आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुष्य सजवू चला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खूप काही करायचं मनात आहे, पण हातात वेळ नाही! या खूप काही करण्याची प्रथम आपण एक यादी काढू व त्यातून पाचच गोष्टी निवडू. यादी काढताना निकष किंवा गरज कोणत्या गोष्टीची आहे व नंतर आवड, हौस कोणत्या गोष्टीची आहे तेसुद्धा डोळसपणे पाहू. या निमित्तानं आपल्या आवडीनिवडीचा दर्जाही आपण घासूनपुसून पाहू.

पुढील कोणत्या गोष्टी तुम्हाला करावयाच्या आहेत?
लवकर उठून फिरायला जायचंय, योगासनं करायचीत, मंदिरात जायचंय, रेडिओवर भक्तिसंगीत ­ऐकायचंय, काम वेळेत करून संगीत किंवा एखादी कला शिकायचीय, वाचायचंय, लिहायचंय, मित्रमैत्रिणींशी मनमोकळ्या गप्पा मारायच्यात, नातेवाइकांना भेटायचंय किंवा घरकाम करायचंय. वेळ काढून राहिलेलं शिक्षण पूर्ण करायचंय, दुसर्‍याला शिक्षणात मदत करायचीय, मला येणार्‍या काही कला दुसर्‍यांना शिकवायच्या आहेत, दुरावलेले सगेसोयरे जोडण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, शाळेत असल्यापासून आवडलेल्या कविता म्हणायच्या, पाठ करायच्या, वाचावयाच्या आहेत. ठरवून पण अचानक आपल्या किंवा ओळखीच्या वृद्ध नातेवाइकाला डब्यात चांगला पदार्थ घेऊन जाऊन भेटायचंय, अंगभर हात फिरवून मनापासून त्यांची चौकशी करायचीय, त्यांच्या आवडीची कथा, गाणं, दृश्य लॅपटॉपवर त्यांना दाखवून सुखद धक्का द्यायचाय. हे सगळं सुख ओंजळीत भरून घ्यायचंय.

डोळे उघडे ठेवून पाहूया. घरात, समाजात व देशात काय चांगलं वा वाईट घडतंय. चांगले बदल घडवण्यासाठी आपण काय करू शकतो, आपली प्रवृत्ती कशी आहे, काही करण्याची, नुसतेच शेरे मारण्याची, दुर्लक्ष करण्याची, आक्रमक, क्षमाशील, वगैरे. कसे आहोत आपण?आपण जसे आहोत तसंच राहावं, की थोडंथोडं करत खूप बदलायचं आहे? थोडा वेळ काढून आपलं व दुसर्‍याचं आयुष्य आपण सजवू-घडवू शकतो का? खूप सोप्या गोष्टी असतात ज्या आपण वेळ नाही म्हणून नाकारतो व आयुष्यही आपल्याला नाकारतं. शरीर पाहायला आरसा लागतो, पण आत डोकावयाला फक्त वेळ लागतो. आतापासून तोच काढायचा. काढणार ना?