आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मानवी हस्तक्षेपाचा थ्रीडी फॉर्म्युला

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘ए आवडे, इकडे ये नं’... अर्धवटराव भुवई उंचावून खट्याळपणे तुमच्याकडे बघतो, मान वळवून इशारे करतो, हस-या तोंडाने लाडिकपणे बोलतो, जेव्हा आपल्या प्रत्येक बोलण्याला हजरजबाबीपणे उत्तरं देतो... शाब्दिक कोट्या करून करून जीव मेटाकुटीला आणतो, तेव्हा तो रामदास पाध्येंच्या हातातले खेळणे आहे, हे क्षणभर आपण विसरून जातो. आपल्या बोटांच्या करामतीवर निर्जीव बाहुल्याला अभिनयसम्राट करण्याची ही कला आत्मसात करण्यासाठी आणि वाढवण्यासाठी शब्दभ्रमकार रामदास पाध्ये यांनी आयुष्यभर साधना केली. ‘अ‍ॅहॅहॅ अ‍ॅहॅहॅ, लिज्जत पापड...’ पापडाची ही जाहिरात ऐकली किंवा पाहिली की तो ससा आणि त्याचे हसू लक्षात राहते. आजही हीच जाहिरात लिज्जत पापडाच्या पाकिटावर दिसते, तर दूरचित्रवाणीवरही हीच एकमेव जाहिरात सुरू असते. इतक्या वर्षांनंतरही रामदास पाध्येंचा ससा ओळखीचा वाटतो, हेच त्यांच्या या साधनेचे फलित असावे. असेच ‘ओम फट् स्वाहा’ या वाक्याशी जुळलेले तात्या विंचूचे नाते.


रामदास पाध्ये यांनी सांगितले, ‘20 वर्षांपूर्वी ‘झपाटलेला’ हा चित्रपट करत असताना त्या वेळच्या तुटपुंज्या टेक्निक्सच्या मानाने मी तात्या विंचूला जवळजवळ 100 टक्के मानवनिर्मित केले होते. तेव्हा चित्रपट माध्यमातही काही सुधारणा झाली नव्हती, त्यामुळे एखाद्या बाहुल्याला स्वयंचलित करणं हे खूप कठीण गेलं. आम्हाला दोघांनाही लपून राहून ते काम करायला लागायचं. स्क्रीनवर आपण दिसणार नाही; मात्र बाहुला व्यवस्थित हाताळता येईल, अशा पद्धतीने अवघडलेल्या परिस्थितीत आम्ही लपायच्या एकेक जागा शोधून काढल्या होत्या. तेव्हा ‘तात्या विंचू’ हा बाहुला साक्षात जन्माला घालायचा होता. त्यामुळे चित्रपटाच्या संकल्पनेनुसार एकाच वेळी निरागस दिसणारा आणि नंतर अतिशय क्रूर वाटणा-या हावभावांचे चित्रण त्या बाहुल्याच्या चेह-यावर येणे गरजेचे होते.’ रामदास पाध्येंनी अनेकविध डिझाइन्स तयार केली आणि मोडली. अनेक भावभावना तयार करण्याचा प्रयत्न झाला. आणि अखेर तात्या विंचू तयार झाला आणि गाजला. आता 20 वर्षांनंतर थ्रीडीपट करताना टेक्नॉलॉजी खूप वाढलेली आहे, पण तुमच्या हाताची कमाल असते ना ती वेगळीच असते. ‘झपाटलेला’ चित्रपटातून लक्षात राहिलेल्या ‘तात्या विंचूचे ‘बोलके’ हात अर्थात रामदास पाध्ये यांनी तात्या विंचूसोबत घालवलेल्या 20 वर्षांच्या काळाचा आढावा घेतला. दिग्दर्शक महेश कोठारे यांच्या ‘झपाटलेला’ या चित्रपटातून तात्या विंचू नामक बाहुला खलनायकाचा आत्मा त्याच्यात गेल्याने जिवंत होतो आणि चालत जाण्यापासून ते पाइप चढण्यापर्यंत निर्जीव बाहुल्याला अशक्य असणा-या गोष्टी करतो.

