आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मन की बात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मानसिक अनारोग्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे. तो अधिक सकारात्मक व्हायला हवा. शारीरिक आजाराप्रमाणेच तो एक ‘आजार’ म्हणून स्वीकारायला हवा. ‘वेडा', "वेड्यांचे हॉस्पिटल’ असे शब्दप्रयोग आपण जाणीवपूर्वक टाळायला हवे...

‘आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिकदृष्ट्या सुस्थितीत व तंदुरुस्त असणे’ अशी आरोग्याची व्याख्या जागतिक आरोग्य संघटनेने अनेक दशकांपूर्वी केली. आता २१ व्या शतकात त्यातील मानसिक तंदुरुस्तीच्या मुद्द्याचे महत्त्व आपल्या लक्षात येतंय. अर्थातच, याला कारण वेगाने वाढत जाणारे मानसिक आजारांचे प्रमाण. आधुनिक जगात विविध शारीरिक व्याधींसोबत मानसिक अनारोग्य हा एक ज्वलंत प्रश्न ठरला आहे. मनाची दुभंगावस्था(स्किझोफ्रेनिया), नैराश्य(डिप्रेशन), चिंता (अग्झायटी डिसऑर्डर) व तत्सम मनोविकारांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. गेल्या पाच-दहा वर्षांत प्रदर्शित झालेल्या अनेक चित्रपटांमध्येसुद्धा या आजारांचे प्रतिबिंब दिसते. आबालवृद्धांत हे मनोविकार दिसतात. जागतिक आरोग्य संघटनेनुसार २०२०मध्ये ‘डिप्रेशन’ हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा आजार ठरणार आहे.

मानसिक आजारात मेंदूतील काही रसायनांचे संतुलन बिघडते. डोपामाईन नावाच्या रसायनाचे प्रमाण स्किझोफ्रेनियात वाढलेले दिसते, तर सिरोटोनिन व नॉरअॅड्रिनालीन ही रसायने डिप्रेशनमध्ये कमी होतात. जरा अधिक सोपे करून ‘मुन्नाभाई एमबीबीएस’च्या फिल्मी भाषेत सांगायचे, तर मेंदूत ‘केमिकल लोचा’ होतो. एक्सरे, सीटी स्कॅन, सोनोग्राफी, रक्ततपासणी अशा सरळसरळ रोगनिदान चाचण्या या आजारांचे निदान करण्यासाठी नाहीत. तज्ज्ञ डॉक्टर लक्षणांवरून, रुग्णाशी व नातेवाइकांशी बोलून, व मानसिक स्थितीची चाचपणी करणाऱ्या काही चाचण्या करून आजार ओळखतात. आनुवंशिकता, ताणतणाव, सभोवतालची परिस्थिती, व्यसने, मानसिक आघात अशी काही कारणे या आजारांमागे असू शकतात किंवा कधी कोणतेच ठोस कारण आढळत नाही.

स्किझोफ्रेनिया (स्प्लिट माइंड) हा विचार व भावनांचा विकार. यात रुग्णाची वास्तवापासून फारकत होते. वैचारिक गोंधळ, भ्रम, भास होत राहतात. रुग्ण स्वत:च्याच विश्वात राहतो. चुकीच्या कल्पनांवर ठाम असतो. कधी फार संशयखोर, आक्रमक होतो. काही रुग्ण एकदम अलिप्त (विथ‌्ड्रॉ) होतात. दैनंदिन व्यवहार, अन्न, अगदी आवडीच्या गोष्टींमधलाही रस कमी होतो. कोणीतरी सतत आपल्यावर नजर ठेवून आहेत, वाईटावर आहेत, अशी भीती रुग्णाला वाटते. पण यातली सर्व लक्षणे प्रत्येक रुग्णात दिसतीलच, असे नाही. व्यक्तीगणिक ती थोडी बदलतातही. या आजाराचे अनेक उपप्रकार आहेत. भारतात साधारण एक कोटी लोकांना स्किझोफ्रेनिया आहे. त्यात तरुण रुग्णांचे प्रमाण लक्षणीय आहे.

डिप्रेशन वा नैराश्य हा आजार तसा सर्वसाधारण. सतत दु:खी, निराश वाटणे, चिडचिड होणे, सर्व निरर्थक आहे, आपण निरुपयोगी आहोत, अशी नकारात्मक भावना, आत्महत्येचे विचार, अजिबात एकचित्त न होणे, निद्रानाश किंवा झोप येणे अशी लक्षणे या आजारात दिसतात. बायपोलार नैराश्य प्रकारात, रुग्ण कधी खूप आनंदी, उत्साही असतो; तर कधी एकदम दु:खी होतो. साधारण ६० टक्के रुग्णांना आपल्याला डिप्रेशन हा आजार आहे, हे लक्षातच येत नाही. काहींना मध्यम स्वरूपाचे, तर काहींना तीव्र स्वरूपाचे, नैराश्य सतावते. काही वेळा शारीरिक व्याधींनी बेजार झाल्यानेही डिप्रेशनचा त्रास होतो. स्त्रियांमध्ये हार्मोनल बदलामुळेही काही वेळा तात्पुरते डिप्रेशन येते. चिंता(अॅग्झायटी) या मनोविकारामध्ये व्यक्ती सतत चिंतेने ग्रासलेली असते, अगदी किरकोळ गोष्टींचीदेखील अति चिंता करते. चिडचिडी होते. नैराश्य, चिंता अशा आजारांमध्ये डोकेदुखी, पोट बिघडणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

