आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mamata Tiwari Article About Choice Between Career And Marriage For Women

विवाह की करिअर?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'विवाह की करिअर' हा आजच्या तरुणींपुढचा ज्वलंत प्रश्न. करिअर करेपर्यंत विवाहाचं वय सरून जातं आणि विवाह केला तर करिअर राहून जातं. नेमकं करायचं काय? स्त्रीच्या अंतर्मनातल्या संघर्षाला वाचा फोडणारा हा लेख.'
काही महिन्यांपूर्वी टीव्हीवर दिल्लीतील एका प्रसिद्ध महिला डॉक्टरची मुलाखत पाहिली. अविवाहित असल्यामुळे आज मी या इन्स्टिट्यूटच्या डायरेक्टर पदाची धुरा समर्थपणे सांभाळू शकते, असे त्यांचे स्पष्ट मत होते. काही दिवस यावर विचार केला. विवाहित-अविवाहित मित्रमैत्रिणींशी चर्चा झाल्या. त्यांचं हे विधान बहुतेकांना पटणारं वाटलं. अविवाहित असल्यामुळे पारिवारिक जबाबदार्‍या कमी, त्यामुळे व्यवसायाकडे लक्ष देण्यास भरपूर वेळ या समीकरणानुसार यश अशा लोकांनाच अधिक मिळणार, हे उघड. मात्र, विवाहित व्यक्ती यशस्वी होतच नाहीत, असाही भाग नाही. शेवटी व्यावसायिक यश आणि व्यक्तिगत यश या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. त्यांचे यश कौशल्यावर अवलंबून असते, त्यामुळे विवाह आणि व्यवसाय यांच्या यशापयशाबद्दल सरसकटपणे सांगता येणार नाही. मात्र, काही स्त्रियांना आपल्या क्षेत्रात अधिक काही करण्याची महत्त्वाकांक्षा लग्नापासून दूर नेत असल्याचे चित्र महानगरांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसत आहे. एक जुनं वचन आठवतं, ‘विनाश्रयेन न शोभते पंडिता, वनिता, लता.’ म्हणजेच विद्वान, स्त्रिया आणि वेली आश्रयाशिवाय शोभत नाहीत. स्त्रीने पुरुषाचा आश्रय घेतलाच पाहिजे, असा जणू काही पूर्वीपासून दंडकच. स्त्रीने बाल्यावस्थेत पित्यावर, युवावस्थेत पतीवर, तर वृद्धावस्थेत पुत्रावर अवलंबून असावे असे तिच्यासाठी लिहून ठेवले आहे. पण आज जग झपाट्याने कात टाकत आहे, नवनवीन बदल होत आहेत, शिक्षणामुळे स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाला आणि विचाराला सामर्थ्याचे अंकुर फुटले आहेत. त्यामुळे आता केवळ अन्याय सहन करतराहणारी आणि पुरुषांच्या आधारावर जगणारी एक दुर्बल व्यक्ती, असं तिचं मूल्यांकन करणं चुकीचं ठरेल. बुद्धीचे आणि कर्तृत्वाचे पंख फुलवून आकाशात भरारी घेण्याची कुवत आजच्या स्त्रीत आहे, हे सिद्ध करण्यासाठी उदाहरण देण्याची गरज नाही.

लग्न आणि संसार यापेक्षा अधिक उच्चतर ध्येये माणसाला असू शकतात. पुरुष स्वेच्छेने अविवाहित राहू शकतो, तर स्त्रीला हे स्वातंत्र्य का नसावं? आणि अविवाहित राहण्यात आक्षेपार्ह तरी काय? स्त्री-पुरुषांनी परस्पर सहवासात राहावे आणि कुटुंबव्यवस्था बळकट करावी, वंशसातत्य व वंशविस्तार करावा, हा विवाहामागील नैसर्गिक, सामाजिक, धार्मिक आणि वैज्ञानिक हेतू. निश्चितच एकट्याने जगण्यापेक्षा दोघांनी एकत्रितपणे सहजीवन स्वीकारल्यास ते अधिक सुखकर, सहज आणि सोयीचे होते.

