आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चॉइस इज युवर्स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंबाखूजन्य मृत्यू हे सहज टाळता येण्याजोगे आहेत. मात्र, हे ओढ‌वून घेतलेले मृत्यू थोपवण्यासाठी या व्यसनाच्या आहारी गेलेल्या प्रत्येकाने यातून सुटकेसाठी प्रयत्न केलेच पािहजेत.

कोणता उद्योगधंदा स्वनिर्मित उत्पादनांनी स्वत:च्याच ग्राहकांच्या मृत्यूचे कारण ठरतो? पूर्ण जगात याचे उत्तर एकच ‘The only industry which kills its own customers is Tobacco industry.’ अर्थात, तंबाखूजन्य उद्योग! आपल्या उत्पादनांचे नियमित सेवन करणाऱ्या साधारण ५०% ग्राहकांची शिकार हा उद्योगधंदा करतो. सिगारेट, सिगार, विडी, हुक्का, मावा, गुटखा, चैनी, तपकीर, मशेरी अशी अनेक रूपे तंबाखूची, काही धूम्रपानाचे प्रकार, तर काही चघळायच्या तंबाखूचे. दरवर्षी जगभर साधारण ६ मिलियन म्हणजे, ६० लाख लोकांचा बळी, तोही बहुतांशी वेळा अकाली, एकट्या तंबाखूमुळे जातो. जगात होणाऱ्या सर्व मृत्यूंपैकी दुसऱ्या क्रमांकाचे कारण तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन, हे आहे. दर दहा मृत्यूंपैकी एक मृत्यू तंबाखूच्या नावावर नोंदला जातो. कॅन्सर, एड्स, टीबी, दारू, अपघात, अमली पदार्थ या सर्वांपेक्षा जास्त मृत्यू तंबाखूने होतात. भारतात दर दिवशी २२००, तर वर्षाला ९-१० लाख लोकांच्या मृत्यूचे कारण म्हणजे तंबाखू. प्रौढांमध्ये साधारण ३५% स्त्री-पुरुष तंबाखूचे शौकीन. वयाच्या १५ वर्षांच्या आत ३७% मुलांना तंबाखूची ओळख होत असते. म्हणजे ‘कॅच देम यंग’(Catch them young) हे सूत्र तंबाखूच्या बाबतीत दुर्दैवाने लागू पडते.

तंबाखूत मुख्य द्रव्य असते निकोटीन. हे निकोटीन रक्तात मिसळून मेंदूपर्यंत पोहोचते व मेंदूत प्रक्रिया होऊन थोडा वेळ उल्हसित वाटते, तरतरी येते. या परिणामांमुळे तंबाखूचा मोह वाढतो. सहज मित्राने आग्रह केला म्हणून घेतलेला सिगारेटचा पहिला झुरका किंवा तोंडात रिकामी केलेली तंबाखूची पहिली पुडी हळूहळू हवीहवीशी वाटते. व मग त्याविना जीवन नीरस वाटू लागते. भावनिक, शारीरिक, मानसिक परावलंबित्व निर्माण होते. निकोटीनची तल्लफ भागवण्यासाठी तंबाखूचा वापर अटळ होतो आणि एकंदर मग व्यक्ती तंबाखूच्या आधीन होते.

