आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंगला बने न्यारा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातल्या एका नामांकित शाळेतून मला फोन आला, ‘आमच्या शाळेतल्या बालवाडीतील मुलांचे कौतुक करण्यासाठी तुम्ही याल का? म्हणजे प्लीज याच.’ बालवाडी हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्याने मी क्षणात हो म्हटलं; पण त्या क्षणी आता माझ्यापुढे काय वाढून ठेवलं असेल याची मला अजिबात जाणीव नव्हती.

एका रविवारी सकाळी बालवाडीतील मुलांचे व त्यांच्या पालकांचे त्या शाळेत स्नेहसंमेलन होते. मी शाळेत पोहोचलो तेव्हा जिकडे तिकडे पालकच पालक, मला मुले कुठेच दिसेनात. मी जरा गोंधळलोच. इतक्यात लगबग करत त्या शाळेच्या मुख्याध्यापिका (म्हणजे मराठीत प्रिन्सिपॉल) शिफॉनची साडी व कपाळावरच्या (रंगवलेल्या) बटा सांभाळत माझ्याकडे येत म्हणाल्या, ‘जस्ट वेट. मुलं आता कार्यक्रमासाठी प्रिपेअर होत आहेत तोपर्यंत आपण मुलांनी केलेले प्रोजेक्ट्स पाहूया.’
बालवाडीतल्या मुलांनी केलेले प्रोजेक्ट्स! हे ऐकून मला आनंद झाला. बालवाडीतली मुले जर प्रोजेक्ट्स करत असतील तर पहिलीतली मुले प्रबंध (म्हणजे मराठीत थिसिस) लिहीत असतील, अशी एक कल्पना माझ्या मनात आली.

मी त्या प्रिन्सिपॉलसोबत बालवाडीतल्या मुलांचे प्रोजेक्ट्स पाहायला पहिल्या मजल्यावर गेलो. एका मोठ्या वर्गात भिंतींच्या कडेने टेबलं मांडली होती. त्या टेबलांवर पुठ्ठे व कार्डबोर्ड वापरून तयार केलेले काही एकमजली तर काही दुमजली बंगले ठेवलेले होते. त्या बंगल्यांच्या दारात हिरवळीवर उभी असणारी खोटी-खोटी झाडं. त्यांच्या बाजूला वेगवेगळ्या मोटारी. काही बंगल्यावर मोठाल्या कमानी व त्यावर सुयश पॅलेस, अर्णव टॉवर अशी नावं. सर्व बंगल्यांच्या काचा रंगीबेरंगी व बंगले तर विविध रंगांत न्हाऊन निघालेले. सगळ्या बंगल्यांची डिझाइन्स एकदम हटके. एक बंगला दुस-या बंगल्यासारखा अजिबात नाही. विशेष म्हणजे सर्व बंगले प्रमाणबद्ध आणि टिपटॉप!

आपण कुठल्या तरी चुकीच्या वर्गात आलो असं वाटलं आणि मी तिथून बाहेर पडणारच होतो इतक्यात प्रिन्सिपॉल मॅडम आल्या आणि हसतच म्हणाल्या, ‘प्लीज वेट. हे पाहा आमच्या नर्सरीतल्या मुलांचे प्रोजेक्ट्स. हाऊ वंडरफुल दे आर!’
वय वर्षे 3 ते 4 या वयोगटातील मुलांच्या त्या महान कलाकृती पाहून तर मी अवाक् झालो! या इतक्या लहान वयात बंगल्यांची निरनिराळी डिझाइन्स तयार करणं, त्याची प्रमाणबद्धता ठरवणं आणि त्याची आखणी करून कागदावर ती प्रत्यक्षात उभी करणं हे कॉलेजच्या मुलांनाही न जमणारं काम या चिमुरड्यांनी अगदी लीलया केलं होतं. इतर काही शाळांतल्या नर्सरीतल्या मुलांना कागदाची साधी होडी करता येत नाही, तर या शाळेतल्या मुलांनी दुमजली बंगले उभे करून ते रंगवलेही होते. अशा मुलांचं आपण ते काय कौतुक करणार? या महान कलाकारांच्या आपण पाया पडायला पाहिजे, असं मला वाटू लागलं. मी हात जोडून त्या प्रिन्सिपॉल मॅडमना म्हणालो, ‘तुमची शाळा आणि तुम्ही खरंच महान आहात. काही वेळा वर्गातला तर काही वेळा शाळेतला एखादा विद्यार्थी ग्रेट कलाकार असू शकतो; पण तुमच्याकडे तर होलसेलमध्ये सगळेच सुपर ग्रेट कलाकार आहेत! हे खरंच अविश्वसनीय आहे. तुमच्या शाळेचं आणि तुमचं नाव गिनीज बुकातच गेलं पाहिजे.’

मॅडम हसतच म्हणाल्या, ‘थँक्यू सर.’
‘पण मॅडम, या बंगला बांधणा-या मुलांना मला भेटायचं आहे. त्यांच्याशी बोलायचं आहे. त्यांच्या पाठीवर शाबासकी द्यायची आहे. मला माहीत आहे मॅडम, याच मुलांचं जाहीर कौतुक करण्यासाठी तुम्ही मला इथे बोलावलं आहे ना? आणि मॅडम, इतके सुंदर बंगले त्यांनी कसे काय उभे केले हे मला त्यांच्याकडून शिकायचंही आहे.’ माझं बोलणं पुरं होण्याआधीच त्या म्हणाल्या, ‘जस्ट ए मिनिट.’ आणि त्या गायबच झाल्या. मी तिथे जमलेल्या पालकांकडे या मुलांच्या महान कलाकृतींचं कौतुक करू लागलो तर रंग उडालेल्या बंगल्यांसारखी त्यांची तोंडं झाली. ‘नर्सरीतली मुले जर इतक्या उच्च दर्जाचे कागदी बंगले बांधतात तर मग वरच्या वर्गातली मुले खरोखरीचे टॉवर्स वगैरे बांधतात का?’ असा एक सोपा प्रश्न मी एका पालकांना विचारण्याचा प्रयत्न केला तर ते पळतच सुटले. आणि थोड्याच वेळात माझ्या लक्षात आलं की, त्या बंगल्यांच्या गराड्यात मी एकटाच उभा आहे. निरागस मुलांच्या सर्जनशीलतेचं पद्धतशीर खच्चीकरण म्हणजेच मुलांच्या नावावर उभे असलेले हे डौलदार बंगले. या बंगलेबांधणीच्या कटात सगळेच पालक काही स्वेच्छेने सहभागी झालेले नसतील. ‘अडला हरी गाढवाचे पाय धरी.’ असे बंगले बांधून त्या मुख्याध्यापिका नेमकं कुणाला फसवत आहेत? मला, स्वत:ला की मुलांना? मला कळवाल?
‘निरागस मुलाची उत्स्फूर्त कलाकृती सारं अवकाश व्यापून टाकते’ ही चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा.

rajcopper@gmail.com