आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंगेश पाडगावकरांचा व्यासप्रतिभेला सलाम

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एखाद्या साहित्यकृतीला वारंवार भेटावंसं वाटणं, पुन्हापुन्हा त्या साहित्यकृतीचा नव्या आयामांनी शोध घ्यावासा वाटणं, यातच त्या मूळ कृतीचे विदग्धपण सामावलेलं असतं. याचाच प्रत्यय देत कविर्शेष्ठ मंगेश पाडगावकर महर्षी व्यासमुनींच्या महाभारत ग्रंथाला नव्यानं सलाम करत आहेत आणि तोही एका अनुवादाच्या माध्यमातून. कमला सुब्रrाण्यम यांनी इंग्रजीतून लिहिलेल्या कथारूप महाभारताचा मराठी अनुवाद घेऊन पाडगावकर वाचकांच्या भेटीस येत आहेत. त्यानिमित्त खास...

• गोष्टीरूपात सांगणार कथारूप महाभारत
महाभारत या शब्दाचा उच्चार करताच समोर येते ती एक अतिप्रचंड विस्तारलेली लक्ष श्लोकांची संहिता. मानवी जीवनाचा, त्यातील गुंतागुंतीचा, विकार-वासनांचा, अलौकिक घटनांचा, मानवी स्वभाववैशिष्ट्यांचा, सूडभावनेचा आणि गीतारूपी तत्त्वज्ञानाचा एक आडवातिडवा पट. हाच पट कवी मंगेश पाडगावकर आता नव्याने गोष्टीरूपात सांगणार आहेत - कथारूप महाभारत या बृहत् ग्रंथात. राजहंस प्रकाशनाच्या हीरकमहोत्सवी वर्षानिमित्त या ग्रंथाचे प्रकाशन येत्या ऑक्टोबर महिन्यात होणार आहे.

• पाडगावकरांच्या संवादातून समोर आले
व्यापक अर्थपटाचे विशाल रूप :
या कथारूप महाभारत ग्रंथाच्या अनुवादाच्या निमित्ताने मंगेश पाडगावकर यांच्याशी साधलेल्या संवादातून महाभारताच्या व्यापक अर्थपटाचे एक विशाल रूप समोर आले. प्रत्यक्षात महाभारत हा संवादच आहे. गोष्टीरूप संवाद. आज हजारो वर्षांनंतरही पुन्हा त्याच गोष्टीरूपातून हा संवाद वाचकांशी साधताना एक वतरुळ पूर्ण होत असल्याची भावना मनात आहे. पाडगावकर म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून महाभारत हा विषय माझ्या मनात खोलवर दडून बसला होता. अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून महाभारत मनात होतेच. महर्षी व्यास आणि शेक्सपिअर यांनी मनावर तेव्हापासून गारूड केले होते आणि आजही आहे. महाभारताच्या मराठीकरणाचा एक प्रयत्न मी त्या वयातही केला होता, पण तो काही साधला नाही. आता इतक्या वर्षांनंतरही मला तोच प्रयत्न परत करावासा वाटला आणि या प्रकल्पाच्या निमित्ताने आता तो वाचकांसमोर येत आहे, याचे समाधान वाटते आहे.

खरे तर महाभारतावर स्वतंत्र लेखनाचा विचारही होता, पण अद्याप त्याला मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे या अनुवादाच्या रूपाने तरी महाभारताच्या सहवासात राहणे झाले, याचा आनंद आहे. यापूर्वी कित्येक वाटांनी हा ग्रंथ वाचक, प्रेक्षकांसमोर येत राहिला आहे, यानंतरही येतच राहील कारण त्यामध्ये कथनाच्या अनंत शक्यता सामावलेल्या आहेत.

• वाचकांच्या जवळिकीसाठी कथारूप माध्यम
महाभारतासाठी चित्रपट, मालिका, काटरून, कादंबर्‍या, अगदी अँनिमेशनपटांचेही पर्याय वापरून झाले आहेत. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्थेने कित्येक वर्षांच्या संशोधनानंतर महाभारताची चिकित्सक आवृत्तीही प्रकाशित केली आहे, जी आज जगभर प्रमाण मानली जाते. असाच एक प्रयत्न इंग्रजी भाषेत कमला सुब्रrाण्यम यांनी केला आहे. त्यांनी स्टोरी टेलिंगची पद्धत वापरली आहे. तीच मी कायम ठेवली आहे. कुठलाही विषय वाचकांच्या पटकन जवळचा वाटावा यासाठी कथारूप माध्यम निवडले आहे.