कुठल्याही स्वरूपातील तंबाखू सेवनाने शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. असा एकही अवयव नाही, जिथे तंबाखू आपला वाईट ठसा उमटवत नाही. रक्तवाहिन्या आकुंचित होतात व उच्च रक्तदाब पाठी लागतो, कोलेस्टेरॉल वाढते, हार्टअॅटॅकची शक्यता वाढते, हाडे ठिसूळ होतात. सर्व शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. अस्थमा, कायमचा खोकला (smokers cough) होतो. गर्भवती स्त्रियांना धूम्रपान किंवा चघळायच्या तंबाखूचे व्यसन असल्यास बाळात व्यंग निर्माण होते. सिगारेटमुळे मुख्यत: फुफ्फुसाचा कॅन्सर, तर चघळायच्या तंबाखूने तोंडाचा कॅन्सर होतो. अर्थात, धूम्रपान करताना निकोटीनसोबत ४००० रसायने (टार, कार्बन मोनॉक्साईड वगैरे) शरीरात जातात. यातील किमान ६० रसायने ही कॅन्सर निर्माण करणारी असतात. त्यामुळे धूम्रपानामुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रमाण जरी जास्त असले तरी शरीराच्या कोणत्याही अवयवाच्या कॅन्सरची शक्यता २५ पटीने वाढते. पुन्हा धूम्रपानाचा धूर हा नुसता त्या व्यक्तीलाच घातक नाही, तर या धुराच्या वलयातील आसपासच्या प्रियजनांना किंवा सहकाऱ्यांनाही हानिकारक. या धुरातील अनेक घातक रसायने स्मोकरच्या आसपास वावरणाऱ्या व्यक्तींच्या शरीरातही पोहोचतात. जगात तंबाखूमुळे होणाऱ्या ६० लाख मृत्यूंपैकी तब्बल ६ लाख (म्हणजे १०%) मृत्यू हे या ‘पॅसिव्ह स्मोकिंग’चे बळी असतात. सातत्याने स्मोकर्सच्या सहवासात असलेल्यांना हार्ट अॅटॅक किंवा फुफ्फुसाच्या कॅन्सरची शक्यता २५ पटीने वाढते. ज्या स्त्रीचा नवरा कायम धूम्रपान करणारा आहे, अशा स्त्रीला होणाऱ्या बाळामध्ये अनेक व्यंग होऊ शकतात, ती पित्याच्या या घातक सवयीमुळे.

अनेक औषधांबरोबर निकोटीन व सिगारेटमधील इतर रसायनांची आंतरक्रिया (interaction) होते. रक्तदाबावरील काही औषधे, झोपेच्या गोळ्या, काही वेदनाशामके, अस्थमासाठी वापरले जाणारे थिओफायलिन हे औषध, इन्सुलीन, कॅफिन यांचा परिणाम धूम्रपानामुळे कमी होतो व अपेक्षित गुण येत नाही. म्हणजे, तंबाखूमुळे आधीच आरोग्य बिघडते व मग अनेक औषधे लागू पडण्यामध्येही तंबाखूमुळे अडथळा येतो. ज्या स्त्रिया हार्मोनल गर्भनिरोधक वापरतात आणि त्यांना धूम्रपानाची सवय असेल तर त्यांना हृदयविकार होण्याचा धोका अनेक पटीने वाढतो.
हे व्यसन सोडू शकत नाही का? सहजासहजी तंबाखूला सोडचिठ्ठी देणे कठीण असले तरी तंबाखूच्या गुलामगिरीतून सुटका होणे अशक्य मुळीच नाही. मनाचा खंबीर निश्चय मात्र हवा.
शरीराला लागलेली निकोटीनची चटक सोडताना थोडा त्रास होऊ शकतो. अस्वस्थता, डोकेदुखी, निद्रानाश, तत्सम काही त्रास तात्पुरते होऊ शकतात. वैद्यकीय मार्गदर्शनाखाली व्यसनमुक्तीसाठी समुपदेशबरोबरच ‘निकोटीन रिप्लेसमेंट ट्रीटमेंट’(NRT) घेता येते. यात निकोटीनच अगदी थोड्या डोसमध्ये औषध म्हणून दिले जाते. निकोरेट, निकोटक्स, निकोगम असे चघळायचे गम, जेली, पॅचेस यासाठी उपलब्ध आहेत. पण हे सर्व उपाय हे दुय्यम; मुळात अंतर्मनात ठाम निश्चय असणे आवश्यक आहे. स्वनिश्चय, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला, व्यसनमुक्ती केंद्रांचा आधार व्यसनाधीन व्यक्तीला परत सुआरोग्याच्या मार्गावर आणू शकतो आणि हे व्यसन सोडल्यानंतर शरीरावर तंबाखूने केलेले अनेक दुष्परिणाम पूर्णत: किंवा काही प्रमाणात नाहीसे होऊ शकतात. म्हणूनच इट‌्स नेव्हर टू लेट. ‘वर्ल्ड नो टोबॅको डे’ दरवर्षी पाळला जातो, तो याच संदर्भात जगजागृती, प्रबोधन होण्यासाठी. क्षणिक सुखांच्या नादी आपले निरोगी शरीर तंबाखूच्या ताब्यात द्यायचे की तंबाखूला दूर ठेवायचे, हे प्रत्येकाने स्वत:च ठरवायचे आहे. शेवटी, चॉइस इज युवर्स!

symghar@yahoo.com