आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाद वेदनानाशामकांचा!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर आपण अस्वस्थ होतो. अशा वेळी चटकन आपण वेदनाशामक औषधांना शरण जातो व ही औषधेही अगदी झटपट आपल्या वेदना नाहीशा करून आपल्याला दिलासा देतात.

मात्र इथे एक बाब जरूर लक्षात घेतली पाहिजे की, ही औषधे जरी वेदना शमन करत असतील तरी वेदनेच्या मूळ कारणावर इलाज होतोच असे नाही.

डोकेदुखी,पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, दाढदुखी अशा अनेक ‘दुखीं’वर आपल्यापैकी अनेकांची एक प्रतिक्षिप्त क्रिया असते, ती म्हणजे अर्थातच एक पेनकिलर म्हणजे वेदनाशामक गोळी घेऊन टाकणे. आज आपण चर्चा करतोय, याच आपल्या अतिपरिचित औषधगटाची.
मेंदूवर काम करून वेदनाशमन करणाऱ्या कोडीन, मॉर्फीन अशा औषधांचा एक गट; तर पॅरासिटॅमॉल, अॅस्पिरीन, आयबुप्रोफेन, डायक्लोफेनॅक, अॅसिक्लोफेनॅक इत्यादी वेदनाशामकांचा दुसरा गट. आपण चर्चा करतोय, या दुसऱ्या गटाची. पॅरासिटॅमॉल हे ताप व वेदना यासाठी उपयोगी, तर इतर वेदनाशामके वेदनेसोबतच दुखापत, सूज यासाठीही गुणकारी, म्हणून त्यांना ‘नॉन स्टिरॉइडल अँटी-इन्फ्लेमेटरी’ (Non-steroidal anti-inflammatory) असेही नाव आहे. टॅबलेट‌्स, कॅप्सूल व द्रव प्रकारात ही औषधे उपलब्ध आहेतच; पण क्रिम, जेल हे बाह्योपचारासाठीचे औषध प्रकारही या औषधांचे उपलब्ध आहेत. स्वमनाने घेऊ शकतो म्हणजे ‘ओटीसी’ (नॉन प्रिस्क्रिप्शन गट) गटात पॅरासिटॅमॉल, अॅस्पिरिन; व इतर सर्व वेदनाशामके ही श्येड्युल एच म्हणजे डॉक्टरांनी लिहून दिल्यावरच प्रिस्क्रिप्शनवर घेण्याची औषधे आहेत.
शरीराच्या कोणत्याही भागात दुखत असेल तर आपण अस्वस्थ होतो. वेदना जर तीव्र असतील तर आपल्याला काहीच सुचत नाही. कामात लक्ष लागत नाही. अशा वेळी चटकन आपण वेदनाशामक औषधांना शरण जातो व ही औषधेही अगदी झटपट आपल्या वेदना नाहीशा करून आपल्याला दिलासा देतात. मात्र इथे एक बाब जरूर लक्षात घेतली पाहिजे की, ही औषधे जरी वेदना शमन करत असतील तरी वेदनेच्या मूळ कारणावर इलाज होतोच, असे नाही. शरीरातील अंतर्गत बिघाडाचे लक्षण म्हणजे अनेकदा वेदना असतात. म्हणजेच वेदनाशामके हा बरेचदा तात्पुरती मलमपट्टी, वरवरचा उपाय होत असतो. म्हणून जर वारंवार अशा गोळ्या घेण्याची वेळ येत असेल, तर स्वमनाने ते न करता वैद्यकीय सल्ला घेऊन वेदनेचे मूळ शोधणे आवश्यक असते. आणि डॉक्टरी सल्ल्यानेच जर ही औषधे दीर्घकाळ घ्यायची असतील तर ठीक; पण आपल्याकडे मात्र नेमकी उलटी परिस्थिती आहे. वेदनाशामकांचे ‘सेल्फ मेडिकेशन’ प्रचंड आहे. त्याबाबत ‘कॅज्युअल’ दृष्टिकोन आहे. आणि असे झटपट उपाय करताना काही अपायांची पेरणी तर आपण करत नाही ना, हा विचारही बहुतेकांच्या मनाला शिवत नाही.

खरे तर वेदना का होतात व त्या होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाय गरजेचे आहेत. आजकाल Aches and Pains जे वाढले आहेत, त्याचे मूळ आपल्या चुकीच्या जीवनशैलीत आहे. ताणतणाव, चुकीचा आहार, धावपळ, बसण्याच्या चुकीच्या पद्धती, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांनी आपले जग वेदनामय होत असते. या औषधांचे अनेक दुष्परिणाम आहेत. काही लगेच होणारे, काही दीर्घ काळ सेवनाने होणारे, काही किरकोळ, तर काही गंभीर. पॅरासिटॅमॉल सोडले तर इतर बहुतांशी वेदनाशामके पोटात जळजळ निर्माण करतात. त्याने मळमळते, अपचन होऊ शकते. जठर व आतड्यातील अंत:त्वचेला इजा होते. रिकाम्या पोटी ही औषधे घेतली तर हा त्रास अधिकच होतो. म्हणून काहीतरी खाऊन व भरपूर पाण्याबरोबर ही औषधे घ्यायची. वारंवार व दीर्घकाळ वापराने पोटात अल्सर, रक्तस्रावही होऊ शकतो. या औषधांमुळे रक्तदाब वाढू शकतो. ज्यांना दम्याचा त्रास आहे, त्यांना या औषधांमुळे दमा बळावण्याची शक्यता असते. गर्भारपणी ही सर्व औषधे सुरक्षित आहेतच असे नाही.

