औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या या वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स. जगभरातील पर्यटक, संशोधक आणि अभ्यासक या लेण्या बघण्यासाठी येतात. अमेरिकी आर्किटेक्ट रॉजर वॉग्लर त्यापैकीच एक. पण वेरूळच्या कैलासने त्यांच्यावर अशी काही भुरळ घातली की, त्यांची पावले वारंवार वेरूळला पडू लागली. यातूनच ‘दि कैलास अॅट एलोरा-अ न्यू व्ह्यू ऑफ अ मिसअंडरस्टूड मास्टरवर्क’ या पुस्तकाची निर्मिती झाली. रॉजर यांनी शब्दबद्ध केलेल्या या पुस्तकाला दिल्लीतील आर्किटेक्ट आणि छायाचित्रकार पियुष सक्सेरिया यांची साथ मिळाली आणि त्यातून हे सर्वांगसुंदर पुस्तक जगासमोर येऊ शकले. माहिती आणि चित्रांच्या माध्यमातून हे पुस्तक कैलासची सफर घडवताना लेणी जिवंत करते. इंटॅक आणि दिल्लीतील मॅपीन पब्लिशिंगने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
वेरूळच्या कैलास लेणीवर आतापर्यंत कितीतरी साहित्य प्रकाशित झाले आहे. परंतु रॉजर वॉग्लर यांची ही साहित्यकृती सर्वापेक्षा वेगळी आणि कैलासवर नव्याने प्रकाश टाकणारी ठरणार आहे. रॉजर वाॅग्लर हे १९६५मध्ये आयआयटी कानपूरचे ऑनसाइट कन्सलटंट म्हणून जबाबदारी बघत होते. नंतर ते अमेरिकेत परतले. तेथे युनिवर्सिटी ऑफ कनेक्टीकटच्या फॅसिलीटीज प्लानिंग विभागाचे संचालक पद भूषवले. न्यू हॅम्पशायर विद्यापीठाचे संचालक म्हणूनही काम केले. कानपूरमध्ये असताना पहिल्यांदा ते वेरूळला आले आणि कैलासच्या प्रेमात पडले. यानंतर ते सातत्याने येतच गेले. १९९२मध्ये निवृत्तीनंतर ते कैलासचेच झाले. या काळात त्यांची दिल्लीतील आर्किटेक्ट आणि जिओग्राफर पियुष सक्सेरिया यांची भेट झाली. पियुष उत्तम छायाचित्रकारही आहेत. गेल्या तीन-चार वर्षात तर दोघांनी कैलाससाठी स्वत:ला वाहून घेतले. त्यातूनच ‘दि कैलास अॅट एलोरा-अ न्यू व्ह्यू ऑफ अ मिसअंडरस्टूड मास्टरवर्क’ हे पुस्तक जन्माला आले. तीन वर्षांपूर्वी त्यांनी या पुस्तकाचे हस्तलिखित औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील इतिहास आणि प्राचीन भारतीय संस्कृती विभागाचे माजी प्रमुख डॉ. रा. श्री. मोरवंचीकर यांना तपासायला दिले. नंतर इंटकच्या औरंगाबाद चॅप्टरने यावरील पुस्तक प्रकाशित करण्याचे निश्चित ठरवले.
इंटकच्या औरंगाबाद चॅप्टरचे कन्वेनर आणि प्रसिद्ध उद्योजक मुकुंद भोगले सांगतात, यापूर्वीही इंटॅकने काही पुस्तके प्रकाशित केली आहेत. परंतु ती या क्षेत्रातील दिग्गजांपर्यंतच मर्यादित राहतात. इंटॅक मार्केटिंगला कमी पडते. अमेरिकेत एकदा त्यांना मॅपीन पब्लिशिंगचे बिपिन शहा भेटले. शहा आणि मल्लिका साराभाई मॅपीनचे संचालक आहेत. मॅपीन कला आणि संस्कृतीच्या प्रकाशनांसाठी ओळखले जाते. भोगले यांनी त्यांना कैलासवरील पुस्तकाचा विषय मांडला. त्यांनी लगेच होकार दिला. त्यानुसार दोन वर्षांपासून या अनोख्या पुस्तकाचे काम सुरू झाले. याचे कव्हर पेज आणि टायटल तयारच होते. फ्रँकफर्टच्या बुक फेअरमध्ये त्यास दोन वर्षांपासून पसंती मिळत आहे. मॅपीन या पुस्तकाचे भारतासह अमेरिका, युरोप आणि पूर्व आशियामध्ये वितरण करणार आहे.
