आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Major Rajarshi Karlekar Article About Woman In Military

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सैन्यातील संधीचा लाभ मुलीनी घ्यायलाच हवा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नुकत्याच पार पडलेल्या गणराज्य दिनाच्या सोहळ्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना मानवंदना दिली विंग कमांडर पूजा ठाकूर या समर्थ महिलेने. हे दृश्य पाहून व त्या प्रसंगाचे वृत्तांत वाचून फक्त भारतीय महिलांचीच नव्हे, तर सर्वच भारतीयांची मान उंचावली गेली. आजवर जो बहुमान फक्त पुरुषांनाच मिळत होता तो या वेळी एका महिलेने मिळवला आणि अर्थातच आपल्या क्षमता सिद्ध करूनच. हे विधान म्हणजे पुरुषद्वेष नाही, तर स्त्रियांना मिळालेल्या पोचपावतीचे निदर्शक आहे.

सर्व मर्यादांचे भान व जाणीव ठेवून १९९३ मध्ये महिलांना सेनेमध्ये अधिकारी पदावर प्रवेश देण्यात आला. मी १९९४मध्ये चेन्नईच्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीत सहा महिन्यांचे प्रशिक्षण घेऊन शिक्षण विभागात कामाला सुरुवात केली. (आता हे प्रशिक्षण एक वर्षाचे असते.) तेव्हा माझी नियुक्ती पाच वर्षांसाठी होती, ती कालांतराने दहा झाली. परंतु, दहा वर्षांनंतर मला इच्छा असूनही सैन्यातल्या नोकरीत राहता आले नाही. निवृत्त झाल्यानंतरची तीन वर्षं नवीन नोकरी मिळवण्यात गेली, हे विचारात घेण्याजोगे आहे. सध्या महिला अधिकार्‍यांना १४ वर्षे नोकरी करता येते. काही विशिष्ट सेवांमध्ये ती कायम नियुक्तीपर्यंत वाढवता येऊ शकते. हा बदल अत्यंत सावधगिरीने पण ठामपणे करण्यात आला आहे; पण पुरुषांसाठी असलेली नोकरीतील सुरक्षितता या क्षेत्रात महिलांच्या वाट्याला अजून तरी आलेली नाही आणि ती मिळवणे महिलांच्याच हातात आहे. त्यांनी या संधीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला व आपल्या क्षमता सातत्याने सिद्ध केल्या तर ५ वर्षे ते कायम नियुक्तीची शक्यता हे चित्र जसे बदलले, तसेच या पुढचेही चित्र आशादायी बनेल. मी लागले तेव्हा महिला अधिकार्‍यांच्या केवळ २५ जागा होत्या, आता १०० आहेत. परंतु, प्रत्यक्ष प्रशिक्षण पूर्ण करणार्‍या महिलांची संख्या कायमच १००पेक्षा कमी असते. त्यामुळे या संधीचा फायदा घेणे तुम्हा तरुण मुलींच्या हातात आहे.

मी ही जबरदस्तीची निवृत्ती स्वीकारून घरी आले तेव्हा अनेकांनी मला नोकरी का सोडली, काही त्रास होता का, घरी काही समस्या होती का, असे प्रश्न केले. मी शिक्षण विभागात होते म्हणजे मी अधिकार्‍यांना प्रशिक्षित करत होते, सैन्यदलात शस्त्रांचा वापर वगळता असलेला इतर सर्व शिष्टाचार मलाही लागू होता, याची अनेकांना जाणीवच नव्हती.तुम्ही प्राध्यापकीच करायचात ना, असंही अनेकांनी बोलून दाखवलं. पण प्राध्यापक असते तर मला १० वर्षांनी कोणी काढून टाकलं नसतं, हे मी त्यांना समजावू शकले नाही.

आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेल्या अविवाहित महिलांना या क्षेत्रात येण्याची संधी असते; पण पालक मात्र बर्‍याच वेळा मुलीला योग्य (म्हणजे तिच्या वरचढ) वर मिळण्याच्या चिंतेत राहतात. मुलीही आपली तेजस्विता आधीच्या शिक्षणात दाखवत नाहीत आणि या आश्वासक क्षेत्राचा मार्ग आपसूकच बंद होतो.

मुलींनी आपले शिक्षण, मग ते कोणत्याही विषयातील असो, ते गंभीरपणे व प्रामाणिकपणे पूर्ण केले पाहिजे. आपले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी बाह्य रूपापेक्षाही अंतरंग घडवणे आवश्यक आहे. त्यासाठी वाचन, निरीक्षण व शिक्षणाचे आपल्या आयुष्यात उपयोजन ही त्रयी सांभाळायला हवी. अंतरंगीचा ज्ञानदिवा बाहेरही उजेड पाडतोच.

याचबरोबर पालकांनीही मुलीला आवश्यक पाठिंबा द्यायला हवा. आकाशात झेप घेऊ पाहणार्‍या स्त्रीला आपले पाय ठेवण्यासाठी जमिनीवर हक्काचा निवारा हवा. तो पालकांनी द्यायला हवा. मग घराघरातील महिला पुढिलांसाठी दीपस्तंभ बनतील यात शंकाच नाही.
मेजर राजश्री कार्लेकर, (निवृत्त) मुंबई