अॅस्पिरीनमुळे रक्त पातळ होते व रक्तस्रावाचा धोका वाढतो. म्हणून छोटी-मोठी शस्त्रक्रिया अगदी दात काढण्याची प्रक्रिया जरी असेल तरी तात्पुरती अॅस्पिरिन बंद करायची असते. अर्थातच डॉक्टरांना विचारूनच. लहान मूल तापाने फणफणले असेल तर अॅस्पिरिन न देता पॅरासिटॅमॉल वा इतर औषध द्यायचे. याचे कारण म्हणजे, जर तो ताप विषाणूजन्य (व्हायरल) असेल तर अॅस्पिरिनमुळे ‘रिईज (Reye’s) सिंड्रोम (syndrome)’ हा घातक दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. पॅरासिटॅमॉल हे तसे तुलनेने ‘गुणी’ सुरक्षित औषध. पण तेही जास्त प्रमाणात घेतले तर यकृतावर गंभीर दुष्परिणाम होतो, अशी warning स्पष्टपणे या औषधाच्या लेबलवरही नमूद केलेली असते. दारूचे व्यसन असणाऱ्यांनी वारंवार पॅरासिटॅमॉल घेत राहिल्यास दोन्हींच्या एकत्रित (दारू अन् पॅरासिटॅमॉल) परिणामाने यकृतावरील दुष्परिणामांचा धोका अधिकच वाढतो. थोडक्यात काय, अॅस्पिरिन वा पॅरासिटॅमॉलसारखी ओटीसी गटातील औषधे स्वमनाने घेता येऊ शकणारी वेदनाशामके असोत, वा इतर प्रिस्क्रिप्शन वेदनाशामके असोत, औषधभान प्रत्येकाच्या बाबतीत हवेच.

बहुतांशी वेदनाशामकांचा मूत्रपिंडांवरही परिणाम होतो व त्यांचे कार्य मंदावते. तरुण वयातच किडनी फेल होणाचे जे प्रमाण वाढले आहे, त्याचे एक कारण वेदनाशामकांचा अतिवापर असू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे. अशा साइड इफेक्ट‌्सचा धोका टाळण्यासाठी वेदनाशामके पोटात घेण्यापेक्षा जेव्हा शक्य असेल तेव्हा वेदनाशामकांनी बाह्योपचार केल्यास हा उपाय प्रभावी व तितकाच गुणकारी आहे. दुष्परिणामांची शक्यता यात जवळजवळ नसतेच, असेही अगदी नुकतेच प्रसिद्ध झालेले संशोधन सांगते. याचा अर्थ जेव्हा शक्य तेव्हा दुखऱ्या, सूज अालेल्या भागावर आपण वेदनाशामक क्रिम, जेल लावून गोळ्यांचा वापर टाळता/ कमी करता येतो का हे बघावे, असे हे संशोधन सुचवते.
थोडक्यात महत्त्वाचे
> स्वमनाने वेदनाशामकांचा मारा स्वत:वर करू नये. डॉक्टरी सल्ला घ्यावा.
> बहुतांशी वेदनाशामके भरल्यापोटी, भरपूर पाण्यासोबत घ्यायची... या बाबतीत डॉक्टर, फार्मासिस्टचा सल्ला जरूर घ्यावा.
> वेदनाशामकांचे ब्रँड‌्स बाजारात विपुल आहेत. कधीकधी दोन ब्रँड्स वेगवेगळ्या कारणांनी घेताना त्यात एकच औषध नाही ना, हे पाहणे जरुरीचे. अन्यथा एकाच औषधाचा डबल डोस पोटात जाईल. म्हणून औषधाचे लेबल वाचणेही महत्त्वाचे.
> दमा, उच्च रक्तदाब, मधुमेह, अल्सर, मूत्रपिंड, यकृताचे विकार असणाऱ्यांनी वेदनाशामके वापरताना अधिकच सावध असणे गरजेचे. दीर्घकाळ स्वमनाने वेदनाशामके घेतल्यास अल्सर, किडनी निकामी होणे, हृदयरोगाचा धोका वाढतो.
> बाह्योपचार करण्यावरही भर द्यावा.
> वेदनेचे मूळ कारण शोधून त्यावर उपाय करावा.
(symghar@yahoo.com)