आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमूल्य भेट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी सांगावे
शहाणे करून सोडावे सकल जन
रामदासांच्या या वचनाप्रमाणे मला जे जे आवडते, मग ते नाटक असू दे, फूल, रोप, व्यक्ती किंवा वाचनात आलेले एखादे चांगले पुस्तक; आपल्या आवडत्या व सर्व परिचितांना ते दाखवावे, द्यावे, देतच राहावे, हा माझा नेम आहे.
याच वेडातून आतापर्यंत बर्‍याच पुस्तकांची देवाण-घेवाण झाली. अब्दुल सत्तार इदीचे ‘केवळ मानवतेसाठी’ असेच एक उत्कृष्ट पुस्तक.

मला नेहमी वाटते, प्रत्येकाने पुस्तक किंवा रोप भेट म्हणून द्यावे. मे महिन्यात माझ्या मुलाने, आशिषने, डॉ. रेणू मेहतानी यांचे ‘प्राणायाम शक्ती’ हे पुस्तक भेट दिले. माझी स्वत:ची योग व आयुर्वेदावर पूर्ण विश्वास व श्रद्धा आहेच, कारण तसे अनुभव माझ्या वाट्याला आलेले आहेत.

वीस वर्षांपूर्वी मी गुडघेदुखीने हैराण झाले होते. डॉक्टरांनी गोळ्या देऊन सांगितले, ‘इथून पुढे जमिनीवर बसणे बंद’ मला ते शक्य नव्हते. मी लगेचच पंढरपुरातले योगतज्ज्ञ अशोक ननवरे यांच्याकडे गेले. त्यांनी जी आसने सांगितली व तेल लावण्यास सांगितले, ते नियमित करत गेले. तीन महिन्यांत माझी गुडघेदुखी थांबली. आजतागायत मला गुडघ्याचा कसलाच त्रास नाही. असे बरेच अनुभव मी व आमच्या कुटुंबीयांनी, परिचितांनी घेतले, त्यामुळे माझा योगसाधनेवरचा विश्वास वाढतच गेला.

माझ्या हातात जेव्हा हे प्राणायाम शक्तीचे पुस्तक आले, प्रथम ते वाचले. आता त्याचा अभ्यास चालू आहे. या पुस्तकाचा त्वरित आलेला एक अनुभव. माझी पित्तप्रकृती आहे. थोड्याफार खाण्याच्या वेळा बदलल्या किंवा दैनंदिन व्यवहारात बदल झाला की, माझे डोके दुखते. साधारण अशी वेळ आली की, आठवड्यातून एक अशी, वेदनाशामक गोळी मला लागायची. परंतु, हे पुस्तक मन लावून वाचत गेले, वाचलेले कृतीत उतरवत गेले. या दोन महिन्यांत मला कसलीच व कशासाठीही गोळी घ्यावी लागली नाही. आता मात्र मी झपाटल्यासारखी झाले आहे! जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पुस्तक पोहोचवण्याचा ध्यास मला लागला आहे. ‘पालवी’त आम्ही एचआयव्ही व एड्ससहित जगणार्‍या मुला-मुलींचे व महिलांचे संगोपन करतो. त्यांच्यासाठी तर आता माझा पूर्ण प्रयत्न राहील. कारण मला शंभर टक्के विश्वास आहे, की आपल्या योग व आयुर्वेदाच्या मदतीने आपण या सर्व मुलांना दीर्घायुषी करू शकू. त्यांच्या वेदना कमी करू शकू...

एकूणच ‘प्राणायाम शक्ती’ या पुस्तकाने मला बरेच शिकवले. आजार कशामुळे होतात, त्याचा नेमका उगम कोठे होतो, आजारी पडल्यावर नेमके उपचार कशावर व कसे करावेत, असे बरेच काही यात आहे.
ननवरे सरांनी आम्ही पहिल्यांदा योग शिबिराला गेलो, तेव्हाच सांगितले होते, ‘योग म्हणजे नुसती आसने नव्हेत, तर एक जीवनपद्धत आहे. आणि हेच खूप जणांच्या लक्षात येत नाही. नुसती आसने करून भागणार नाही. ती जीवनपद्धती अवलंबली पाहिजे. खरं तर जसजसं आपण योगमय होतो, तसतसे आपण शुद्धतेकडे सरकत जातो आणि ही शुद्धताच महत्त्वाची आहे.’

या पुस्तकामुळे मनातील व भावनिक बदल कसे घडतात, ते मी फोनवर जेव्हा डॉ. रेणूजी यांच्याशी बोलले, तेव्हा तर खूप सकारात्मक भावना जाणवली.
२१ जून हा जागतिक योग दिन सर्वांनीच साजरा केला. खूप छान झाले; पण आपण वैयक्तिक पातळीवर योग जीवनपद्धती आपणास आणण्याची खूप गरज आहे. या पुस्तकातील पुढील उतारा खूप लक्षवेधी आहे. तसे तर पूर्ण पुस्तकच.

प्राणायामाच्या नियमित अभ्यासामुळे श्वास जसजसे खोलवर व सावकाश होत जातात, तसतसे मनातील चलबिचल, विचार स्थिर होतात व मन नव्याने बांधले जाऊन शांत होते. चालू असलेली फिल्म जेव्हा कमी वेगाने फिरू लागते, तेव्हा प्रत्येक चित्राची फ्रेम आपण पाहू शकतो. प्रत्येक चित्र स्वतंत्रपणे बघू शकतो. तसेच जसजसे श्वसन सावकाशपणे होऊ लागते, तसतशी आयुष्याची प्रत्येक फ्रेमपण स्पष्टपणे व साक्षीभावाने पाहू शकतो. त्यामुळे आपल्या आतली विवेकबुद्धी आयुष्यात येणारी कोणतीही परिस्थिती हाताळू लागते. साहजिकच अचूक निर्णय घेतले जातात व त्यानुसार कार्य केले जाते. सावकाश तरीही पूर्ण श्वसन करण्याच्या अभ्यासाद्वारे प्राणायाम नेमके हेच करीत असतो. एकूणच प्राणायामाने मला जीवनाच्या तत्त्वज्ञानाचे मार्गदर्शन केले व व्याधीमुक्तीचे दरवाजे खुले केले.

मंगल शहा
dimple@palawi.org
बातम्या आणखी आहेत...