आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशासाठी? हृदयासाठी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतातील क्रमांक एकचे मृत्यूचे कारण म्हणजे हार्ट अॅटॅक. धूम्रपान, उच्च रक्तदाब व कोलेस्टेरॉलजन्य आजार ही यामागील काही प्रमुख कारणे. बदलत्या जीवनशैलीने जसे मधुमेह, उच्च रक्तदाबाच्या देणग्या दिल्या, तशीच अजून एक देणगी म्हणजे उच्च कोलेस्टेरॉल. कोलेस्टेरॉल हा शरीरातील एक फॅटी (स्निग्ध) घटक. तसा तो मुळात व्हिलन अजिबात नव्हे. खरं तर आपल्यासाठी तो अत्यावश्यकच घटक. अनेक हॉर्मोन्स, व्हिटॅमिन डी, पित्तरस निर्मितीसाठी लागणारा एक महत्त्वपूर्ण कच्चा माल म्हणजे, कोलेस्टेरॉल. आपल्या प्रत्येक पेशीच्या आवरणातही त्याचे अस्तित्व आवश्यक. रक्तात प्रथिने कोलेस्टेरॉलचे वाहक असतात (लिपोप्रोटिन्स). काही लिपोप्रोटिन्स LDL म्हणजे ‘लो डेन्सिटी लिपोप्रोटिन्स’ तर HDL म्हणजे ‘हाय डेन्सिटी लिपोप्रोटिन्स’. ‘एलडीएल’चे शरीरातील प्रमाण वाढले व ‘एचडीएल’चे कमी झाले, की ‘एलडीएल’चे खलनायकी वर्तन चालू होते. म्हणून ‘एलडीएल’ला वाईट कोलेस्टेरॉल म्हणतात. हे वाढलेले ‘एलडीएल’ रक्तवाहिन्यांच्या भिंतीवर आतील बाजूस चिकटू लागते व त्याचे थरावर थर जमा होऊन रक्तवाहिनी आकुंचित होते व रक्तप्रवाहात ‘ब्लॉक’ (अडथळे) निर्माण होतात. अशी रक्तवाहिनी काहीशी ताठर होते, तिची नैसर्गिक लवचिकता कमी होते. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी(Coronaty) वाहिनीत असे हे ब्लॉकेज विशेषत: निर्माण होतात. पण मेंदूकडे किंवा पायाकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांना ‘एलडीएल’ हे कारस्थान करू शकते. ज्या रक्तवाहिनीत ब्लॉक आहे, त्या अवयवाला साहजिकच पुरेसे रक्त, ऑक्सिजन मिळत नाही. त्यामुळे हृदयविकार (व न उपचार केल्यास कालांतराने हार्ट अॅटॅक), स्ट्रोक (मेंदूकडे रक्तपुरवठा कमी) किंवा पायातील वाहिन्यांचे आजार चालू होतात. ‘एलडीएल’च्या मानाने एचडीएल हे फार गुणी कोलेस्टेरॉल. ते झाडूसारखे सफाईचे काम करते. म्हणजे सगळीकडून ‘एलडीएल’ गोळा करणे व त्याला यकृतात आणून त्याचे विघटन करणे. थोडक्यात, ‘एलडीएल’चे रक्तातील प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी एचडीएलची महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यामुळे त्याला ‘चांगले कोलेस्टेरॉल’ म्हणतात. ट्रायग्लिसराईड हा शरीरातील अजून एक महत्त्वाचा स्निग्ध घटक. अन्नातून निर्माण झालेली ऊर्जा पेशीपर्यंत पोहोचवण्याचे काम ट्रायग्लिसराईडचे. पण याचेही रक्तातील प्रमाण वाढले की, त्याचे वर्तन सैरभैर होते. हृदयविकार, स्ट्रोक, यकृताच्या कामात अडथळा असा त्रास वाढत्या ट्रायग्लिसराईडमुळे होऊ शकतो.
