आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'प्रॅक्टीकल' शिक्षण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उच्च शिक्षणाच्या, पदवीच्या नुसत्या कागदी गुंडाळ्या उपयोगाच्या नाहीत. घेतलेलं शिक्षण प्रत्यक्ष व्यवहारात कसं उपयोगात आणायचं, याची माहिती नसेल तर सगळं ज्ञान वाया जातं.
विद्यार्थ्यांची नेमकी हीच गरज ओळखून त्या संदर्भात काम करणाऱ्या रजनी मुदकवी यांची ओळख...
महाविद्यालये, विद्यापीठात मिळणारे उद्योग शिक्षण विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवण्यास कमी पडते. थिअरीमध्ये पटापट उत्तरे देणारी मुले प्रत्यक्ष कामात कमी पडतात. एका फार्मा कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागात ३५ वर्षे काम करत उपमहाव्यवस्थापक पदावर पोहोचलेल्या औरंगाबादच्या रजनी मुदकवी यांना नवीन उमेदवारांच्या मुलाखती घेताना ही बाब कायम खटकत होती. मुलेे पदवी तर घेतात पण कौशल्यात मागे राहतात, ही बाब लक्षात घेऊन त्यांनी मुलांच्या कौशल्य विकासासाठी काम करण्याचे ठरवले. कंपनीत जीएम पदाच्या शर्यतीत असताना राजीनामा देऊन विद्यापीठांनाही लाजवेल अशी अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केली. येथे फ्रेशरसोबतच कंपनीतील विद्यमान कर्मचारी प्रशिक्षण घेऊन स्किल अपग्रेड करत आहेत.
रजनी मुदकवी मूळ सोलापूरच्या. तेथेच बीएस्सीपर्यंत शिक्षण झाले. अशोक मुदकवी यांच्याशी विवाहानंतर त्या औरंगाबादेत आल्या. बीएस्सीला केमिस्ट्री असल्याने उद्योग क्षेत्रात करिअरची संधी होती. १९८६मध्ये त्यांना फोर्ब्सच्या रिसर्च सेंटरमध्ये नोकरी मिळाली. वर्षभरानेच मुलगा मैत्रेय याच्या जन्मामुळे ती सोडावी लागली. दोन वर्षांनंतर १९८६मध्ये त्या बल्क ड्रग्स तयार करणाऱ्या हरमन फिनोकॅम कंपनीच्या क्वालिटी कंट्रोल विभागात रुजू झाल्या. १९८९ ते १९९३ ही चार वर्षे वोखार्टमध्ये काम केले. १९९३पासून परत हरमनमध्ये प्रमोशनवर गेल्या आणि उपमहाव्यवस्थापक पदापर्यंत पोहोचल्या.
हरमनमध्ये नवीन नियुक्त्यांच्या वेळेस एचआरसोबत त्यांनाही मुलाखती घेण्यासाठी बोलावले जायचे. या बाबतीत त्या अगदी चोखंदळ असायच्या. औषधांची कंपनी असल्याने येथे बीएस्सी, एमएस्सी, बीफार्म, एमफार्म या शाखेतील मुले नाेकरीसाठी येत. मुलाखतीत उत्तीर्ण झाल्यानंतर त्या उमेदवारांना प्रयोगशाळेत प्रत्यक्ष एखादी चाचणी घ्यायला लावायच्या. येथे उमेदवाराचे बिंग फुटायचे. मुलाखतीत खूप बोलणारी मुलं प्रत्यक्ष कामात तोंडावर पडायची. याचे कारण म्हणजे कॉलेज, विद्यापीठ स्तरावर मुलांच्या थिअरीची चांगली तयारी केली जाते. पण प्रात्यक्षिक त्यांना काही शिकवले जात नाही. साध्या प्रश्नांची उत्तरेही त्यांना देता येत नाहीत. मुलांशी संवाद साधल्यानंतर त्यांना याची कारणे समजली. शिक्षणसंस्थांमध्ये उपकरणे कालबाह्य झालेली आहेत. त्यांचा उद्योगात काहीच उपयोग नाही. कॉलेज, विद्यापीठात अजूनही मॅन्युअली काम चालते, तर उद्योगात ऑटोमेटेड तंत्रज्ञान आले आहे. काही संस्थांत उपकरणे आहेत, पण ती चालवणारी माणसे नाहीत. काही उपकरणं वापराविना खराब झाली आहेत. काहींचे मेंटेनन्स काँट्रॅक्ट संपले आहेत. काहींचे छोटे पार्ट खराब झाले आहेत. ते विकत आणण्यासाठी संस्थांकडे कोणतेच हेड उपलब्ध नाही. ही कारणं थक्क करणारी असली तरी यामुळे मुलांच्या करिअरवर परिणाम होत आहे. मुलांना सगळेच नव्याने शिकवणे कंपन्यांना परवडणारे नाही. त्या ऐवजी थोडे अधिक वेतन देऊन मुंबई, पुणे किंवा दुसऱ्या राज्यातून उमेदवार आणणे कंपन्यांना सोपे वाटते. करिअरमधील ३५ वर्षे रजनी मुदकवी यांनी हे अनुभव घेतले.