• महाभारताचे गारूड जगावर शतकानुशतके म्हणून हे कथारूप सांस्कृतिक संचित देण्याचा प्रयत्न : पाडगावकर
महाभारत हा भारतीय जीवनधर्माचा प्राणस्वर आहे. स्खलनशील माणूस आणि चिरंतन मूल्यांचा हा संघर्ष आहे. या कथानकाला सुमारे तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. हा केवळ जय नावाचा इतिहास नाही की गीता सांगणारे ते निव्वळ तत्त्वज्ञानही नाही. कौरव आणि पांडवांच्या भाऊबंदकीची ही कथा नाही की भीषण नरसंहाराचा संग्राम नाही. अनेक मानवी नमुने, असंख्य अलौकिक घटना, अवघे अस्तित्व कवटाळणारे तत्त्वज्ञान या सार्‍यांचा संगम महाभारतात झाला आहे. शतकानुशतके हे महाकाव्य जागतिक मनावर अधिराज्य गाजवते आहे. काल ते जसे आणि जितके संदर्भयुक्त होते, तितकेच वर्तमान घडीलाही ते लागू पडते, आजच्या पिढीसाठीही संयुक्तिक ठरते. प्रतिभावंतांसाठी प्रेरणा ठरते, अभ्यासकांसाठी आव्हान असते, विचारवंतांसाठी दीपस्तंभ आहे, कलावंतांसाठी स्फूर्तिस्रोत ठरते, असे महाभारत कथारूपाने सांस्कृतिक संचित म्हणून वाचकांच्या हाती सोपवले जाणार आहे.

• पाडगावकरांचा प्रतिसाद आणि राजहंसचे हीरकमहोत्सवी वर्ष
राजहंस प्रकाशनाचे दिलीप माजगावकर म्हणाले, राजहंसचे हे हीरकमहोत्सवी वर्ष आहे. याचे औचित्य साधून हे पाडगावकरांच्या प्रतिसादामुळे हे सांस्कृतिक संचित वाचकांच्या हाती देत आहोत. या प्रकल्पाचे दोन खंड असतील. डेमी आकारातील हे ग्रंथ सचित्र असतील. अंदाजे एक हजार पृष्ठांचे हे ग्रंथ अत्यंत वाजवी किमतीत वाचकांपर्यंत नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी ग्रंथाची मूळ किंमत केवळ सहाशे रुपये ठेवण्यात आली आहे. आगाऊ नोंदणीसाठी तर फक्त 295 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. एक ऑगस्ट ते 15 सप्टेंबर या काळात वाचकांना फक्त 295 रुपये भरून ग्रंथाची नोंदणी करता येईल. ग्रंथासाठी ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे कलादिग्दर्शकाच्या भूमिकेत आहेत. तसेच बोधचित्रकार राहुल देशपांडे आणि गोपाळ नांदूरकर यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात हे कथारूप महाभारत वाचकांच्या हातात देण्यात येईल.

• दोन वर्षांत पाडगावकरांनी पूर्ण केला अनुवाद
महाभारत मालिका सुरू असताना एकदा माझे आणि पाडगावकरांचे बोलणे झाले होते. मराठीमध्ये सर्वसामान्य वाचकाला रसाळपणे महाभारत सांगणारे साहित्य उपलब्ध नाही, तेव्हा तुम्हीच का लिहीत नाही, असे मी विचारले होते. तेव्हा त्यांनीच कमला सुब्रrाण्यम यांचे नाव सांगितले होते; पण नंतर एवढा मोठा अनुवाद मला जमणार नाही, असे सांगून तेच इतर प्रकल्पांमध्ये गुंतून गेले होते. त्यानंतर 2009 मध्ये पुन्हा एकदा आमचा हा विषय झाला आणि मी करून पाहतो, असे म्हणत पाडगावकरांनी दोन वर्षांत हा अनुवाद पूर्ण करून दिला. कमलाबाईंनी हाताळलेला कथेचा आकृतिबंध आकर्षित करणाराच होता. त्यांचे पुस्तक इंग्रजी वाचकांमध्ये लोकप्रिय आहे. त्याच्या सोळा आवृत्त्याही निघाल्या आहेत. दुर्दैवाने कमलाबाई आज हयात नाहीत; पण अनुवादासाठी त्यांचा आकृतिबंधच कायम ठेवला.

• मुखपृष्ठ रवी परांजपेंचे
या ग्रंथांचे मुखपृष्ठ ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे करत आहेत. मजकुरासोबत, त्याला समांतर जाणारे काही चित्रित करणे अपेक्षित होते. तसेच मुखपृष्ठासह ग्रंथाची सजावटही त्याच तोलामोलाची हवी होती. त्यामुळे परांजपे यांचेच नाव पुढे आले. त्यांच्यासोबत आतील रेखाचित्रांवर गोपाळ नांदूरकर आणि राहुल देशपांडे यांनी काम केले आहे.