आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन कुन्‍तो मौला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जो स्वर आर्त, ज्या स्वराला अलौकिकत्वाचा परीसस्पर्श, तो हृदयाला भिडतो. इस्लाममधील सुफी परंपरेशी आत्मीय नाते असलेला कव्वाली हा  कलाप्रकार आणि त्यात गायक-वादकाची अल्लाहची आळवणी करताना लागणारी समाधी श्रोत्यांना दिव्यत्वाचा अनुभव देते. धर्म कोणताही असो, दर्दी लोक अस्सल कव्वालीसाठी जीव टाकतात. परंतु अामीर खुसरोच्या काळापासून रुजलेल्या आणि उत्तरोत्तर बहरत गेलेल्या या गायनप्रकारास बदलत्या काळामुळे ग्रहण लागण्यास प्रारंभ झाला आहे. त्याचीच काजळी खुलताबादमधल्या कव्वाली पार्ट्यांनी अनुभवली आहे. कधी काळी नावाजलेले कव्वाल आणि त्यांनी गायलेल्या कव्वालीचे सळसळते केंद्र असलेल्या खुलताबादेत आज केवळ एक कव्वाली पार्टी तग धरून आहे...त्या पार्श्वभूमीवर कव्वालीच्या वैभवाच्या आणि पडझडीच्या खाणाखुणा शोधणारा हा खास लेख...

खुलताबाद इथला औरंगजेब दर्गा. भरभक्कम दगडी पायऱ्या चढून तितक्याच भल्याथोरल्या दरवाजातून आत प्रवेश केल्यावर, चारही बाजूला ओसऱ्या असलेलं एेसपैस अंगण लागतं. एका बाजूला दोन भलेथोरले वृक्ष शांत-निवांतपणा देणारी सावली धरत उभे दिसतात. तिथेच मुख्य दर्ग्याकडे जाणाऱ्या ओसरीवर रहिमुद्दीन बुऱ्हाणी आणि त्यांची पार्टी हार्मोनियम, ढोलक काढून तयार बसलेली असते. शेख अब्दुल्ला हार्मोनियमवर बोटं फिरवत माहोल तयार करताहेत, तर शेख अब्दुल समद ढोलकीचा ताल ठीकठाक करण्यात मग्न आहेत. ढोलक आणि हार्मोनियम तयार होताच पांढऱ्या शुभ्र पेहरावात हार्मोनियमशेजारी बसलेल्या रहिमुद्दीन बुऱ्हाणी यांची क्षणात समाधी लागते. डोळे मिटतात आणि थेट वरच्या पट्टीतली साद कानी पडते...
मै आऊँ मदिना मेरी औकात नही है, सरकार बुला ले तो बडी बात नही है...
अस्सल कव्वालीचा बाज असलेला रहिमुद्दीन यांचा आवाज टिपेला जाऊन गिरक्या घेत अलगद खाली येतो आणि मग सुरू होते, ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तींची कव्वाली,
‘जमाल ए मुहंमद की जलवागरी है’...
कव्वालीच्या शब्दांमधून ख्वाजाचं (अाध्यात्मिक गुरू) सुरू असलेलं गुणगान आपण शांतपणे डोळे मिटून ऐकू लागलो, की ढोलकचा ठेका, हार्मोनियमची संगत, कोरस आणि सोबतीला खास लयीत वाजणाऱ्या टाळ्या पारलौकिकत्वाचा अनुभव देऊ लागतात... जगाचा विसर पडायला लावणारी उन्मनी अवस्थासुद्धा बहुधा तीच असते...
आले नबी है मेरा ख्वाजा, और मौला अली की जान है
मेरे घर का बच्चा बच्चा, ख्वाजा पे कुर्बान है...

