरीकार लिहितो तेव्हा तो का लिहितो? त्याच्या लेखनाचे प्रयोजन काय? असले प्रश्न घेऊन मी वाचनाकडे पाहू लागलो, तेव्हा मला ते वाचन अधिक प्रगल्भ करू लागलं. एक तर आपल्या आकलनापलीकडचे, अनुभवविश्वाच्या बाहेरचे अनेक पैलू वाचनातून कळू लागले. आपल्या जगण्याची अभावग्रस्तता, सभोवतालचा जटिल वर्तमान, वरवर प्रत्येक वेळी वाटणारी िवसंगती, काळवंडत चाललेला अवकाश या सगळ्याला रिअॅक्ट होता येत नव्हते. तेव्हा कादंबर्यांच्या वाचनातून मला तेही हळूहळू जमू लागले. मनोहर शहाणे, राजन गवस, रंगनाथ पठारे, विलास सारंग, शांता गोखले या मंडळींचे लेखन मला हळूहळू रिअॅक्ट व्हायला आणि वैचारिक बैठक पक्की करायला ताकद देऊ लागले.
जगण्याच्या काचाची, जीवनाचा आणि जगाचा अन्वय लावण्याची उत्तरे काही अंशी मला कादंबरी वाचनातून मिळत होती. जगण्याचा परीघ वाढवत होती. ओरहान पामुक म्हणतो, ‘तत्त्वज्ञानातील अडचणींना सामोरे न जाता, धर्माचे कोणतेही सामाजिक दबाव न जुमानता, आपल्या स्वत:च्या अनुभवाद्वारे, स्वत:ची बुद्धिमत्ता वापरून विश्वाचे आणि जगण्याचे अत्यंत सखोल आणि आवडीचे ज्ञान मिळवण्याचे कादंबरी हे एक आशास्थान असते... हा आशावाद एक अत्यंत समानतावादी, लोकशाहीवादी विचार आहे. पामुकची ही भूमिका मला माझ्या का वाचतो, या प्रश्नाच्या उत्तराजवळ घेऊन जाते. कादंबरी वाचनाने केवळ बैठक पक्की झाली असे नाही, तर स्त्रीकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. माझ्या व माझ्या भवतालच्या जगण्याचा अन्वयार्थ लावण्याची एक नवीच किल्ली मला सापडली. या किल्लीच्या आधारे अनेक अशक्य कुलपे मला उघडता आली. त्या कुलूपबंद घरामागचे िवश्व मला पुन:पुन्हा न्याहाळता आले. एका अर्थाने ही स्वत:पुरती प्रत्यक्ष न लढण्याची पळवाट असली, तरी ती मला मान्य आहे. कारण या पळवाटेनेच माझा पुढचा रस्ता पक्का आणि डांबरी झाला आहे. आता माझा रस्ता इतरांना मजबूत व खुला करून देण्यासाठी मी पुन:पुन्हा वाचनाला नव्याने आणि सातत्याने भिडतो आहे...
mahendrakadam27@gmail.com