हरमनमध्ये डीजीएम पदावर असणाऱ्या रजनी यांना जीएम पदावर प्रमोशन मिळणार होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी नोकरी सोडून शिक्षण संस्था आणि इंडस्ट्रीतील गॅप दूर करण्यासाठी काही करण्याचे ठरवले. केमिकल किंवा फार्मा इंडस्ट्रीसाठी आवश्यक कौशल्ये शिकवणारी प्रयोगशाळा सुरू करण्याचे त्यांनी ठरवले. यासाठी बीई, एमबीए (एचआर) झालेला मुलगा मैत्रेय याची साथ मिळाली. तो केंद्र शासनाच्या प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत तरुणांसाठी शोध अॅडव्हान्टेक हे अॅडव्हान्स ट्रेनिंग स्कूल चालवत आहेत. या बॅनरखालीच त्यांनी शोध अॅडव्हान्टेक लॅबोरेटरी सुरू करण्यासाठी डिसेंबर २०१५ मध्ये प्रयत्न सुरू केले. मुलांना इंडस्ट्र्ीत काम करण्याचा फील मिळावा, यासाठी त्यांनी शहरात जागा न घेता चिकलठाणा एमआयडीसीतील एक बंद शेड निवडला. इंडस्ट्रीतील विद्यमान आणि भविष्यातील गरजा ओळखून ४० लाख रुपये खर्चून १८ अद्ययावत उपकरणे आणली. इमारतीचा कायापालट करण्यासाठी २५ लाख रुपये खर्च आला. ६५ लाखात संपूर्ण सेटअप तयार झाला. या ठिकाणी यूव्ही स्पेक्ट्रोफोटोमीटर, एचपीएलसी अॅड जीसी, टीएलसी चेंबर, टॅब्लेट डिसइंटीग्रेटर, केएफ ऑटो टायट्रेटर, पीएच मिटर, कंडक्टीव्हीटी मिटर, वॉटर बाथ, मफेल फर्नान्स, स्टेबिलिटी चंेेबर, हार्डनेस टेस्टर ही कंपन्यांत लागणारी अत्याधुनिक उपकरणे आणण्यात आली आहेत.
रजनी मुदकवी यांची ही प्रयोगशाळा विद्यमान कर्मचारी आणि विद्यार्थ्यांसाठी पर्वणी ठरत आहे. कंपन्यांत कार्यरत कर्मचारी स्किल अपग्रेडेशनसाठी येथे प्रशिक्षण घेत आहेत. तर कॉलेजातील अंतिम सेमिस्टरला असणारी मुले नोकरीसाठी तयार होण्याकरिता येथे येत आहेत. रजनीताई आणि मैत्रेय कॉलेज, विद्यापीठात सेमिनार, वर्कशॉप्सद्वारे याची माहिती देतात. या मुलांसाठी त्यांनी एक दिवसाचा खास एक्स्पोलर युअर लॅब हा कार्यक्रम तयार केला आहे. यात सर्व उपकरणांची थिअरी आणि प्रॅक्टिकल माहिती दिली जाते. याशिवाय ५ उपकरणांचे एक-एक मॉड्युल तयार करून अत्यल्प शुल्कात ती मुलांना शिकता येतात. प्रयोगशाळेला एनएबीएलचे मानांकन मिळवण्यासाठी त्यांचे पत्रव्यवहार सुरू आहेत. हे मानांकन मिळाले तर खाजगी नमुन्यांची चाचणी येथे शक्य होणार आहे. तर ही संपूर्ण प्रयोगशाळाच प्रमोद महाजन कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत आणण्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. तसे झाल्यास कौशल्य विकासाचा हा उपक्रम विनामूल्य राबवता येईल, असे रजनीताई सांगतात.
mahitri@gmail.com
बातम्या आणखी आहेत...