इतकेच काय, नायकाच्या शरीरावर ताबा मिळवण्यासाठी जंग जंग पछाडतो. ही किमया कशी बरे साधली असेल? ‘बोलक्या बाहुल्यांचा खेळ किंवा शब्दभ्रम हा खरं तर लाइव्ह सादरीकरणाचा प्रकार आहे. मात्र जे मी समोरासमोर स्टेजवर करू शकत नाही, ते अशक्य कोटीतले सर्व प्रकार चित्रपट या माध्यमातून करता येऊ शकतात. ‘झपाटलेला 2’ हा चित्रपट थ्रीडी स्वरूपातला असल्याने त्यात टेक्नॉलॉजीचा वापर होणे हा अविभाज्य घटक आहे. मात्र चित्रपट केवळ अ‍ॅनिमेट्रॉनिक्स आणि रेडिओ कंट्रोल यांच्यावरच न सोडता त्यात मानवी ‘हस्त’क्षेप असल्याशिवाय मला हव्या त्या भावना दाखवता येणार नाहीत, असे वाटले. टेक्नॉलॉजी खूप वाढली आहे, मात्र तुमच्या हाताची जी कमाल असते ना ती निराळीच! त्यामुळे चित्रपटात नुसता यांत्रिकपणा न दाखवता पूर्वी आम्ही मॅन्युअली करण्यात जे 35 टक्के सोडलं होतं ते आता पकडण्याची गरज आहे, असे वाटून या चित्रपटासाठी नव्याने तयारी सुरू केली. त्यामुळे जे जगभरातल्या कोणत्याही चित्रपटात झाले नाही असे रेडिओ टेक्नॉलॉजीच्या मदतीने मानवी ‘हस्त’क्षेप असे कॉम्बिनेशन मी वापरले. आता चित्रपटमाध्यम टेक्निकली खूप पुढे गेल्यामुळे सोयीचं झालं, म्हणजे तुम्ही स्क्रीनवर दिसलात की तुम्हाला काढणं अगदी सोप्पं झालं. रामदास पाध्ये यांनी ‘झपाटलेला 2’ या थ्रीडी चित्रपटासाठी एक दोन नाही तर तब्बल 10 तात्या विंचूचे बाहुले बनवले आहेत.


मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रामदास पाध्ये यांनी बोलक्या बाहुल्यांचे खेळ आणि शब्दभ्रम या कलेला केवळ व्यवसाय या दृष्टिकोनातून न बघता करिअर म्हणून स्वीकारले. मोठ्या हॉटेलांमध्ये, अनेक छोट्या कार्यक्रमांत, कधी जादूगारांसोबत बोलक्या बाहुल्यांचे खेळ करता करता आजही बाहुल्यांमध्ये रमणारे रामदास पाध्ये बोलक्या बाहुल्यांचे ‘ब्रँड अ‍ॅम्बेसेडर’ झाले आहेत. आजवर लाइव्ह कार्यक्रम, लघुपट, चित्रपट तसेच अनेक जाहिरातींच्या माध्यमातून रामदास पाध्ये आपल्याला भेटतात. टाटा स्कायची जाहिरात आठवते? आमिर खानने चक्क रामदास पाध्येंची नक्कल केली होती. टीव्ही झालेल्या छोट्याशा बाहुलीसोबत रिअ‍ॅक्ट होणारा शब्दभ्रमकार अशी आमिर खानची काहीशी लाघवी छबी आपल्याला आवडली. त्या छबीच्या आड ख-याखु-या टीव्ही स्क्रीनला दिसणार नाही अशा पद्धतीने रामदास पाध्ये यांनी ‘टीव्ही’ स्वरूपातल्या छोट्याशा बाहुल्याला हाताळले. ‘मुळात आमिर खानसारख्या अभिनेत्याला या कलेविषयी आपुलकी वाटणे वा त्याद्वारे बोलक्या बाहुल्यांचा प्रसार होणे हे निश्चितच चांगले आहे. या जाहिरातीसाठी आमिरने आरशासमोर तयारी करण्यासाठी एका ‘प्रॅक्टिस पपेट’ची मागणी केल्याची आठवणही या वेळी रामदास पाध्येंनी सांगितली.


मूळ महाराष्ट्रात जोपासलेली ही कला रामदास पाध्ये यांनी आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत नेऊन पोहोचवली आहे. त्या त्या प्रांतातल्या भाषेचा लहेजा, त्या भाषेतील कोट्या, राजकीय, सामाजिक जाण आणि हजरजबाबीपणा याच्या जोरावर रामदास पाध्येंनी आपल्या बाहुल्यांना जग फिरवून आणले आहे. त्यांची पत्नी अपर्णा आणि मुलगा सत्यजित यांनीही त्यांना मदतीचा ‘हात’ दिला आहे. त्यामुळे बाहुल्यांचे खेळ आणि शब्दभ्रमकार म्हणून पाध्ये परिवार आपली ओळख पुढेही जपून ठेवील.