आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रेमाचा त्याग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणत्याही वयात येताना फक्त प्रेम व प्रेमाच्या नावाखाली ओरबाडणं नको. एकमेकांच्या सुखाचा, एकमेकांच्या माणसांचाही विचार व्हावा. तुमच्या प्रेमात संपण्याची किंवा संपवण्याची ताकद नको. खरं तर त्याला ताकद म्हणतच नाहीत.

आई हवी होती... कितीतरी गोष्टी तिला विचारायच्या होत्या, बोलायच्या होत्या... मनातलं वादळ सारखं आतून धक्के देत आहे... बऱ्याच प्रश्नांची उत्तर हवी आहेत... पण विचारू कोणाला, कामानिमित्त आई परदेशी गेली. ती दहा दिवसांनी येणार. मला तर आताच सगळ्या नाही तरी नेमक्या प्रश्नांची उत्तरं हवीत. मुळात मला सुरक्षितता, शांतता व एक खंबीर आधार हवा आहे...
शी... नको त्या गोष्टीच का आठवताहेत... काल मी वर्गात लीनाला म्हणाले, मला खूप घाबरल्यासारखं होतंय. घरात सध्या कोणीच नाही. थोडी भीती व वेगळंच काहीतरी वाटतंय. खरं तर आमची मैत्री फक्त सहाच महिन्यांची; पण जवळ कोणी नाही, म्हणून मी तिच्यापाशी माझ्या भावना बोलून दाखवल्या. आमचं दहावीचं वर्ष आहे. अभ्यासाचा पण ताण आहेच. एकूणच मन:स्थिती बरोबर नव्हती. म्हणून मी लीनाशी बोलायला गेले तर मला म्हणाली, गीता मस्त आयडिया तुझी आई घरी नाही, रात्रीच तुझी ती केअर टेकर का कोण तुला सोबत करण्यासाठी येणार आहे. चल, आपण घरी जाऊन धम्माल करू. ए मी शशांकला पण बोलावते तुझ्या बंगल्यावर, जरा आम्ही ‘मजा’ करतो. मला उबग आला तिच्या बोलण्याचा. ती जे काही सुचवत होती ते माझ्या संस्कारात बसणार नव्हतं. खरं तर आज अस्वस्थ होण्यामागचं कारण पण वेगळंच होतं.

गेले कित्येक दिवस शाळेतून येता-जाता शेजारचा जयेश सारखा बघायचा, हसायचा; पण मी फारसा प्रतिसाद दिला नाही. आज त्यानं चिठ्ठी दिली. मला भेटायची इच्छा आहे म्हणाला. माझ्यावर त्याचं प्रेम आहे, असं बरंच काही लिहिलं होतं. खरं तर पत्रातून त्यानं माझी बरीच स्तुती केली होती. एखादी मुलगी हुरळून गेली असती, पण माझी व आईची खूपदा अशा प्रेमप्रकरणावर चर्चा झालेली आहे. आईने मला प्रेम म्हणजे काय, निष्ठा म्हणजे काय, प्रेमाचा खरा अर्थ केव्हा कळतो, आयुष्यात काय महत्त्वाचं, इतकंच काय शरीरसुख म्हणजे काय, असे वेगवेगळे दाखले देऊन, वेगवेगळी उदाहरणं देऊन खूप गोष्टी समजावल्या होत्या. माझ्यासाठी माझी आई म्हणजे, बेस्टफ्रेंड आहेच, पण खूप आधार वाटतो मला आईचा...

परवा माझ्याच वर्गात असणाऱ्या शशिकलेने जे काही केले, त्यानं मी पार हादरून गेले. हे शशिकला प्रकरण फार भयंकर होते. परवा सरांनी एक दिवसाची ट्रीप जवळच्या पिकनिक पॉइंटला नेली. उद्देश, अभ्यासाचा ताण जरा कमी करावा हाच. वर्गातलाच एक बड्या बापाचा बेटा निलेशचे व या शशिकलेचे प्रेम प्रकरण गाजत होते. निलेशचे बाइकवर भन्नाट येणे, परफ्युमचा वास, हिला भारी-भारी वस्तू भेट देणे, चर्चेचा विषय होता. पण ट्रीपमध्ये हे दोघेही सर्वांच्या नजरा चुकवून तीन-चार तास गायब होते. दुसऱ्या दिवशी हेडसरांनी केबिनमध्ये बोलावले. त्यांच्या पालकांना बोलावून समज दिली. पण या दोघांना काहीच फरक पडला नाही. नंतर दोन दिवस शशिकला आली नाही. तिच्या जवळच्या मैत्रिणीने तिला बरे वाटत नसल्याचे सरांना सांगितले. पण नंतर तिनेच आम्हाला सांगितले, शशिकलेला दिवस गेले होते. म्हणून तिने अबाॅर्शन करून घेतले. घरच्या कोणाला कळलं पण नाही. निलेशने बरेच पैसे मोजले. थोडे दिवस गेले, तर शशिकला अजून दुसऱ्या कोणाबरोबर आणि निलेश तिसरीबरोबर फिरतोय...

हेच मला सगळं आईशी बोलायचं होतं. परवाच आईने एक लेख वाचून मला समज दिली होती. तुमच्या पिढीचे हे जे ‘युज अँड थ्रो’चे फॅड आहे, ते समाजाला घातक ठरणार आहे. प्रत्येकच बाबतीत तुम्ही हेच चालवलंय. वापरा व फेकून द्या. जरा मागे वळून पाहा. तुमच्या आईने, आजीने काय काय सोसले. अगं ते सोसण्यात पण सुख होते. आम्ही वीस वर्षे एकत्र राहात होतो. तुमच्या अशा बेताल वागण्याने निसर्ग तुम्हाला माफ करत नसतो. नको त्या वयात नको ते अनुभव घ्यायचे, मग पुढे मातृत्वच हरवतं. कुटुंब टिकवण्याची जबाबदारी स्त्रीवरच टाकण्यात आली आहे. तिने खंबीर असायला हवं. महत्त्वाचं म्हणजे, या वयात नाही म्हणायला शिकावं. तारुण्य म्हणजे फक्त प्रेम प्रकरण का गं? अगं हेच वय असतं घडायचं, काहीतरी मिळवायचं. पालकांनी दिलेले स्वातंत्र्य फक्त स्वैराचारातच घालवायचे का? खूप पोटतिडकीने आई बोलत होती. आज मला वाटत होते, आईला घेऊन शशिकलेकडे जावे. तिला समजावून सांगावे...
वयात येताना फक्त प्रेम व प्रेमाच्या नावाखाली ओरबाडणं नको. एकमेकांच्या सुखाचा, एकमेकांच्या माणसांचाही विचार व्हावा. तुमच्या प्रेमात संपण्याची किंवा संपवण्याची ताकद नको. खरं तर त्याला ताकद म्हणतच नाहीत. ताकदीने माणसं उभी राहतात. संसार उभा राहतो, समाज व देश उभा राहतो. वि. स. खांडेकरांची युगंधरा, अमृतवेल, सोनेरी स्वप्न अवश्य वाचावी. प्रेमाचा त्याग व त्यागातलं प्रेम कळत जातं, नकळत!
(dimple@palawi.org)