सुफी परंपरेतून उगम पावलेली कव्वाली एकेकाळी महंमद तुघलकापर्यंत दिल्ली आणि उत्तरेपुरतीच मर्यादित होती. ती नंतर ११व्या शतकात महाराष्ट्रात आली. महंमद तुघलकासोबत आलेल्या, पण आमीर खुसरोच्या जवळच्या बाशिंद्यांपैकी एक असलेल्या राजू कत्ताल यांनी खुलताबादला कव्वाली आणली. अध्यात्माच्या मार्गानं जीवनाचं ध्येय  गाठण्याची शिकवण देणारी संतपरंपरा असलेल्या महाराष्ट्रात कव्वाली हा कलाप्रकार सहज रुजला. पोथीनिष्ठ अध्यात्म बाजूला सारत मनाचा थांग शोधणारी ही कव्वाली मग पार विजापूर, हैदराबादपर्यंत पोहोचली. खरं तर दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यात जन्मलेली कव्वाली बुऱ्हानुद्दीन गरीब यांच्याकडे दख्खनची जबाबदारी दिल्यावर खुलताबादेत आली होती. पुढे बुऱ्हानुद्दीन गरीब यांचे बंधू जरजरी बक्ष यांनी ‘महफिल- ए-समाँ’ (मूळ अरेबिक शब्द समिआ. याचा अर्थ ऐकणे. संगीत कानाने ऐकायचे म्हणून समाँ ही संज्ञा) आयोजित करण्याची परंपरा सुरू केली. तेव्हा खुलताबाद हे दक्षिणेतील सुफी पंथीयांचे सर्वात मोठे केंद्र बनले. त्या वेळच्या खुलताबादच्या आठवणी जागवणारी तटबंदी, दरवाजे, खास मुगलकालीन छाप असलेली नक्षीकाम बांधकामे आजही शिल्लक आहेत.
 
याच चिंचोळ्या गल्ल्यांच्या शहरात, एके काळी सुफी कव्वालांच्या पार्ट्यांची संख्या मोठी होती. इथल्या गुलजार मोहल्ल्यात नुरुद्दीन मामू राहात. नवीन कलाम हाती आला की, ते त्याची सुरात बांधणी करायला घेत. तिकडे आझमशाहीपुऱ्यात कालू मियाँ राहात. त्यांना विविध रागांत कव्वाली बांधण्याचा छंदच होता. जुन्या बसस्टँड जवळच्या कोपऱ्यावरून आत शिरलं की, एका चिंचोळ्या गल्लीत ताजुद्दिनसाब राहात. महाराष्ट्रात कुठेही उरुस अथवा कव्वालीचे कार्यक्रम असले की, खुलताबादेच्या या मशहूर पार्ट्यांना आग्रहानं बोलावलं जाई. पण काळ बदलला, काळाबरोबर कव्वालीस उतरती कळा लागत गेली. रहिमुद्दीन बुऱ्हाणी सांगतात, दहा वर्षांपूर्वीपर्यंत इथं चार-पाच पार्ट्या होत्या. या पार्ट्यांचा विलक्षण प्रभाव असे. नुरुद्दीन कव्वाल, ताजुद्दीन साब, अब्दुल गनी, सलीमुद्दीन कव्वाल, अब्दुल कादीर, कालु शाह आदी पट्टीचे कव्वाल होते, तोवर ही परंपरा तग धरून राहिली.
 
कधी काळी नुरुद्दीन कव्वाल यांच्या पार्टीत कोरसमध्ये गाणाऱ्या बुऱ्हाणी यांचीच एकमेव पार्टी आता उरली आहे. नुरुद्दीन कव्वालांना तीन मुलं आहेत. पण त्यांना कव्वालीत रस नाही. त्यांच्या साथीदारांचीही हीच स्थिती आहे. चार वर्षांपूर्वी येवल्याचा लहानगा असगर शहा कव्वालीच्या प्रेमात पडून बुऱ्हाणींच्या कोरसमध्ये सहभागी झाला, एवढेच काय ते समाधान. एके काळी महाराष्ट्रात जवळपास तीसेक पार्ट्या सुफी कव्वाली सादर करायच्या. आता त्यातल्या मोजक्याच उरल्या आहेत. नगरचे अयुब निजामी, मिरजेचे नौशाद निजामी यांचे नाव मोठे आहे. याशिवाय मुंबईतल्या भेंडी बाजारात ‘महफिल ए समाँ’ होत असतो, पण त्यात राज्याबाहेरूनही पार्टी येतात, असे बुऱ्हाणी सांगतात.

