आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manas Article About Self Respect, Rasik Divya Marathi

आत्मसन्मानाने जगण्याचा 'मानस'

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज मी स्वत:ला एक समलैंगिक म्हणून पूर्णपणे स्वीकारले आहे. समलैंगिक असल्याचा मला अभिमान आहे. तरीदेखील अजून मला बराच पल्ला गाठायचा आहे. मला माझ्या पालकांनी, मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी व संपूर्ण समाजाने समलैंगिक म्हणून स्वीकारावे, अशी माझी इच्छा आहे...

माझा जन्म पुण्यातल्या एका कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबात आला. आमचे पाच जणांचे कुटुंब - आजी, बाबा, आई, माझी मोठी बहीण आणि मी. पुण्यातल्या एका प्रतिष्ठित शाळेत माझे प्राथमिक शिक्षण झाले. लहानपणी माझ्यामध्ये बायकीपणा होता, हे मला आजूबाजूच्या लोकांकडून कळायचे. कदाचित माझ्या वागण्या-बोलण्या-चालण्यातला फरक माझ्यापेक्षा इतरांना अधिक जाणवत आणि खटकत असावा. अशाच इतरांमधला तो एक, ओळखीचा. त्याचे दुकान आमच्या वाड्याशेजारीच होते. आम्ही वाड्यातील लहान मुले त्याला काका म्हणायचो. तोही हसून दाद द्यायचा. त्याचे आमच्या वाड्यात येणे-जाणे असायचे. एकदा त्याच्या दुकानात कोणी नाहीसे पाहून त्याने मला दुकानात बोलावून घेतले. त्याने माझ्यातल्या या खटकणार्‍या गोष्टीचा उपयोग करून घेतला. त्यानंतर मी तिकडे कधीच फिरकलो नाही. घाण, किळस, कुतूहल अशा संमिश्र भावनांनी मला घेरले.

सर्वसाधारण मध्यमवर्गीय पालकांप्रमाणेच माझ्या आई-बाबांची इच्छा, अपेक्षा होती. पण माझ्या शालेय वयात विशेष शैक्षणिक मार्गदर्शन करणारे कोणीही नव्हते. मीही अभ्यासात फारसा हुशार नव्हतो. माझे बाबा अल्पशिक्षित असल्यामुळे त्यांनी बर्‍याच प्रकारच्या नोकर्‍या बदलल्या. छोटे-मोठे व्यवसाय करून पाहिले. पण त्यात त्यांना कधी यश आलेच नाही. त्यामुळे अर्थार्जनासाठी आईलाही हंगामी स्वरूपाच्या नोकर्‍या कराव्या लागत. आला-गेला, पै-पाहुणा, आम्हा दोघा भावंडांचा अभ्यास, वृद्ध आजी या सर्वांचे तिला करावे लागे.

अशा परिस्थितीमध्ये मी लहानाचा मोठा झालो. त्यामुळे माझ्यावरदेखील असेच टिपिकल मध्यमवर्गीय संस्कार. बालपण संपले आणि पौगंडावस्था आली. वयाच्या अकराव्या-बाराव्या वर्षापर्यंत मला माझ्या लैंगिकतेची प्रकर्षाने जाणीव कधीच झाली नाही. माझ्यात होणारे शारीरिक बदल हे निसर्गनियमांप्रमाणेच होताहेत, याची जाणीव मनाला होत होती. पण मानसिक बदलांचं काय? ते चुकीचे आहेत, अशी भावना मूळ धरू लागली होती.

माझ्यातले शारीरिक बदल ठळकपणे लक्षात येऊ लागले. मिसरूड फुटू लागले होते, रंग उजळला होता आणि माझे सारखे आरशात पाहणे चालू झाले. चारचौघांमध्ये दिसायला बरा होतो; पण राहणीमान फारच गबाळ होते. तशातदेखील माझ्यापेक्षा दोन-तीन वर्षांनी मोठा असलेला माझ्या घराजवळचा एक मित्र माझ्याकडे आकर्षित झाला. तो दिसायला आकर्षक, अंगा-पिंडाने मजबूत. आम्हा दोघांना भटकायची खूप आवड. आम्ही खूप खेळायचो, भटकायचो आणि घरच्यांचा मारही खूप खायचो. ते दिवस खूपच मंतरलेले होते. मी त्याच्या प्रेमातच पडलो होतो. पण ते प्रेम एकतर्फी होते. त्याच्याकडून असा कुठलाही प्रतिसाद मला मिळत नव्हता. कालांतराने आमच्या भेटी कमी कमी होत जाऊन पूर्ण बंद झाल्या. त्या वेळची माझी मनोवस्था भयंकर झाली. माझं कुठल्याच गोष्टीत लक्ष लागत नव्हतं. भयंकर असुरक्षितता आणि हळवेपणा जाणवू लागला होता. मी एकटाच बसून खूप विचार करायचो आणि रडायचोदेखील. या सर्व गोष्टींचा परिणाम माझ्या आरोग्यावरदेखील झाला. मी खूप कृश झालो.

