आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धा घास...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वत: उपाशी राहून आम्हाला घास भरवताना तुझ्यातलं माउलीपण कुठेही कमी पडलं नाही, पण राग नको येऊ देऊस, तू वाढवलंस दादाला पुरुष म्हणून आणि मला एक स्त्री म्हणून. कारण तूदेखील त्याच प्रवाहात वाढलीस. पुरुषप्रधान संस्कृती आजूबाजूच्या असंख्य लोकांप्रमाणे तुझ्याही कणाकणात भिनलीय. तुझी चूक झाली असं म्हणायला मन धजावत नाही, पण आज सभोवताली स्त्री-पुरुष भेद पुसण्यासाठी राष्ट्रीय-जागतिक पातळीवर मोहिमा राबवल्या जात असताना आपणही या भेदाला बळी पडलो, याचा खेद वाटतो. आपल्याही घरी या वृत्तीला खतपाणी मिळत गेल्याचं प्रकर्षानं जाणवतं. राहवत नाही. मन अस्वस्थ होतं. मी पण बघ ना, समानतेच्या युगात वावरताना या भेदासाठी फक्त तुलाच दोषी धरतेय. कारण मुलांवर संस्कार करण्याची, घडवण्याची जबाबदारी केवळ महिलेची असते, हे मी लहानपणापासून सभोवताली पाहात आलेय.
घरी आणलेल्या खाऊतून जास्तीचा वाटा दादासाठी काढून ठेवला जायचा. उरलेला आम्हा बहिणींना आणि तुझ्या वाट्याला काही उरले नाही तरी चालत होते तुला. कारण आई अन् घरातील महिला या नात्याने स्वत:चे काहीच लाड करायचे नाहीत. दिवसभर घरातील सर्व सदस्यांसाठी राबायचं आणि रात्री तुझ्यासाठी शून्य उरलं की तुला बरं वाटायचं. तुझ्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करत आलीस. स्त्री म्हणजे सहनशक्ती, त्याग, सतत धडपड, इतरांसाठी जगणे, झुरणे, अर्पण आणि अखेरीस समर्पण. हीच स्त्रीची खरी भूमिका आहे, हे आम्हा मुलींवर वारंवार बिंबवलं गेलं. वाढदिवसाला येणारे कपडे, शैक्षणिक खर्चातील तफावत, पुरुषांच्या उच्च शिक्षणाविषयी सर्वांगाने विचार करताना मुलींना फार दूरवर शिक्षणासाठी न पाठवणं, आपल्याच गावातील कमी खर्चातील अभ्यासक्रमाला प्राधान्य देणं या गोष्टींची सल मनात राहील. मुलगी एखाद्या खास कोर्ससाठी हट्ट धरून बसल्यास तिला बाहेर पाठवलंही जातं. आपल्या जोखमीवर बाहेर शिक्षण घेताना अर्धं बळ घरीच ठेवून मुली शिकतातही. पण शिक्षणप्रवाहात पुढे आल्यावर या सर्व अर्ध्या गोष्टींची उणीव त्रास देते. तूच दिलेल्या शिक्षणाच्या जोरावर चार गोष्टी कळू लागल्या आहेत. त्यामुळे स्त्रीत्वाची भूमिका नेमकी काय आहे, हे नव्याने पडताळून पाहावे वाटते आहे.
आई, तू ज्या काळात वाढलीस, तो काळ मी मोठी झाल्यावर बदलला आहे. आज घरातील मुख्य स्त्रीची भूमिका माझ्यावर येऊन ठेपली आहे. घरात राजकुमार आणि राजकुमारी दोघांना समानतेने नांदवण्याचा माझा प्रयत्न आहे. अर्थात कामाच्या तसेच भावनिक पातळीवर राजानेही जबाबदारी उचलावी, असा माझा हट्ट आहे; पण तोही एक पुरुष म्हणून वाढलाय. माझं अर्ध्या भागीदारीचं म्हणणं त्यालाही पटतं; पण फक्त ऐकण्यापुरतं. वास्तवात अर्धा वाटा उचलताना त्याचं मन आणि शरीर धजावत नाही. आमच्या पिढीतील अर्ध्याहून अधिक संसारांत हाच संघर्ष सुरू आहे; पण अर्ध्या संसारांना अर्ध्याचं गणित सोडवताना पाहून बरं वाटतं. आपल्या पुढच्या पिढीला हे गणित नक्कीच सुटेल, अशी खात्री वाटते. किंबहुना ते सुटण्याची समीकरणं मी माझ्या राजकुमार आणि राजकुमारीला नक्की शिकवीन.