पण नाही आवडत काहींना या मळलेल्या वाटेने सहजपणे जाण्याचे तंत्र. संसाराच्या रामरगाड्याशी स्वत:ला जखडून घेणं त्यांना मान्य नसतं. कित्येक तरुण मुली आपल्या आयुष्याचं ध्येय आज स्वयंप्रेरणेने निश्चित करत आहेत. साहित्य, शिक्षण, प्रशासन, चित्रपट, संगीत, नाट्य, समाजसेवा, राजकारण, उद्योग व्यवसाय अशा विविध क्षेत्रांत त्या समर्थपणे एकट्याने वाटचाल करत आहेत. बुद्धी,कर्तृत्वाच्या जोरावर जीवनसंघर्षात कुठेही कमी पडत नाहीत. व्यक्तिगत जीवनातही आपल्या आयुष्यात काही तरी अपूर्णता आहे, अशी किंचितही जाणीव होत नाही, हा एक गैरसमज आहे. कित्येक लेखक, शास्त्रज्ञ, कवी, समाजसेवक दैनंदिन कार्यात इतके निमग्न असतात की विवाहासारखी पाऊलवाट त्यांना कधी दिसतही नाही. त्या वाटेला गेलं पाहिजे, असंही वाटत नाही. प्रत्येकाला जीवन इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा आहेच, मात्र आपले निर्णय इतरांना विघातक ठरू नयेत, याचं भान ठेवलं पाहिजे इतकंच.

अविवाहित राहण्यात काही धोकेही असतात. अविवाहित स्त्रीला पुरुषांपेक्षा अधिक समस्यांची आव्हानं पेलावी लागतात. सामाजिक अपप्रवृत्तीवर मात करण्याचा मानसिक खंबीरपणा दाखवावा लागतो. आपल्या विचारांच्या आणि ध्येयाच्या कक्षेत सुखेनैव वावरता येईल, हा भ्रम अविवाहित स्त्रीला घातक ठरतो. जग वाटतं तितकं वाईट नाही, हे खरं असलं तरी ते वाटतं तितकं सरळ आणि चांगलं आहे, हेही खरं नाही. त्यामुळे अविवाहित स्त्रीपेक्षा विवाहित स्त्रीच्या भोवती संरक्षणाची भिंत मजबूत असते. या वास्तव परिस्थितीचं काटेकोर आकलन तिनं करून घेतले पाहिजे. अविवाहितांना उतारवयात एकाकीपणालाही तोंड द्यावं लागतं. एखादं सुख मिळवायचं असेल तर त्यासाठी काही ‘रिस्क’ही घ्यावी लागते. म्हणतात ना, ‘कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है.’ तरीही तरुणपणी केलेली कामगिरी आणि कर्तृत्व याचे समाधान, परतीचा प्रवास सुखी करू शकतो. जीवन सार्थकी लागल्याचा व मनाप्रमाणे जगता आल्याचा आत्मिक आनंद एकटेपणाच्या वेदनांना सुसह्य करतो. भरल्या संसारातदेखील अनेक स्त्री-पुरुष मनाने एकाकीच असतात. विवाह करूनही एकट्यालाच दु:खाच्या संगतीत राहावे लागत असेल तर विवाहामुळे जीवनाला पूर्णत्व येते, हे विधान निरर्थक ठरते. म्हणून विवाह केलाच पाहिजे असं नाही. संसाराच्या पाशात अडकण्यापेक्षा, अधिक महत्त्वाचं श्रेष्ठ प्रतीचं कार्य करण्याची ओढ असेल, तर मनाचा कौल प्रमाण मानला पाहिजे. विवाह न करणे म्हणजे काही संन्यास घेणं नव्हे. एखाद्या उच्च ध्येयासाठी विवाहासारख्या सामान्य गोष्टीला बाजूला सारणं काही वावगं ठरत नाही. विवाह आणि मातृत्व या अवस्था टाळूनदेखील जीवन, आपलं जीवन आपल्या क्षेत्रात अधिक उदात्त, सृजनशील करता येतं. असंख्य दु:खी पीडितांना मायेची ऊब देणार्‍या मदर टेरेसा, संगीताची आजीवन उपासना करणार्‍या गानसम्राज्ञी लता मंगेशकर, गांधी-विनोबांचे विचार देशात नव्हे, तर परदेशातही नेऊन रुजवणार्‍या मानवतेच्या अखंड उपासक निर्मला देशपांडे यांचं जीवन परिपूर्ण नाही, असं म्हणण्याचा करंटेपणा करता येईल का? प्रत्येकीलाच त्यांच्याएवढा नावलौकिक मिळेल, असं नाही. मात्र आपल्या क्षेत्रात आपण केलेलं कार्य आपल्याला जरी आत्मिक आनंद देऊ न गेलं तरी जीवनाचं सार्थक झालं, असं म्हणता येईल. अविवाहितपणा कधी स्वेच्छेने असेल तर कधी परिस्थितीने, पण दोन्ही स्थितीत त्याला समर्थपणे पेलणे महत्त्वाचे. कारण शेवटी विवाह हे सर्वस्व नाहीच, ती केवळ एक पद्धती आहे जगण्याची.
(याविषयी आपल्याला काय वाटते ते आम्हाला जरूर कळवा, आम्ही आपल्या प्रतिसादाची वाट पाहतोय.)