आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आला क्षण गेला क्षण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मी पूर्वाश्रमीची दोशी. शिक्षण बार्शीच्या सिल्व्हर ज्युबिली हायस्कूलमध्ये झालं. आमचे मुख्याध्यापक माळी सर. फार प्रसन्न‍ व करारी व्यक्तिमत्त्व. मूर्ती लहान, पण कीर्ती महान. स्थूल, बुटके, पांढरे शुभ्र धोतर आणि कोट. कायम फिरतीवर असणार. चष्म्यातून रोखलेली बारीक नजर. शाळेची शिस्त मोडलेली त्यांना चालणारच नाही. म्हणूनच शाळा भरायच्या वेळी माळी सर आवारात उभे; जेणेकरून विद्यार्थी येताना दिसतील, सर्व वर्गांवर करडी नजर राहील, मुलगा-मुलगी कुणीही असो, प्रवेशद्वारातूनच आत येण्यास सांगत. नको त्या मार्गाने आत घुसायचं नाही. थोडं लांब पडलं तरी चालेल; पण राजमार्गच योग्य, ही शिकवण मिळाली. नकळत एक संस्कार झाला.

दुसरा महत्त्वाचा शब्द! वर्गात आले की सर्व वर्गात फेरी. नजर तीक्ष्ण. मला पायाचा तिढा किंवा पायावर पाय टाकून बेंचवर बसण्याची सवय. सरांना सर्व विद्यार्थ्यांची नावंही माहीत असत. वर्गात आले की मला कायम म्हणणार, “दोशी, पायात पाय घालू नका. नीट बसा, ही सवय चांगली नाही. आपल्याही पायात पाय नको. दुसर्‍याच्याही पायात पाय कधी घालायचा नाही.’’ जाता-जाता दिलेला पाठ केवढा महत्त्वाचा. बाराव्या-तेराव्या वर्षी शिकलेला हा पाठ आज वयाच्या साठीनंतरही जसाच्या तसा आठवतो.

सहज जरी एखाद्या कार्यक्रमाला जायचं असेल, तरी दुसर्‍याच्या वेळेचा खोळंबा करणे किंवा मला घ्यायला या किंवा मी तुमच्याकडे येते मग मिळून जाऊ किंवा मी आल्याशिवाय तुम्ही जाऊ नका, असं म्हणतच नाही कधी. मी वेळेत आले तर ठीक; नाही तर तुम्ही वेळेत निघा, माझ्यासाठी किंवा आमच्यासाठी तुमचा वेळ घालवू नका, असंच नियोजन होतं. ‘पायात पाय घालणं नको’, सर्वात महत्त्वाचा मंत्र माळी सरांनी दिला.

माळी सर वर्गात आले की, आमचे शिक्षक उभे राहणार. ते शिकवायचे थांबले की, माळी सर त्यांना सांगायचे, तुमचं चालू द्या, थांबू नका. आमच्याकडे पाहून मनगटावरच्या घड्याळाकडे पाहत, पाच ते सहा वेळा एका ठरावीक व छान लयीत म्हणणार, “आला क्षण, गेला क्षण! आला क्षण गेला क्षण!!”

थोडक्यात, क्षण कोणासाठी थांबत नाही. प्रत्येक क्षणाचा सदुपयोग झालाच पाहिजे. क्षणासारखे मौल्यवान काही नाही. क्षण वाया घालवू नका... व लगेच पुढच्या वर्गाकडे निघून जाणार. खरंच लहानपणीची खास करून शाळेतली शिदोरी घेऊनच आपली वाटचाल चालू असते. अगदी अंगी शिस्त अंगी बाणवण्यापासून खाऊच्या डब्यापर्यंत. खाऊच्या डब्यावरून एक गंमत आठवली. मी पाचवीत होते. माझी आई सुगरण. (सुगरण म्हणजे काय हे खूप नंतर कळलं) ती वरण करणार ते रवीनं घोटून, त्यात हळद, हिंगडा, मीठ वगैरे टाकूनच करणार. माझी भोसले नावाची मैत्रीण रोज डाळ त्याच्यावर थोडंसं तिखट टाकून आणणार, दुसरं काहीच नसायचं. मला भोसलेसारखी डाळ करून दे... कशी ते मला आईला सांगताच यायचं नाही, तिलाही कळायचं नाही...

पण मला आवडते म्हटल्यावर एक दिवस आईच जेवणाच्या सुटीच्या वेळी शाळेत आली. घरापासून शाळा तीन ते चार किमी. अंतरावर होती. वेळही दुपारची, कडक उन्हाची. ती शाळेत माझ्या वर्गात आली. म्हणाली, भोसलेचा डबा दाखवतेस का? मी तिला दाखवला. तिला हसू आलं. मग न घोटताच हळद, मीठ न टाकताच वरती किंचित तांबडं तिखट टाकून भोसले ज्या पद्धतीत डबा आणत होती, अगदी तसाच डबा आईने मला करून दिला. ‘मुलीसाठी वाट्टेल ते’ हा उच्चार तिने कधी केला नाही; पण वागण्यात मात्र एकच व्रत होतं, मुलांसाठी वाट्टेल ते... आणि ते आयुष्यभर जपलं. संस्कार कृतीतून कसे झळकावेत, हे नंतर समजत गेलं. सर्वात उत्तम संस्कार माझ्या आईने केला ‘वाचन संस्कार’. वाचनाची गोडी तिने नकळत्या वयात लावली. तशीच कवितांची गोडीपण माझ्या आईनेच लावली. आईची शाळा चौथी-पाचवीपर्यंतच झालेली. पण किती सुंदर सुंदर कविता ती पाठ करून घ्यायची. अखंड कामात बुडालेली आई पुढे बसून कविता म्हणायला लावायची. त्यावरच साधं बोलत बोलत चर्चा करायची. तेव्हा माझ्या भावाकडून ती नेहमी एक कविता म्हणून घ्यायची. आता ती कविता पूर्ण आठवत नाही, फक्त एक ओळ आणि आशय आठवतो. कविता होती, हिंदी “ठुकरा दो या प्यार करो...” ती स्त्री देवाला सांगते, माझ्याजवळ पैसाअडका काहीही नाही. दोन हात व एक मस्तक घेऊन भक्तीने मी तुझ्या दारात आले. ही अशी भक्ती तू स्वीकार किंवा नाकार!

आई म्हणाली, अगदी खरं आहे. देवाला फक्त भक्ती व नि:स्वार्थी सेवा आवडते. तो कशाला कोण किती नैवेद्य, कपडा, पैसा चढवतात ते पाहील? त्यापेक्षा भुकेल्या लोकांच्या मुखात घास घालावा. म्हणूनच माझी समाजसेवेतील आनंद घेण्याची सुरुवात भाद्रपदात दहा दिवस सरकारी दवाखान्यात गरजू बाळंतिणीला डबा देण्यातूनच झाली. देवाला दही-दूध नैवेद्य देण्यापेक्षा, भक्तीने मस्तक टेकवणे आणि कुठल्याही गरजूंना अन्न‍- वस्त्र- निवारा देणं, हे संस्कार कवितेच्या माध्यमातून आईने रुजवले. ते बर्‍यापैकी फलद्रूपही झाले...
dimple@palawi.org