अर्थातच, या सर्वच आजारांसाठी औषधे आहेत, व ती आजार आटोक्यात ठेवतात, किंवा बराही करतात. अँटी सायकॉटिक ही औषधे म्हणजे उदा. क्लोरप्रोमाझिन, हॅलोपेरिडॉल, ओलान्झेपिन, रिसपेरिडोन इ. ही औषधे स्किझोफ्रेनियासाठी वापरतात. इमिप्रामिन, सिटालोप्राम, फ्लुओक्झेटिन इत्यादी औषधे नैराश्यासाठी, तर अस्प्राझोलामसारखी औषधे चिंता निराकरणासाठी वापरतात. बऱ्याचशा रुग्णांमध्ये दोन-तीन मनोविकारांची लक्षणे एकत्र दिसतात. तीन-चार औषधे एकत्रितपणे द्यावी लागतात. या सर्वच औषधांचा सुपरिणाम दिसायला, दोन-तीन आठवड्यांचा कालावधी जावा लागतो. त्यामुळे औषधोपचार चालू केल्यावर औषध नियमितपणे घेत राहून रुग्ण व कुटुंबीयांनी संयम ठेवणे महत्त्वाचे. झोप येणे, गुंगी, वजन वाढणे असे काही साइड इफेक्ट‌्स या औषधांचे असतात. उपचारांच्या सुरुवातीला झोप येणे वगैरे दुष्परिणाम अधिक जाणवतात. कालांतराने हा त्रास कमी होतो. साईड इफेक्टची अवास्तव भीती बाळगून अनेक रुग्ण किंवा त्यांचे नातेवाईक औषधे मध्येच बंद करतात. मग आजार अधिक तीव्र होऊ शकतो. ही सर्व औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शननेच घ्यायची आहेत, स्वमनाने अजिबात नव्हे. मानसिक आजारात चढ-उतार पुष्कळ असतात. रुग्णाच्या प्रतिसादानुसार डोसमध्ये, औषधात बदल करावा लागतो. अनेक वर्षे किंवा कायमही औषधे घ्यावी लागतात. अशा वेळी डॉक्टरांकडे वेळोवेळी फेरतपासणीस जाणे महत्त्वाचे असते. जुने प्रिस्क्रिप्शन वापरून पुन:पुन्हा औषधे मागायला जाणे चुकीचे आहे. काही केसेसमध्ये अशा प्रकारच्या ‘सेल्फ मेडिकेशन’ने रुग्ण स्वत:च्या जिवास धोकाही निर्माण करतात. फार्मासिस्टनी या बाबतीत शक्य तेवढे समुपदेशन केल्यास, ते निश्चित रुग्णहिताचे होईल. काही रुग्ण मात्र फार आक्रमक होतात, औषध देच म्हणून हमरीतुमरीवर येतात, तेथे रुग्णाच्या कुटुंबीयाची भूमिकाही महत्त्वाची ठरते.
मानसिक आजारांच्या बाबतीत औषधोपचार सुरू व्हायला उशीर होतो, कारण अर्थातच रुग्ण तज्ज्ञ डॉक्टरांपर्यंत पोहोचायलाच उशीर होतो. अनेकदा लक्षणे लक्षात येत नाहीत, नंतर नातेवाइकांच्या लक्षात आले तरी बऱ्याचदा रुग्ण मनोविकारतज्ज्ञाकडे येण्यास तयार नसतो. तेथे जाणे म्हणजे मला वेडा ठरवणे, अशी मनोधारणा असते. अनेकदा रुग्ण व नातेवाईक तांत्रिक, मांत्रिक, भोंदू बाबा अशा उपचारात वेळ दवडतात. हे सर्व बदलायला हवे. मानसिक आजारांत कुटुंबीय, मित्र परिवार यांचा आधार फार फार महत्त्वाचा असतो. मनोरुग्णास सांभाळणे हे बरेचदा आव्हानात्मक असते. आजार वेळीच ओळखला तर उपाय लवकर चालू होऊन, तो लवकर पूर्ण बरा होण्याची, पूर्ण नियंत्रणात राहण्याची शक्यता वाढते.

औषधोपचारांबरोबर समुपदेशनाचेही महत्त्व आहे. समुपदेशकांची मदत वैद्यकीय सल्ल्यानुसार घेणे उपयुक्त आहे. संतुलित आहार, व्यायाम, कामात व आवडीच्या गोष्टींत मन सतत गुंतवून ठेवणे, मित्र-नातेवाइकांसोबत वेळ व्यतीत करणे, अशी काळजी घेतल्यास डिप्रेशन, चिंता या विकारांपासून दूर राहण्यास काही प्रमाणात मदत होते.

(symghar@yahoo.com)