आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजपक्षे की राज‘भक्ष्ये’ ?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीलंकेच्या उत्तरेत आलेल्या महापुराने भीषण हत्याकांड उघडकीस आणले आहे. सुमारे चाळीस हजार ते एक लाख यापर्यंत कितीही आकडा सांगता येईल, असे हे मानवी सांगाडे आहेत. त्यात अनेक लहान मुले, मुली आणि महिलाही आहेत. काही साड्यांच्या चिंध्याही या पुराच्या पाण्याने वर आणल्या आहेत. त्यामुळे या प्रश्नाला गंभीर स्वरूप प्राप्त झाले आहे. श्रीलंकन लष्कराचा क्रमांक एकचा शत्रू असलेल्या ‘लिबरेशन टायगर्स ऑफ तामिल इलम’ (एलटीटीई) या संघटनेच्या दहशतवाद्यांनी जमिनीत पुरलेले सुरुंग काढण्याचे काम त्या वेळी संयुक्त राष्ट्रसंघाच्या मार्गदर्शनाखाली चालू होते, पण तेही अर्धवट स्थितीत राहिले असण्याची शक्यता आहे. मात्र, याच परिसरात सिंहली जनतेला हेतुत: पर्यटनासाठी आणले जात आहे.

हा भाग म्हणजे तामिळ वाघांनी लढवलेला शेवटचा बालेकिल्ला होता. मुल्लीवाईक्कळ असे या ठिकाणाचे नाव आहे. तिथे रोज बसगाड्या भरभरून पर्यटक येतात आणि आपल्या सैन्याने ‘शत्रूचा पाडाव’ कुठे आणि कसा केला, ते त्यांना दाखवले जाते. या प्रकारास ‘युद्ध पर्यटन’ असे नावही देण्यात आले आहे. याच ‘युद्ध पर्यटन क्षेत्रा’त येणा-या पर्यटकांची सोय व्हावी, यासाठी ‘लगून्स एज’ नावाचे हॉटेल उभे करण्यात आले आहे. ते पूर्ण सागवानी लाकडापासून बनले आहे. समुद्रापासून काही अंतरावर प्रवाळ खडकांनी अलग झालेल्या या जमिनीवर जो फलक आहे, तो आपल्याला सांगतो, की ‘या पाहा आणि नाचा. याच ठिकाणी हजारो योद्धे आणि दहशतवादी तसेच इतर यांना आपले प्राण गमवावे लागले.’ त्यालाही कुणी हरकत घ्यायचे कारण नाही, पण हे हॉटेल आज ज्या ठिकाणी आहे, तेथे ‘एलटीटीई’चा नेता व्ही. प्रभाकरन मारला गेला.

या हॉटेलमध्ये येणा-यांना आपला आनंद साजरा करता यावा, यासाठी नृत्याची खास सोय करण्यात आली आहे. साधारणपणे या हॉटेलात एका रात्रीच्या मुक्कामाचा दर 100 डॉलर एवढा आहे. ‘एलटीटीई’चा शेवट मे 2009मध्ये झाला, पण त्या आधी सुमारे दीड लाख तामिळ नागरिकांना उपासमारीने याच भागात तडफडावे लागले होते. ते ना युद्धात होते, ना कोणत्याही प्रकारच्या वादात. त्यांना सिंहलीबहुल भागात येऊ दिले गेले नाही आणि रोजच्याच संघर्षाने त्यांचे जिणे अवघड बनवले होते. त्या वेळी एका कॅथॉलिक धर्मगुरूने पोपना लिहिलेल्या पत्रात या घटनेचा ‘आत्यंतिक वेदनादायी’ असा उल्लेख केला आहे. तो म्हणतो, की एका रात्रीत मी तीन हजार जण ठार झाल्याचे आणि चार हजार जण जखमी अवस्थेत विव्हळत असल्याचे पाहिले होते. आपण हे हल्ले नागरिक राहत असलेल्या भागात कधीही केलेले नाहीत, असे एकीकडे श्रीलंका सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, वस्तुस्थिती वेगळी असल्याचे उघडकीस आलेल्या हाडांच्या सांगाड्यांमुळे आणि मानवी कवट्यांमुळे स्पष्ट झाले आहे.

गेल्या साडेतीन वर्षांपासून मुल्लीवाईक्कळमध्ये कुणाही सामान्य नागरिकाला प्रवेश बंद होता. तिथे लष्कराचे साम्राज्य होते. याच भागात असलेले प्रभाकरनचे लहानपणापासूनचे घर लष्कराने उद्ध्वस्त करून टाकले आहे. हजारोंची कत्तल याच प्रदेशात करण्यात आली असूनही त्यासंबंधी एका अक्षरानेही सांगितले जात नाही. आता मूळ मुद्दा हा की हे प्रकरण आताच का निघाले? तर शिरानी बंदरनायके श्रीलंकेच्या पहिल्या महिला सरन्यायाधीश. यांची संसदेच्या सार्वजनिक चिकित्सा समितीमार्फत चौकशी करून त्यांना पदच्युत करण्याचा पराक्रम श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्षे यांनी केला आहे. यांनी सुमारे दोन वर्षांपूर्वी नगरविकास खात्याने केलेली ‘पवित्र जागांविषयी’ची घटना दुरुस्ती फेटाळून लावली होती. ही घटना दुरुस्ती कुणासाठी होती, हा प्रश्न विचारण्यात हशील नाही. कोणतीही जागा पवित्र ठरवून ती ताब्यात घेण्याचा अधिकार संबंधित मंत्रांना देण्याविषयीचे हे विधेयक असेच संसदेने संमत केले होते. हा कायदा संबंधित नगरपालिकांनीही आपल्या अखत्यारित अमलात आणावा, यासाठी तो संसदेचे सभापती चमल राजपक्षे यांनी प्रांतिक असेंब्लीकडे पाठवला होता.

त्यापैकी पूर्व प्रांतिक कौन्सिलने तो फेटाळून लावला आणि सर्वोच्च न्यायालयाकडे या कायद्याच्या फेरतपासणीचा अर्ज केला. कोणत्याही जागेला पवित्र ठरवायचे, ती ताब्यात घ्यायची आणि त्या ठिकाणी कारखाना, घर वा हॉटेल किंवा अन्य कोणताही उद्योग टाकायचा अधिकार न्यायव्यवस्थेत कोणालाच नाही, असा निकाल बंदरनायके यांनी देऊन राजपक्षे यांची संभाव्य दुकानदारी बंद केली, हे त्यांच्या पदच्युतीमागे असलेले खरे कारण आहे.

(जाता-जाता : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांची वागणूक राजपक्षे यांच्यापेक्षा वेगळी नाही. आचारविचार स्वातंत्र्याचे मारेकरी सगळीकडे एकसारखेच कसे असतात, त्याचे ‘विश्वरूप’ चेन्नईत आणि तिकडे कोलंबोत आम जनतेला दिसले आहे.) arvindgokhale@gmail.com