आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुपोषण निर्मूलनाचा ध्यास घेतलेला मनस्वी कार्यकर्ता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारस जैन हे शांतीलाल मुथा यांच्या नेतृत्वाखाली चालणा-या भारतीय जैन संघटनेचे मराठवाडा उपाध्यक्ष आहेत. सुमारे शंभर क्षेत्रांत आम्ही सामाजिक कार्य करत असल्याचा त्यांचा दावा आहे. शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक कलह यासारख्या सामाजिक प्रश्नांवर त्यांनी चालवलेले कार्य उल्लेखनीय आहे. औरंगाबाद तालुक्यातील लाडसावंगी अंगणवाडीअंतर्गत 16 गावे येतात. कुपोषण निर्मूलनाचा प्रायोगिक तत्त्वावर प्रयोग या गावात प्रथम राबवला.
या अंगणवाडीत सुमारे 112 बालके कुपोषणग्रस्त आढळली. वैद्यकीय परिमाणानुसार ती ‘रेड झोन’मध्ये होती. त्यांना जिल्हा परिषदेमार्फत मिळणारी सुकडी किंवा खिचडी देण्यात येत होती; पण त्याचे वाटप व्यवस्थित होत नव्हते. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या बालकांचे वैद्यकीय निदान झालेलेच नव्हते. निदान झाल्याशिवाय उपचार करणे केव्हाही चुकीचेच असते, असे सांगून जैन म्हणाले, येथील प्रतिष्ठित व्यावसायिक सुरेश साकला यांच्यासह 10 तज्ज्ञ डॉक्टरांचा संच घेऊन आम्ही लाडसावंगीला पोहोचलो. कुपोषितग्रस्तांच्या पालकांना बोलावून घेतले. त्या बालकांचे वजन केले. वैद्यकीय तपासणी केली, त्यानंतर त्यांना प्रोटिन पावडर, ज्यांच्यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी आहे, अशा मुलांना हॅमॅटेनिक आयर्न, रोगप्रतिकारक औषधी, जंत होऊ नये यासाठीच्या गोळ्या दिल्या. शिवाय 105 दिवस दररोज घेण्यासाठी पौष्टिक खाद्याचे पाकिट दिले. त्यात पेंडखजूर, गूळ-शेंगदाण्याचे लाडू आणि बेसन बर्फी असा आहार समाविष्ट होता. त्यासाठी आम्हाला दररोज एका बालकामागे 15 रुपये खर्च आला. ज्या 112 बालकांवर आम्ही उपचार केले ती सर्व ‘रेड झोन’मध्ये होती. ही सर्व बालके या आहारांच्या सेवनानंतर ग्रीन झोनमध्ये आली. हा उपक्रम साधारणपणे 1 आक्टोबर ते 6 डिसेंबर 2010 दरम्यान राबवण्यात आला. कार्यक्रमाच्या समारोपास जिल्हा परिषदेचे पदाधिकारी - अधिकारी यांना खास निमंत्रित करण्यात आले. त्यांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालणारी ही घटना आहे. औरंगाबाद जिल्ह्यात अंगणवाड्यांत 3 लाख 20 हजार लाभार्थी आहेत. त्यापैकी 15 हजार बालके कुपोषित आहेत. त्यांच्यासाठी जिल्हा परिषद दर बालकांमागे दररोज 3.98 रुपये खर्च करते, असा त्यांना 50 कोटी रुपये खर्च येतो. प्रत्यक्षात 30 कोटीच खर्च होतात, असेही गृहीत धरल्यास हा सर्व अनाठायी जातो, त्यांना आम्ही देतो तसा सकस आहार तोही पालकांचे प्रबोधनाअंती दिला पाहिजे, असे पारस जैन यांचे म्हणणे आहे.
मानव विकास आयोगाचे अध्यक्ष कृष्णा भोगे यांनी भेट दिली. अंगणवाडी सेविकांना पगारवाढ दिल्यास त्या 12 तास काम करतील. डॉक्टरांकडून तपासणी, त्यांच्या कुपोषित होण्याचे निदान स्पष्ट झाल्यानंतर ठरावीक कॅलरीजचा डोस मिळाल्यास ही समस्या नष्ट होण्यास मदत होईल, असा त्यांचा आग्रह आहे.
दुसरी समस्या संस्कारक्षम पिढी घडवण्याची आहे. मुलांवर संस्कार होण्याची आवश्यकता आहे. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी भारतीय जैन संघटनेने ‘मूल्यवर्धन कोर्स’ शिक्षणतज्ज्ञांच्या साहाय्याने तयार केला आहे. बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात सुमारे 200 शाळांत हा कोर्स शिकवण्यात येत आहे. मानव संसाधन विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी या कोर्सची दखल घेतली आहे.
13 लाख शाळांतून हा कोर्स शिकवला जावा यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गुजरात सरकारने 42 हजार शाळांतून हा कोर्स सुरू केला आहे, तर गोवा सरकारनेही 1790 शाळांत हा उपक्रम राबवला आहे. तीन वर्षांपासून हा कोर्स राज्यात 2600 जैन गुरुकुल, नवोदय विद्यालयांतून राबवण्यात येत आहे.