आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रेल पुस्तकांचा खजिना (महेश घोराळे)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इयत्ता पाचवीतल्या एका विद्यार्थ्याने जुना पुस्तकाचा कागद उचलला. त्या कोऱ्या पानावरील उठावदार ठिपक्यांवर तो नुसतं बोट फिरवत होता, तसे त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटत होते. त्याचा हातचा पांढरा कागद अन् चेहऱ्यावरचे भाव पाहणं यात मी गुंग झालो. ब्रेल लिपीच्या या कागदावरील कथेत तो चांगलाच रमला होता. मी दुसऱ्या एकाकडे पाहिले तोही याच्यासारखाच वाचनात गुंग होता. असे विद्यार्थी अमरावतीच्या डॉ. नरेंद्र भिवापूरकर अंध विद्यालयात नेहमीच पाहायला मिळतात. येथील ब्रेल ग्रंथालय म्हणजे दृष्टी नसतानाही सृष्टी पाहणाऱ्यांसाठी, धडपडणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अनमोल खजिना आहे. राज्यभरात विखुरलेले संस्थेचेे विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक या खजिन्याचा विनामूल्य लाभ घेतात. दृष्टिबाधितांच्या शिक्षणासाठी ४९ वर्षांपासून प्रभावी कार्य करणाऱ्या या संस्थेने ब्रेल ग्रंथालयाची जोपासनाही तेवढ्याच आत्मीयतेने केली आहे. यंदा संस्था सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे.
मराठी, हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत भाषेतील महत्त्वपूर्ण ग्रंथ या वाचनालयात उपलब्ध आहेत. ब्रेल लिपीमधील प्रसिद्ध मासिके, साप्ताहिके, पाक्षिके येथे नियमित उपलब्ध होतात. विदर्भातील सर्वात संपन्न असा या वाचनालयाचा चेहरा आहे. अलीकडे अंध विद्यार्थ्यांना ऑडिओ स्वरूपातून माहिती उपलब्ध होत असली तरी ब्रेल लिपीतील निवडक पुस्तकांसाठी या वाचनालयाचा आधार घ्यावाच लागतो. शालेय पाठ्यपुस्तकांशिवाय विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची गोडी लागावी यासाठी संस्थेने पुढाकार घेऊन कॉम्प्युटराइज मिनी ब्रेल प्रेसही संस्थेत सुरू केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची गुरुदेव प्रार्थना, शालेय विद्यार्थ्यांसाठी गोष्टींची पुस्तके, कथासंग्रह, व्यक्तिचरित्र अशी विविध पुस्तके मिनी ब्रेल प्रेसवर तयार केली आहेत.
विनामूल्य पुस्तक देवघेव
शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्यावरील पुस्तकही येथे तयार करण्यात आले आहे. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या अंध विद्यार्थ्यांंसाठी नवनवीन मासिके आणि गोष्टींची पुस्तके येथे नियमित उपलब्ध होतात. संगीत, नृत्य, वादन आणि गायन कलेच्या साधनेत मग्न दिसणारे विद्यार्थी ही ओळख जपत संस्थेने वाचनाची आवडही विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली आहे.
ब्रेल लिपीचा उठावदारपणा लवकर मिटतो. त्यामुळे हे पुस्तके जाणीवपूर्वक हाताळावी लागतात. याची काळजीही विद्यार्थी घेतात. या अंध विद्यामंदिरातून विदर्भासह विविध जिल्ह्यांतील हवे ते पुस्तक विनामूल्य घेऊन जातात नि परतही आणून देतात.
ब्रेल लिपीतील कथा, कादंबऱ्या आणि नाटकं
अंधमहाविद्यालयाच्या वाचनालयात मराठी, इंग्रजी, हिंदी आणि संस्कृत भाषेतील कथा, कादंबऱ्या, नाटकं या प्रकारातील साहित्य आहे. संस्कृतमध्ये गीता, तुलसीरामायण, वेदावरील पुस्तके असे धार्मिक ग्रंथ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महात्मा गांधी आदी महापुरुषांची चरित्रे असा संग्रह या ग्रंथालयाने जोपासला आहे. इंग्रजी आणि हिंदी लेखकांची दुर्मिळ पुस्तकेही येथे आहेत. मुख्याध्यापक नवनाथ इंगोले येथील ग्रंथसंपदेची माहिती देतात.
लिपीचा जनक ब्रेल हा देवासारखा
दृष्टिबाधितांसाठी१८२४ मधये उठावदार टिंबांची लिपी शोधून काढणारा फ्रेंच अंध शिक्षक ल्वी ब्रेल यांना ही मुलं देव मानतात. प्रकाशाची वाट दाखवणाऱ्या ब्रेल यांच्याविषयी कमालीची आत्मीयता त्यांच्यामध्ये पाहायला मिळते. ब्रेलची जीवनकथा आणि त्याने केलेल्या कार्याची जनू पूजाच ही मुले करतात. जानेवारी हा ब्रेल यांचा जन्मदिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी या संस्थेत साजरा होतो.
महेश घोराळे, औरंगाबाद
बातम्या आणखी आहेत...