माझ्या ‘आयडेंटिटी क्रायसिस’चा काळ चालू झाला. मी कोण? माझं भविष्य काय? मला कोणी समजून का घेत नाही? काय चूक, काय बरोबर? माझ्या आजूबाजूला अस्तित्वात असणार्‍या प्रत्येक सजीव आणि निर्जीव वस्तूबद्दल प्रश्नचिन्ह माझ्या मनात उमटत असे. प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत मी होतो. हे सगळं संपवून टाकण्यासाठी आत्महत्या करावी का? असले विचारही माझा मनात यायचे. पण मी करिअरकडे फोकस करायचे ठरवले. दहावीला मार्क्स कमी आणि घरची आर्थिक परिस्थितीदेखील बेताची असल्याने मी आयटीआय करण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 18व्या वर्षी आयटीआय पास झालो. लगेच एका कंपनीमध्ये कामाला लागलो. आता माझ्यासमोर हे एकच ध्येय होते, की लवकरात लवकर जॉब करता करता शिक्षण घ्यायचे, म्हणजे घरालाही थोडा आर्थिक हातभार लागेल. पुढील शिक्षणासाठी मी पार्ट टाइम चालणारी कॉलेज धुंडाळली. कालांतराने मी एफ.वाय.बी.कॉम.ला पुणे विद्यापीठामधून बहि:स्थ अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. सकाळी 9 ते 5 जॉब आणि संध्याकाळी कॉलेजचा अभ्यास, असा माझा दिनक्रम चालू झाला.

मनात अजून कुठेतरी स्वत:चा शोध घेणे चालू होते. दरम्यान, माझा इंटरनेटचा वापर वाढला होता. माझ्या वाचनात ‘एलजीबीटी’ कम्युनिटीशी संबंधित एक लेख आला. तो लेखक पुण्यातलाच होता. मी त्याला भेटायचे ठरवले. त्याच्याकडून मला बरीचशी शास्त्रीय दृष्टिकोन असलेली माहिती मिळाली. त्याच्या एलजीबीटी कम्युनिटीच्या मित्रांबरोबर त्याने माझी ओळख करून दिली. ते सर्व जण इतक्या दिलखुलासपणे एकमेकांबरोबर वावरत होते, चेष्टामस्करी करत होते. त्यांच्या वागण्यातली सहजता माझ्या मनाला स्पर्शून गेली.

मी विचार केला, हे सगळे जण आपल्यासारखेच आहेत, तरीदेखील किती छान तणावमुक्त जीवनशैली जगत आहेत आणि माझा स्वत:कडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला. लैंगिकता या विषयावरील काही पुस्तके वाचनात आली व उरलेसुरले गैरसमजसुद्धा संपुष्टात आले. मला मी ‘गे’ असल्याचा अभिमान वाटायला लागला. खरं तर हा बदल एका दिवसात झाला नाही; त्यासाठी काही वर्षे जावी लागली.

आज मी स्वत:ला एक समलैंगिक म्हणून पूर्णपणे स्वीकारले आहे. समलैंगिक असल्याचा मला अभिमान आहे. तरीदेखील अजून मला बराच पल्ला गाठायचा आहे. मला माझ्या पालकांनी, मित्र-मैत्रिणींनी, नातेवाइकांनी व संपूर्ण समाजाने समलैंगिक म्हणून स्वीकारावे, अशी माझी इच्छा आहे. त्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची माझी तयारी आहे. मला समाजात माझी खरी ओळख सांगून आत्मसन्मानाने जगायचे आहे आणि माझ्यासारख्याच इतरांना मुख्य प्रवाहात आणायचे आहे...
(Samapathik@hotmail.com)