अर्थात, कव्वालीबाबत वातावरणात एक प्रकारची उदासी असली तरीही, आसपासच्या परिसरातील दर्गे, अहमदनगर, पुण्याजवळचं सुपा आणि मिरजेचा ख्वाजा शब्ना मिरा येथील उरुसांत ‘महफिल ए समाँ’ची परंपरा आजही श्रद्धेने सांभाळली जाते. मिरजेत तर दर्ग्यात चादर चढवताना कव्वाली गाण्याचा मान खुलताबादच्याच कव्वालांना दिला जातो. पैगंबरांची, संतांची स्तुती असणाऱ्या रचना कव्वालीच्या माध्यमातून गायल्या जातात. शब्दकळा आणि संगीताच्या माध्यमातून थेट ध्यानाच्या अवस्थेत नेण्याचे काम कव्वाली करते. एरवी, देहभान हरपलेल्या श्रोत्यांना अाध्यात्मिक अनुभूती मिळाल्यावर त्यांच्याकडून मिळणारी बक्षिसी हे कव्वालांचे उत्पन्न असे. परंतु, सच्चा कव्वाल कधीच पैसे मागत नसतो, हे बुऱ्हाणी इथे अधोरेखित करतात. मात्र आता बिदागीचं बोलणं करावंच लागतं; कारण प्रवास, साथीदारांचं मानधन या बाबी महत्त्वाच्या असतातच, हे अपरिहार्य वास्तवही ते बोलून दाखवतात. मधल्या काळात नुरुद्दिन मामूंच्या निधनानंतर बुऱ्हाणींनी कव्वाली गायन बंद केलं होतं. पण श्रोत्यांच्या आग्रहाखातर त्यांना मिरजेच्या उरुसात बोलावणं आलं. मामू ते कधी टाळत नसत. मग बुऱ्हाणींनी उस्तादजींचं स्मरण म्हणून मनोभावे कव्वाली सादर केली. पुन्हा कव्वाली गायनाचा त्यांचा प्रवास सुरू झाला. 
 
एकीकडे बदलत्या काळाचा संदर्भ घेता, गेल्या दोन दशकांत सुफी संगीताचं पारंपरिक रूप जाऊन त्याला व्यावसायिक रूप आल्याचं दिसलं. कव्वाली लिहिणारे कमी झाले. कधी काळी खुलताबादेत आपला कलाम लिहून कव्वालांकडे सुपूर्द करणारे अनेक ज्येष्ठ हौशी लोकही होते, तर काही केवळ याच क्षेत्रात रमणारेही होते. आता सिल्लोडचे सय्यद अब्बास हुनर सिल्लोडी आणि इद्रिस अहमद यांच्यासारखे दोन-तीन जण सोडले, तर कव्वाली आणि तीही सुफी लिहिणारे निदान खुलताबादच्या संदर्भात संपल्यातच जमा आहेत. असे असले तरी आजही कव्वालीचा जनक असलेल्या आमीर खुसरोची ‘मन कुन्तो मौला (देवांचा देव), फा हजा अली’उन (प्रेषिताचा दूत) मौला’ (जो माझा स्वीकार करील, अलीसुद्धा त्याचा स्वीकार करील.) ही गतकाळातली कव्वाली आजही लोकप्रिय आहे. सध्या काळ आला आहे, तो स्टेजवर सादर होणाऱ्या कव्वालीचा. त्यातही खुलताबादचं महत्त्व सांगणाऱ्या या कव्वालीस आजही आवर्जून मागणी आहे. नुरुद्दीन शेख यांची ही रचना अतिशय गोड आहे. खुलताबादच्या आजुबाजूला असणाऱ्या दर्ग्यांमुळं इथल्या सुफी अाध्यात्मिक वातावरणाचा पगडा त्यात जाणवतो.
खुलताबाद जन्नत है, अर्श का ये झीना है, सब जमाना कहता है, सानी ए मदिना है
पैरहन यही पर है काली, कमलीवाले का, काबा है गरिबों का और यही मदिना है

कव्वालीचे अभ्यासक डाॅ. मुस्तजीब खान यांच्या म्हणण्यानुसार, आजही हजरत निजामुद्दीन यांची चिश्तीया घराण्याची कव्वाली अधिक गायली जाते. दक्षिणेकडे निजामी पद्धतीची कव्वाली गायली जाते. कव्वाली हा कलाप्रकार गंगा-जमुना तहजीबचं आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे कव्वाली हरपणं म्हणजे, आपलं जे बहुसांस्कृतिक सामाजिक व्यवस्थापन होतं, ते जाऊन एकसुरी नि एककल्ली समाज आकारास येणं आहे. खरं तर बाॅलीवूडमध्ये कव्वालीने मनोरंजनाचे रूप घेतल्याने मूळ कव्वाली गांभीर्याने जोपासली गेली नाही. दुसरीकडे पारंपरिक कव्वाली जतन करण्याचे, त्याचे दस्तऐवजीकरण करण्याचेही काम झाले नाही. स्टुडिओतली कव्वाली समाँ बांधण्यात अपयशी ठरली, त्याचंच पुढचं रूप स्टेजवरच्या कव्वालीत पाहायला मिळू लागलं. ते निव्वळ मनोरंजनाच्या पातळीवरच आहे. आता तर मिनिटांच्या हिशेबावर काही ठिकाणी कव्वाली गायली जाते. त्यात अनेकविध आधुनिक वाद्यं आली आहेत. मूळ सुफी कव्वालीत ढोलक आणि सारंगी असे. नंतर सारंगीची जागा हार्मोनियमनं घेतली. वाद्यांची कमी संख्या, टाळ्यांचा ताल यातून कव्वाल आणि श्रोते यांनी अाध्यात्मिक उंची गाठण्याचा प्रकारच आता कमी झाला आहे. दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातले अभ्यासक डॉ. रुस्तम भरुचा यांनीही लोककलेच्या ऱ्हासाचा आलेख मांडला आहे. ते म्हणतात, लोककला बाजारकेंद्रित केल्यास फायदेशीर होतील, असा अविचार करून त्यात बदल करणे सुरू झाल्यापासून अस्सल लोककला आपला आत्मा हरवत चालल्या आहेत. कव्वालीच्या बाबतीत हे म्हणणं तंतोतंत लागू आहे.

