आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mangal Shah Article About A Mentally Unstable Woman Being Illtreated

सखे गं

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

12 मार्च 14
मध्यरात्री 1.45 ची वेळ


हे सखे, तू आमची कोण? आम्ही तर तुझे कोणीच नाही, आम्ही तुझे कोणी असतो तर तुझी अशी विटंबना होऊच दिली नसती.तुझं अस्तित्वच आम्हाला नको आहे. कोणत्याच रूपात तू आमच्या जवळ नको म्हणून आम्ही तुला असं वा-यावर नव्हे उकिरड्यावर फेकून दिलं. पण उकिरडे फुंकणा-यांची या समाजात कमी नाही. गाढवाचं एक वैशिष्ट्य आहे, ते गढूळ पाणी कधी पीत नाही. आमची औलाद त्याहीपुढची. शुद्ध, अशुद्ध, स्वच्छ, अस्वच्छ यांचं भान ठेवण्याइतपत ते भानावरच नाहीत.
आधी शिवजयंती येते व मग 8 मार्च जागतिक महिला दिन. ज्या शिवरायांचे आम्ही गोडवे गातो त्यांनी परस्त्री मातेसमान मानली. आमच्या पुत्रजांनी तर तुला ‘माता’ केली, पण वेगळ्या अर्थाने. तुला सर्वांनीच नाकारलं कारण तू मनोरुग्ण. ठार वेडी. तुला आम्हांला सांभाळायचं नाही. जपणूक तर करायचीच नाही. तुझी मानसिक अवस्था खालावलेली. आमच्या पुत्रांचं तर अध:पतनच झालंय. तू कशीही असलीस तरी ‘भोगायला’ आम्हाला चालतेस. खरं तर अशा वेळी तुझं ‘वेड’ हे यांना वरदानच ठरतं. कारण तुला कितीही भोगलं, ओरबाडलं तरी तू कोणाचंच नाव घेणार नाहीस. तुझी कसलीच जबाबदारी यांच्यावर पडणार नाही. पोटगी किंवा हक्कासाठी कोर्टात खेचणार नाहीस. करून सवरून नामानिराळं कसं राहायचं याचा आदर्श परिपाठच यांच्याकडे!
25-30च्या आतबाहेर तुझं वय, काय पाहिलंस एवढ्या लहान वयात? पण असे भोग तुझ्या वाट्याला आले. एवढा कसला धक्का बसला गं तुला? जेवणाचं राहू दे गं, पण अंगावरच्या कपड्याचीही तुला शुद्ध नव्हती. अर्धनग्न अवस्थेत तू शहरभर फिरत होतीस. खरं तर तुझी ही स्थिती समाजाची परीक्षा घेत होती. समाजाला जोखत होती. कोण अशा वेळी कसा वागतो? पोटभर अन्न, अंगभर कपडा किंवा याहीपलीकडे जाऊन पोटभर माया व जगण्याला आवश्यक इतका आदर, सन्मान... काय देतो आपल्याला समाज? तुझ्या रूपात नियती आमची परीक्षा घेत होती. पण यातलं काहीच न देता आम्ही तुला दिली पराकोटीची विटंबना. तू पदर पसरून मागशील म्हणून आम्ही तुझ्या अंगावरचा पदरही काढून तुला पूर्ण उघडंनागडं केलं. तुझं निर्माल्य होताना उघड्या डोळ्यांनी निर्लज्जपणे पाहत होतो. चुकले मी. देवाच्या चरणी वाहिलेल्या फुलांना निर्माल्य म्हणतात. सैतानाच्या वासनेला बळी पडल्यावर त्याला ‘घाण’ म्हणतात. मग ती जवळ करायची तर सोडाच, पण उचलून लांब फेकण्याचीही आपण तसदी घेत नाही. पण सखे, अशी निराश होऊ नकोस. अजून सगळीच आग विझली नाही. कुठेतरी, कोणीतरी दिवे पेटवतंय. पेटल्या दिव्यात तेल ओततंय. ‘पालवी’ने तेच केलं. तुझी विटंबना व ही अवस्था माझ्या सारिकाला सहन झाली नाही. तिनं रान उठवलं. तिने, डिंपलने, आम्ही मिळून तुला निवारा शोधला. डॉ. राजेंद्र व डॉ. सुचेता धामणे यांच्याकडे. अहमदनगरजवळ शिर्डी रस्त्यावर हे जोडपं ‘माऊली’ मंदिर उभे करून सेवा करत आहे. अहोरात्र रस्त्यावर भटकणा-या मानसिक संतुलन हरवून बसलेल्या माताभगिनींना ही ‘माउली’ हक्काचं घर, ऊब, अन्न, वस्त्र देतेच, पण सन्मानही देते. तिच्या मानसिक गरजा ओळखून पु-या करते. त्यांना सलाम!
आता तू सुरक्षित वातावरणात आहेस. तुझी काळजी घेणारे हात सोबत आहेस. तुझं दु:ख त्यांच्यासमोर मोकळं कर आणि सन्मानाने जगण्याचा प्रयत्न कर. आम्ही सगळे तुझ्याबरोबर आहोत.


dimple@palawi.org