आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्श निसटतोय

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आजही आठवते, काळ्या पातळ दगडापासून बनवलेली नवी कोरी पाटी. पांढरीशुभ्र लेखणी. बाबांनी, मोठय़ा भावाबहिणींनी हाताचे बोट धरून आकडे गिरवायला शिकवले. हळूहळू पाटी इतकी आवडली आणि एवढी सरावाची झाली की चौथीला गेले तरी सोडावीच वाटत नव्हती. नंतर पेन, पेन्सिल आणि वह्यांचा सराव झाला. सातवीनंतर शाईचा पेन हाती आला. दहावीच्या वर्षी मिळालेला (त्या काळातला) महागडा शाईचा पेन आजही जपून ठेवलाय. पण उपयोग काय? हल्ली जिकडेतिकडे पेनलेस वर्क.
ऑफिसमध्ये कॉम्प्युटर. घरी लॅपटॉप. वह्या, कागद, पेन घराच्या कोणत्या तरी एका कोपर्‍यात पडलेले. आवरताना सहज लक्ष जाते, पण पेन हातात घ्यायला वेळ नसतो. एकदा वेळ काढून हातात कागद-पेन घेतला. खूप वर्षांनी काहीतरी गवसल्याची जाणीव झाली. कागद, पेनाचा हरवलेला स्पर्श पुन्हा एकदा अनुभवला. चटकन काहीतरी लिहावेसे वाटले. आधी र्शी लिहिले. त्यानंतर मनाला वाटेल ते लिहीत राहिले. मन मोकळे करत राहिले. कित्येक दिवसांनी हातात पेन धरल्याने मन भरून आले होते. इतक्यात पुढच्या कामांची आठवण झाली. ऑफिसला जायची वेळ झाली. कागद- पेनचा स्पर्श असाच अनुभवत राहावा असे वाटत होते. पण ते शक्य नव्हते. ठरलेल्या कोपर्‍यात कागद-पेन ठेवला.
प्रत्येकाच्याच घरात कागद-पेन ठेवलेला असा एक कोपरा असेल. कधी-कधी वाटते, आपण मुद्दामहून हा स्पर्श टाळतो. फास्ट टायपिंगसाठी कॉम्प्युटरकडे धाव घेतो अन् जिवंत अक्षरांकडे पाठ फिरवतो. हस्ताक्षर हे एखाद्याचे व्यक्तिमत्त्व ओळखण्याचे महत्त्वाचे माध्यम असते. प्रत्येकाच्या स्वभावाची छाप त्याच्या हस्ताक्षरातून दिसून येते. पण हल्ली अक्षरांचा सरावच नसल्यामुळे त्यातून व्यक्तिमत्त्वाची छबी मिळणे कठीण वाटते. रोजनिशी लिहिण्याची सवयही मागे पडली.
कागद-पेनचे हे भावनिक धागेदोरे उलगडण्याचे कारण म्हणजे डॉकमेल या संकेतस्थळाने नुकतीच केलेली पाहणी. डॉकमेलने केलेल्या पाहणीनुसार येत्या काही वर्षांत हस्ताक्षर कालबाह्य होणार आहे. या मोहिमेत 2000 लोकांना विविध प्रश्न विचारण्यात आले. प्रत्येकी सातपैकी एका व्यक्तीला आपले हस्ताक्षर इतरांना दाखवण्याची लाज वाटते. सहा महिन्यांनंतर योग्य प्रकारे लेखन न करता येण्याचे तीनपैकी एकाने मान्य केले आहे. तसेच लोकांना शॉर्टकटची सवय लागत आहे किंवा कमी वेळात सहजरीत्या लिखाण करणारी यंत्रणा आवडू लागली आहे. जीवन सहज करण्याकरिता खिशाला पेन अडकवण्याऐवजी खिशात पेनड्राइव्ह ठेवण्याची सवय बळावते आहे. नव्या यंत्रणा आत्मसात करण्यास काहीच हरकत नाही. मात्र मोबाइल, कॉम्प्युटर, लॅपटॉपच्या कोरड्या वाटेवर चालताना कधीतरी कागद-पेनाच्या स्पर्शाचा ओलावा अनुभवावा वाटलाच तर घरातील ‘त्या ’ कोपर्‍याकडे चार पावले चालून जा. जिवंत अक्षरांशी तुटलेले नाते पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हालाही खूप दिवसांनी काहीतरी गवसल्याची जाणीव होईल.
manjiri.kalwit@dainikbhaskargroup.com