कव्वालीचे अभ्यासक असेही म्हणतात की, महाराष्ट्रातला मुस्लिम समाज हा स्थानिकांसोबत समरस झालेलाच होता. त्याचं प्रत्यंतर सुफीचा प्रभाव वाढण्यात झाला. पण नंतर विशेषत: गेल्या काही दशकांत संगीत निषिद्ध ठरवणाऱ्या कट्टरवादी तब्लीगींचा प्रभाव समाजावर वाढत असल्यानं सुफी कव्वालीकडे समाजाचा असणारा ओढा कमी होत चालला अाहे. एका बाजूला कव्वालीला लागलेली उतरती कळा आणि दुसऱ्या बाजूला खुलताबादेतली रहिमुद्दीन बुऱ्हाणी यांची एकमात्र कव्वाल पार्टी. या पार्टीची कव्वालीच्या रूपाने रुजलेल्या कलेच्या अस्तित्वासाठी चाललेली एकाकी धडपड रसिक मनांना नक्कीच टोचणी देते. पण डॉ. खान म्हणतात त्याप्रमाणे, संगीत विभागात भक्ती परंपरेचं संगीत शिकवताना त्यात सुफी कव्वालीचा अंतर्भाव केला आणि अशा प्रकारचं संगीत शिकवणारी केंद्र आकारास आली तर कव्वालीची वैभवशाली परंपरा वाहती राहील, हा आशावाद आहेच की मनात. आखिर, उम्मीद वक्त का सबसे बडा सहारा है... गर हौसला है तो हर मौज में किनारा है...
 
» संतपरंपरा असलेल्या महाराष्ट्रात कव्वाली हा गायनप्रकार सहज रुजला. पोथीनिष्ठ अध्यात्म बाजूला सारत मनाचा थांग शोधणारी ही कव्वाली मग पार विजापूर, हैदराबादपर्यंत पोहोचली... खरं तर दिल्लीच्या निजामुद्दीन औलिया यांच्या दर्ग्यात जन्मलेली कव्वाली बुऱ्हानुद्दीन गरीब यांच्याकडे दख्खनची जबाबदारी दिल्यावर खुलताबादेत आली होती.

अमेरिकी विद्यापीठात कव्वालीवर संशोधन
अमेरिकेतल्या टेनेसी राज्यातल्या व्हॅन्डरबिल्ट विद्यापीठाच्या जेम्स रिचर्ड नेवेल यांनी महाराष्ट्रातील सुफी कव्वालीवर संशोधन केलं. सुप्याचा दर्गा, अहमदनगरच्या मेहराबादमधील मेहेरबाबा ट्रस्टचे साधना केंद्र आणि खुलताबाद येथे येऊन महाराष्ट्रातील कव्वालीवर प्रकाश टाकताना त्यांनी कव्वालीच्या कलामांत स्थानिक संदर्भ, शब्द यांचा वापर होत सुफी कव्वालीनं व्यापक रूप घेतल्याचं म्हटलं आहे. त्यात त्यांनी खुलताबादचे तुराब निजामी या ज्येष्ठ कव्वालासोबत कव्वालीचे जतन करण्यासाठी कव्वालीचे प्रशिक्षण देणारे केंद्र सुरू करण्यावर चर्चा केली आहे.
 
लेखकाचा संपर्क क्रमांक : ९८८१४६२४९४
maahesh1@gmail.com
बातम्या आणखी आहेत...