आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Major Anita Padman Article About Woman In Indian Army

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ट्रॉफी ऑफिसरच्या पलीकडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवाचा प्रजासत्ताक दिन भारतातल्या सर्व महिलांसाठी अतिशय अभिमानाचा होता. माझ्यासारख्या अनेकींसाठी तर खासच, कारण आम्ही आहोत निवृत्त महिला अधिकारी. अभिमान का? तर भारताच्या प्रजासत्ताकाला तब्बल ६५ वर्षं पूर्ण झाल्यानंतर, पहिल्यांदाच भूदल, नौदल व हवाई दल या तिन्ही सेनादलांतल्या महिलांची एक स्वतंत्र तुकडी प्रजासत्ताक दिनाच्या संचलनात होती. ताठ मानेने चालणार्‍या या स्मार्ट महिलांची शिस्त व सामर्थ्य त्यांच्या संचलनातून अवघ्या जगाने पाहिले.

ते पाहताना माझ्या डोळ्यांत पाणी उभे राहिले व घशात आवंढा आला, यात नवल ते काय! पण याला आणखी एक कारण आहे. मला राजपथावरून असे संचलन करून आपल्या सशस्त्र सेनादलांचे प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींना मानवंदना देण्याची संधी मिळाली नव्हती.

मी २००६ मध्ये, ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील अभ्यासक्रम पूर्ण करून भूदलात प्रवेश केला, तेव्हा माझ्यासोबत ७३ महिला अधिकारी होत्या. एका स्वतंत्र महिला अधिकार्‍यांच्या तुकडीसाठी हा आकडा जवळपास पुरेसा होता. मात्र, आमच्या आधीच्या बॅचेसमध्ये हा आकडा फारच कमी असे. या महिला अधिकार्‍यांना पासिंग आऊट परेडसाठी पुरुष अधिकार्‍यांच्या तुकडीतच सामावले जाई. म्हणूनच जेव्हा मी म्हणते की हा अभिमानाचा क्षण होता, तेव्हा मला त्यासोबत हेही आवर्जून म्हणायचंय, की आपलं सरकार, संरक्षण दल व धोरणकर्ते या सगळ्यांनाच अजून फार लांबचा पल्ला गाठायचा आहे.

सध्या संरक्षण मंत्रालयाच्या धोरणानुसार, महिलांना जास्तीत जास्त १४ वर्षं या नोकरीत काढता येतात. एवढ्या कमी कालावधीनंतर अर्थातच त्यांना निवृत्तिवेतन मिळत नाही, त्यासाठी किमान २० वर्षं नोकरी करावी लागते. महिलांना अजूनही ‘पर्मनंट कमिशन’ दिले जात नाही. त्यांना कमांड पोझिशन्ससाठी प्रशिक्षित केले जात नाही, तसेच त्यांना प्रत्यक्ष युद्धात सहभागी होता येत नाही.

तर मग अशा महिलेचा विचार करा, जी २२व्या वर्षी संरक्षण दलात जाते, १४ वर्षं इमानेइतबारे नोकरी करते, तिचा उमेदीचा काळ देशासाठी देते ती वयाच्या ३६व्या वर्षी अचानक बिनकामाची होते, तिला भविष्यात काय वाढून ठेवलंय, याचा अंदाज नसतो. संरक्षण दलांच्या जाहिरातींमधून सतत असे बिंबवण्यात येते, की ही नोकरी नाही, ती एक जीवनशैली आहे. परंतु महिला अधिकार्‍यांसाठी हे चित्र फारच वेगळे आहे.

जेव्हा या सैन्यातून निवृत्त झालेल्या अधिकारी महिला कॉर्पोरेट जगतात नोकरी शोधण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्या लक्षात येते, की सैन्यदलातल्या नोकरीची १४ वर्षं जवळपास ‘न के बराबर’ असतात. या कंपन्यांना सैन्यदलांच्या कामाची, व्यवस्थेची काहीच कल्पना नसते. त्यामुळे, १४ वर्षांनंतर तिला फ्रेशरसारखेच वागवले जाते.

त्यामुळेच एका बाजूला आपण नारीशक्तीचा उदोउदो करत असलो, तरी या मुद्द्यांबाबतही विचार होणे गरजेचे आहे. यावर अद्याप उपाय सापडलेला नाही. नाहीतर, तो दिवस फार दूर नाही, जेव्हा राजपथावर संचलनात परत एकदा एकही महिला अधिकार्‍यांची स्वतंत्र तुकडी नसेल.

आपल्याकडे ट्रॉफी वाइफ वा ‘शोभेची पत्नी’ असा शब्दप्रयोग आहेच. यशस्वी पुरुषाची तरुण व सुंदर पत्नी म्हणजे ट्रॉफी वाइफ, ती नवर्‍याच्या स्टेटसचा घटक असते. तशा आपल्याला, राष्ट्रपती किंवा पूर्ण देशासाठी अभिमानाची बाब असणार्‍या फक्त ‘ट्रॉफी ऑफिसर’ तर नको आहेत ना?
मेजर अनिता पद्मन (निवृत्त) मुंबई
anitapadman@gmail.com