Home »Magazine »Madhurima» Makar Sankrati Halawa Jwelery Tilgul

हलव्याच्या दागिन्यांचा आगळा डौल

शुभदा नेवे,.जळगाव | Jan 13, 2012, 10:20 AM IST

  • हलव्याच्या दागिन्यांचा आगळा डौल

सुलभाकाकूंचा फोन आला, दागिने आणायला येतेस ना म्हणून आणि एकदम आठवलं, काकूंच्या नातीचा पहिलाच संक्रांत सण होता; म्हणून अमेरिकेत हलव्याचे दागिने व काळा फ्रॉक पाठवायचा होता. सुचेतावहिनींकडे आधीच ऑर्डर केलेली. हलवा दागिने घेण्यासाठी वहिनींकडे गेलो आणि या दागिन्यांच्या अद्भुत दुनियेत हरवून गेलो. जळगाव शहर सुवर्णनगरी म्हणून प्रसिद्ध. जळगावकरांच्या घराघरात संक्रांत सण हलव्याच्या दागिन्यांसह साजरा होत असतो. पूर्वी बायका आपले नातेवाईक व आप्तेष्टांसाठी स्वत: हलव्याचे दागिने तयार करायच्या; पण आता मात्र अनेक महिलांनी हलवा आभूषणे बनवण्याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेऊन व्यवसायात रूपांतर केले आहे.
सुचेतावहिनीसुद्धा दहा वर्षांपासून कलात्मक दागिने बनवण्याचा व्यवसाय करत आहेत. डिसेंबर महिन्यातच हलवा दागिने बनवण्याला सुरुवात केली जाते. यात प्रथम कोळशाच्या शेगडीवर पसरट खोलगट तव्यावर तीळ, मुरमुरे, पोहे, शेंगदाणे, साबुदाणा, डाळी, खसखस इ. टाकून त्या एकेक दाण्यावर साखरेचा पाक टाकला जातो. कापडाने तो दाणा हलविला जातो. गरम आचेमुळे काटेरी हलवा फुलतो. काही दाण्यांवर रंगीत पाक टाकून रंगीबेरंगी हलवा बनवतात. विविध आकारांतला हलवा तयार झाल्यावर जाडसर पुठ्ठ्यावर सोनेरी बेगड म्हणजेच चमकदार कागद चिकटवला जातो. मुकुट, बाजूबंद, कंबरपट्टा असे आकार कापून त्यावर हलवा दाण्यांनी सुंदर डिझाइन तयार केले जाते; परंतु हार, बिंदी, गजरा तयार करताना मुरमुºयाचा लांब हलवा किंवा शेंगदाण्याचा मोठा गोल दाणा दोºयाच्या गाठीत अडकवला जातो. आकर्षक करण्यासाठी चंदेरी-सोनेरी स्प्रिंगप्रमाणे झिग दोºयात ओवतात. अलीकडे कृत्रिम रंगीत फुलेदेखील हारासाठी वापरतात.
लहान मुलांच्या पहिला संक्रात सणाला बोरन्हाण म्हणजेच लूट असते. बाळाला चौरंगावर बसवून गहू, उसाचे पेर, गाजराचे तुकडे, बोरं, चॉकलेट, हलवा, रेवडी असे बाळाच्या डोक्यावरून अलगद सोडतात. व इतर मुले ते वेचून खातात. यालाच गाजराबोरांची लूट म्हणतात. बाळाला कृष्णाप्रमाणे पीतांबर, काळी बंडी, डोक्यावर मोरपिसाचा मुकुट, बाजूबंद, हार, कंबरपट्टा, मनगट्या, वाळे, अंगठी इ. हलव्याचे दागिने घालून हलव्याने सजवलेली रेशमी गोंड्याची बासरी हातात दिली जाते. या सगळ्या गडबडीत लहान मुले एकतर गोंधळून रडायला सुरुवात करतात. किंवा दागिन्यांना लावलेला हलवा ओरबाडून खाण्याचा आनंद घेतात.
नव्या सुनेचा पहिला संक्रांत सण म्हणजे आनंदाला उधाणच. अमावास्येच्या काळ्या रात्रीप्रमाणे काळ्या साडीवर पांढºया हलव्याची आभूषणे ताºयांची आठवण करून देतात. त्यात मंगळसूत्र, हार, मेखला, बाजूबंद, बांगड्या, पायातल्या साखळ्या, अंगठी, केसात लांब मुरमुºयांच्या हलव्याचा गजरा, नाकात मराठमोळी नथ, बिंदी, कुडी असा साजशृंगार गृहलक्ष्मीच्या सौंदर्यात चारचाँद लावतो. मग अशी सजलेली लक्ष्मी, घरी आलेल्या सुवासिनींना हळद-कुंकू, अत्तर लावून संक्रांतीचे वाण देते. लहान मुलांसाठी, महिलांसाठी जशी ही आभूषणे तयार केली जातात तशीच ती जावयासाठीही पहिल्या संक्रांतीला केली जातात. पुरुषांसाठीही हलव्याचा हार, नारळ, घड्याळ व मोबाइल बनविला जातो. ही आभूषणे परिधान करून जोडीने फोटो काढले जातात. आठवणी फोटोच्या रूपाने कायम मनात रुंजी घालतात. आजकालच्या धावपळीच्या जगण्यातला असा आगळावेगळा विरंगुळा आनंददायी ठरतो. त्यातच आपल्या संस्कृतीचा खराखुरा दरवळ असतो.
( छायाचित्रे )
रवी खंडाळकर - औरंगाबाद,
योगेश चौधरी - जळगाव

Next Article

Recommended