आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशाचा धर्म आणि कशाचे धर्मांतर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पालवीच्या निमित्ताने खूप काही शिकायला मिळालं आजवर. अलीकडे मी सर्वांना सार्थ अभिमानाने सांगते, ‘पालवी’ एक विद्यापीठ आहे. खूप शिकायला मिळते. फक्त एक आहे, इथे अनुभव मिळतात; पण कागदावर कोणतेच प्रशस्तिपत्र मिळत नाही. आज विनोबाजींचे गीता प्रवचन वाचत होते. ‘श्रेयान् स्वधर्मो विगुण:’ स्वधर्माबद्दल फार मार्मिकपणे विनोबांनी सांगितले आहे. ते म्हणतात, दहा वर्षांपूर्वी माझा जो धर्म होता, तो आज नाही. आजचा दहा वर्षांनंतर टिकणार नाही.
चिंतनाने आणि अनुभवाने वृत्ती पालटत जाते, तसा तसा पूर्वीचा धर्म गळत जातो आणि नवीन लाभत असतो. हट्टाने काहीच करायचे नसते. अगदी खरं आहे. २००१मध्ये काम सुरू करताना एकच ध्येय होते, जात असलेल्या जिवाला वेदनारहित मृत्यू यावा. आता वाटते, जन्मलेल्या प्रत्येकाला सन्मानीत आयुष्य मिळायला हवं. ही सर्व मुलं सुदृढ, सतेज, निरोगी व दीर्घायुषी व्हावीत, आणि ती तशी होताहेत. झाड तेच आहे, पण अजूनही नवी पालवी फुटत आहे. नुसती पालवी नाही; आवाका, क्षेत्र व उद्दिष्टही वाढत आहे.

या काळात समाजधर्मही बदलला आहेच की. खूपदा प्रश्न पडतो, आपण बदललो की समोरचा बदलला? पण नंतर कळतं, दोघेही दोन-दोन पावले पुढे आलो आहोत, म्हणूनच ही ‘पालवी’तली मुलं एवढी सुंदर, सतेज आणि सर्वात महत्त्वाचं हिम्मतवान झाली आहेत. आता ‘पालवी’तच समाजाचा एक महत्त्वाचा व मोठा गट तयार होतो आहे. लहान म्हणता म्हणता ही मुले, आता सन्मान्य नागरिक झाली आहेत. समाजाप्रति स्वत:ची रग, मस्ती, एक वृत्ती घेऊन ही मुले वाढत आहेत. त्यांना स्वत:ची मतं आहेत. सगळ्यात महत्त्वाचं, स्वत:ला बदलत समाजाला बदलण्याचीही यांच्यात धमक आहे. घेणं आणि देणं हा निसर्गनियम आहे, म्हणजेच, त्याचा तो धर्म आहे. आपण सर्व जण त्या निसर्गाचाच एक भाग आहोत. आपला धर्मही तोच आहे. मूळ धर्म बदलतच नसतो. फक्त निमित्त काढून आपण, तो बदलण्याचा किंवा मूळ प्रवृत्तीपासून दूर करण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा आपण होतो अर्जुन; पण प्रत्येकालाच कृष्ण मिळेल असं नाही.

तेव्हा आपणच अर्जुनानंतर कृष्णही व्हायचं आहे. कर्तव्यापासून, मूळ धर्मापासून दूर जायचंच नाही. माणसाचा माणुसकी हाच फक्त धर्म आहे. काही दिवसांपूर्वी संध्याकाळी १०-१२ मुलं त्यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पालवी’तील मुलांना काय आणू, म्हणून विचारण्यास आली. मुलं गुणी होती. त्यांच्यातील एक जण १०-१२च्याच वयाचा. त्याने सांगितले, आज प्रत्येक मुलगा एकटा पडत चालला आहे, एकटा पडत चालल्याने त्याच्यातली व्यसनाधीनता वाढली आहे. ही मुलं गुटखा खाऊन स्वत:ला बरबाद करत आहेत. अशा मुलांना सांगायचंय की, आपण अनाथांसाठी, वृद्धाश्रमातल्या वृद्धांसाठी काही तरी चांगलं करुयात.
कोण म्हणतं, तरुण पिढी वाया जातेय. फक्त कोणीतरी भरकटू पाहतोय; पण त्यालाही सावरायला त्याचेच भाऊबंद असे उभे राहताहेत.

रणांगण वेगळं, अर्जुन वेगळा, कृष्णही वेगळा. पण स्वधर्माला धरून आचरण करायला हवं, हे आताच्या कृष्णाने सांगताच हातात योग्य शस्त्र धरून समाजाला वळण लावणारे आपण सारे अर्जुनच. पण आपण नेहमीच ‘अतिपरिचयात अवज्ञा’ अनुभवतो. पुढचा काय बोलतो, सांगतो व लिहितो, याची आपल्या लेखी किंमत फार कमी असते. धर्मांतराबद्दल असंच होतं. धर्मांतराचा आपण कधीच खोलवर विचार करत नाही.
आपण प्रथम आपला धर्म जाणून घेऊ, धर्म जाणून घेता घेता आपली आवड, आनंद कशात तेही पाहू, त्याप्रमाणे आपला व्यवसाय, छंद निवडू व तो निष्ठेने पाळू. प्रत्येकाने एक काळजी घ्यावी, आपण ज्या गोष्टीची निवड करणार त्या गोष्टीचा धर्म कोणता हे जाणून घ्यावे. आज बहुतांशी करिअर निवडताना, हे पाहिलं जात नाही. मग दर सहा महिन्यांनी या कंपनीतून त्या कंपनीत किंवा या व्यवसायातून त्या व्यवसायात आपलं ‘धर्मांतर’ चालू असतं. परिचारिका, डॉक्टर यांच्याकडे सेवाधर्म, पुजाऱ्याकडे भक्तिधर्म आहे का? अनेकदा शिक्षक, पोलिस, नेता यांच्याकडे मूळ धर्म जाणून काम स्वीकारल्याची जाण दिसतच नाही. फक्त पैसा मिळवणे व दुसऱ्याच्या जिवाशी खेळणे, हा यांचा धर्म भासतो. मला तरी वाटतं, प्रत्येकाच्या तळाशी सेवाधर्म चिकटलेलाच असतो, असावा. सेवाधर्म म्हणजे, नुसती सहानुभूती किंवा करुणा नव्हे. ज्या घटकासाठी काम करतो, त्याचे १००% हित जपलं जावं, हाच उद्देश, हीच वृत्ती व हाच धर्म असावा. निसर्गधर्म एकच सांगतो, जे घेतलं तेच, कितीतरी पटींनी परत दिलं पािहजे. एक दाणा पेरला जातो, सहस्र हाताने निसर्ग तो परत करतो. फक्त पेरतानाच उत्तम तेच पेरलं, तर येणारं पीक उत्तमच असणार. सेवाधर्म सर्वत्रच असावा. यात उलट आहे.
तुम्ही एकपट समाधान देत असाल, तर अमाप पटीत ते तुमच्या ओटीत परत येतं. अशा वेळी आपला धर्म कोणता किंवा या आधी आपण धर्मांतर केलं आहे काय, हे आधी तपासून बघू या. नेमका स्वधर्म जाणून मगच वाटचाल करू या. यासाठी विनोबांंचे ‘गीता प्रवचन’ मार्गदर्शक ठरावे.
dimple@palawi.org