Home »Magazine »Rasik» Mangesh Padgaonkar Books

सिद्धहस्त पाडगावकर

रामदास भटकळ | Nov 12, 2011, 20:59 PM IST

  • सिद्धहस्त पाडगावकर

बॉम्बे बुक डेपोमध्ये अनेक लेखक पुस्तके पाहायला, गप्पा मारायला यायचे. मराठी पुस्तकांच्या प्रेमापोटी मीही तिथे जात असे. तेथेच माझी आणि मंगेश पाडगावकरांची ओळख झाली. तेथे आमचा गप्पांचा अड्डाच असायचा. पाडगावकर माझ्याहून सात आठ वर्षांनी मोठे; पण आमच्यात छान मैत्रीचे संबंध तयार झाले. त्याच काळात जिनाह हॉलमध्ये एक कविसंमेलन पार पडले. त्या कविसंमेलनात सगळ्यात तरुण कवी अर्थातच पाडगावकर होता. त्या संमेलनात वसंत बापट यांच्या ‘दख्खनराणी’ आणि पाडगावकरच्या ‘लारालप्पा’ या कवितांनी प्रेक्षकांची वाहवा मिळवली. पाडगावकर फार रसाळ काव्यवाचन करायचा.
1952 मध्ये पॉप्युलरने प्रकाशनक्षेत्रात उडी घेतली आणि सुरुवातीच्या वर्षांतच गाजलेल्या कवितांच्या पुस्तकांच्या प्रकाशनामुळे आमच्यावर ‘कवितांचे प्रकाशक’ असा शिक्का बसला. त्या काळी कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रकाशक तयार होत नसत. त्यामुळे एका अर्थाने आम्ही पाडगावकरचा ‘जिप्सी’ हा कवितासंग्रह प्रकाशित केला, हे धाडसच होते. अवघ्या तीन महिन्यांत ‘जिप्सी’ची पहिली आवृत्ती संपली. पाडगावकर कवी म्हणून महाराष्ट्रभर गाजला. त्यानंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. कवी म्हणून पाडगावकर निश्चितच प्रसिद्ध आहेत; पण त्याचे गद्यलेखनही तितकेच विपुल आणि वैविध्यपूर्ण आहे याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही. एका कार्यक्रमात मला आणि पाडगावकरांना भाषणाला बोलावले होते. तसे पाडगावकर कायम उत्स्फूर्तपणे बोलतात; पण त्या दिवशी भाषणाला उभे राहिल्यानंतर त्याने खिशातून काही कागद बाहेर काढले. भाषण वाचून दाखवले नाही, पण हातात कागद मात्र संदर्भासाठी ठेवले होते. याबाबत त्याला विचारले, तेव्हा कळले, पूर्वनियोजित आणि विषय माहीत असलेले प्रत्येक भाषण पाडगावकर आधी लिहून काढतो. ते ऐकून मला जाणवले, की पाडगावकर नकळत जे लेखन करतो ते त्याच्या कवितांप्रमाणेच परिपूर्ण आहे. तेव्हा ‘पॉप्युलर’तर्फे कवी पाडगावकरमधील लेखकाला पुस्तकरूपाने प्रकाशित करण्यासाठी मी त्याचे अप्रकाशित गद्यलेखन धुंडाळायला सुरुवात केली. पाडगावकरने ब-याच ठिकाणी अनेक विषयांवर लेखन केले होते, मात्र त्यालाही ते आठवत नव्हते. आधी जे उघड उघड आहे, ते गोळा करायला सुरुवात केली. उदा. त्याने श्रीपु आणि बा.भ. बोरकरांची घेतलेली मुलाखत आम्हाला माहीत होती. कुठे कुठे लिहिलेल्या प्रस्तावना गोळा गेल्या. तो बरीच वर्षे ‘साधनेत’ नोकरीला होता. तेव्हा साधना परिवारातल्या संगीता बापटांची मदत घेऊन तिथे लिहिलेले साहित्य गोळा केले. हे सर्व शोधल्यानंतर खुद्द पाडगावकरलाही इतके लेखन केल्याचे आश्चर्य वाटले. यात प्रवासातल्या आठवणी, व्यक्तिचित्रण, काव्यमय शैलीत निसर्गाचे वर्णन करणारे लेख अशा स्वरूपातील त्याचे लेखन एकत्र करून ‘आले मेघ भरून’ या लघुनिबंधाच्या पुस्तकाचे संकलन केले. त्याने आकाशवाणीवरून गांधीजींच्या कार्याचे पैलू दाखवणारी दिलेली आठ भाषणे ‘असे होते गांधीजी’ या पुस्तकात एकत्र केली आहेत. स्वतंत्र लेखन करताना कधीकधी महिनोन् महिने नवे काही सुचत नाही, त्या वेळी चांगल्या कवितांचे अनुवाद करावेत, हा गुरुस्थानी असलेल्या ना.घ. देशपांडे यांचा सल्ला मानून तरुण वयात पाडगावकरने संत मीराबाई, कबीर, शेक्सपिअर असा अनुवादाच्या दुनियेतही स्वैर संचार केला होता.
स्वत:च्या तसेच इतरांच्या कवितांवर विद्यार्थी म्हणून त्याने केलेला अभ्यास आणि निष्कर्ष तसेच अनुवादक म्हणून केलेली पूर्वतयारी त्याच्या ‘चिंतन’ या पुस्तकांत वाचायला मिळेल. पाडगावकरने करंदीकर, श्री. पु. भागवत, वसंत बापट, गंगाधर गाडगीळ या आपल्या जिवलग मित्रांविषयी तसेच रवींद्रनाथ टागोर, कवी मायदेव, मामा वरेरकर आदींबद्दलही बरेच लेखन केले आहे. या सर्वांचा समावेश ‘स्नेहगाथा’ या पुस्तकात करण्यात आला. तर ‘शोध कवितेचा’ या पुस्तकात त्यांच्या कवितांच्या निर्मिती प्रक्रियेमागचे गुपित उलगडले आहे.
हे सर्व लेखन पाहिले असता आपल्या लक्षात येते, की ‘कविता’ या आपल्या आवडीशी निगडितच त्याने लेखन केले. त्याचे हे लेखन वाचकांच्या दृष्टीने मौल्यवान ऐवज असेल असेच त्याचे लेख आम्ही या पुस्तकांमध्ये घेतले आहेत. लेख लिहायचे नाहीत, केवळ कवितांशी एकनिष्ठ राहायचे, असे ठरवूनही नकळत पाडगावकरने जे लेखन केले ते तितकेच समरसून केले होते, असे मला वाटते. पाडगावकरच्या विपुल गद्य लेखनाचा हा खजिना वाचकांसाठी उपलब्ध होऊ शकला याचाच आनंद चिरकाल टिकेल...
शब्दांकन : नम्रता भिंगार्डे

Next Article

Recommended