१४२ पानांच्या दि कैलास अॅट एलोरा...ची मांडणी कैलास लेणीची सहल घडवणारी आहे. लेणीत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने ती फिरताना उजव्या बाजूने बाहेर पडेपर्यंतचा प्रवास यात साकारला आहे. एका एका टप्प्यावर लेणीचे नवीन रहस्य उलगडत जाते. लेणीची आतापर्यंत बाहेर न आलेली चित्रे याची वैशिष्ट्ये आहेत. मुकुंद भोगले सांगतात, कैलासवर आतापर्यंत धार्मिक, स्थापत्यशास्त्राच्या नजरेतून बरेच काही लिहिले गेले आहे. रॉजर यांनी अशा १०-१२ पुस्तकांचा अभ्यास केला आहे. परंतु प्रत्यक्ष कैलासच्या आर्किटेक्टला काय वाटले असावे? हा धागा धरून दोघांनी हे काम पूर्णत्वास नेले आहे. कॉफीटेबल आकाराचे हे पुस्तक आंतरराष्ट्रीय दर्जाचे झाले आहे. इंपोर्टेड आर्ट पेपरवर छपाई करण्यात आली आहे.
पुस्तकाचे नाव:
दि कैलास अॅट एलोरा - अ न्यू व्ह्यू ऑफ अ मिसअंडरस्टूड मास्टरवर्क
लेखक- रॉजर वॉग्लर आणि पीयूष सक्सेरिया
प्रकाशक- इंटॅक आणि मॅपीन पब्लिशिंग
किंमत- मूळ किंमत– २२५० रुपये
सवलतीत १८०० रुपये
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळच्या लेण्या या वर्ल्ड हेरिटेज मॉन्युमेंट्स. अमेरिकी आर्किटेक्ट रॉजर वॉग्लरना वेरूळच्या कैलासने अशी काही भुरळ घातली की, त्यांनी ‘दि कैलास अॅट एलोरा-अॅ न्यू व्ह्यू ऑफ अ मिसअंडरस्टूड मास्टरवर्क’ या पुस्तकाची निर्मिती केली.
या पुस्तकाचे अधिकृत प्रकाशन आज २६ जुलै रोजी वेरूळमध्ये होत आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सहकार्य केले असून महामंडळाच्या वेरूळ अभ्यागत केंद्राच्या ऑडिटोरियममध्ये हा सोहळा होत आहे. या प्रसंगी एमटीडीसीचे कार्यकारी संचालक पियुष जैन नैनुटीया, इतिहासतज्ज्ञ रा. श्री. मोरवंचीकर, तसेच लेखक रॉजर वॉग्लर आणि पियुष सक्सेरिया सहकुटुंब उपस्थित राहतील. या निमित्त पुस्तकातील चित्रांचे प्रदर्शन आणि कैलासचा हेरिटेज वॉकही आयोजित करण्यात आला आहे. अौरंगाबादनंतर २७ रोजी पुण्यात, तर ३० रोजी दिल्लीत प्रकाशन समारंभ होणार आहे. पुस्तकाची मूळ किंमत २२५० रुपये आहे. गेल्या चार महिन्यांपासून ते ऑनलाइन १२५० रुपयात उपलब्ध होते. या काळात १४० कॉपीची बुकिंग झाली आहे. शिवाय २०-२५ जणांनी औरंगाबादेत इंटॅककडे मागणी नोंदवली. प्रकाशनाच्या दिवशी हे पुस्तक सवलतीत १८०० रुपयात उपलब्ध असेल.
(mahitri@gmail.com)