कोलेस्टेरॉलची निर्मिती यकृतात होत असते व आहारातूनही ते शरीरात जाते. प्राणीजन्य (नॉनव्हेज) पदार्थांत कोलेस्टेरॉल असते. शाकाहारी आहारात ते प्रत्यक्ष स्वरूपात नसते. पण झीरो-कोलेस्टेरॉल म्हणजे ‘फॅट फ्री’ नव्हे. आपण खातो त्या फॅटी पदार्थांत मांसाहार असो वा शाकाहार; (Saturated, Unsaturated) ट्रान्स फॅट किती, हे पाहणे महत्त्वाचे असते. तेल, बटर, मेयोनिज, मिठाया, तळलेले पदार्थ, विविध पक्वान्ने, फास्ट फूड, खोबरे, केक्स, बिस्किटे वगैरे पदार्थांतून जे फॅट, साखर शरीरात जाते, त्याचे रूपांतर वाईट कोलेस्टेरॉलमध्ये होऊ शकते. चुकीचा आहार व जोडीला सुस्त जीवनशैली म्हणजे, वाईट कोलेस्टेरॉलसाठी अगदी पोषक वातावरण. त्याचबरोबर लठ्ठपणा, वाढते वय, धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, थायरॉईडची कमतरता, काही वेळा आनुवांशिकता व मानसिक तणावही कोलेस्टेरॉलसाठी कारणीभूत ठरतात. रक्तचाचणी करून कोलेस्टेरॉलचे आकडे जाणून घेता येतात. एकूण कोलेस्टेरॉल २०० मिलिग्रॅमपर्यंत नॉर्मल, पण त्यातही ‘एलडीएल’ १३०च्या वर नसावे व ‘एचडीएल’ ४५ पेक्षा जास्त असावे. ट्रायग्लिसराईड १५० मिलिग्रॅमपर्यंत नॉर्मल समजले जाते. वाढलेले कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड या आजाराला डिसलिपिडेमिया (Dyslipidemia) म्हणतात. याची काही फार ठळक लक्षणे दिसतीलच असे नाही. म्हणूनच वार्षिक वैद्यकीय तपासणी करून त्यात ‘लिपिड प्रोफाईल टेस्ट’(व अर्थात सोबत रक्तशर्कराही) करणे महत्त्वाचे. ज्यांच्या घरात हृदयविकार, मधुमेहाचा इतिहास आहे, त्यांनी तर या बाबतीत अधिक तत्पर असलेच पाहिजे. आहार नियंत्रण, व्यायाम व औषधोपचारांनी कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवता येते.
स्टॅटीन्स (Statins) हा एक मुख्य औषध गट. उदा. अटोरव्हास्टॅटिन, रोझुव्हास्टॅटिन, सिमव्हास्टॅटिन वगैरे… ‘एलडीएल’ची निर्मिती या औषधांनी कमी होते. सहसा दिवसातून एकदा व तेही रात्री ही औषधे (कोलेस्टेरॉलची निर्मिती रात्री जास्त होते) घेण्यासाठी डॉक्टर सांगतात. या औषधांचे साइड इफेक्ट‌्स फारसे नाहीत, पण उपचार चालू असताना स्नायूंत वेदना, पायदुखी, अंगदुखी, पायात गोळे येणे अशी काही लक्षणे दिसली तर त्वरित डॉक्टरांना सांगावे. फायब्रेट्स हा औषधांचा दुसरा गट. उदा. फेनोफायब्रेट, जेमफिब्रोसिल. ट्रायग्लिसराईडची निर्मिती ही औषधे मुख्यत: कमी करतात. ही औषधे जेवणासोबत घेण्यास सांगितले जाते. इझेटीमाईब(Ezetimib) हे औषध खाल्लेल्या अन्नातील कोलेस्टेरॉलचे शोषण कमी करते.
अर्थातच, नियमित औषधोपचारांइतकाच व्यायाम व योग्य आहार महत्त्वाचा आहे. औषधे घेत राहिले पण आहारविहारावर नियंत्रण नसले तर औषधांचाही फारसा परिणाम होणार नाही. दररोज चालणे, पोहणे किंवा तत्सम व्यायाम केल्याने एचडीएल वाढते व ‘एलडीएल’ कमी होते. अक्रोड, बदाम, अळशी (जवस, Flax seeds), ऑलिव्ह, आमेगा-३-फॅटी अॅसिड्स, काही प्रकारचे मासे यांचे योग्य प्रमाणात सेवन, तसेच तंतुमय पदार्थ (फायबर्स), फळे, भाज्या या सर्वांमुळे एचडीएल वाढते. चांगले खाल्ले की चांगले कोलेस्टेरॉल वाढते, वाईट खाल्ले की वाईट कोलेस्टेरॉल वाढते, हे समीकरण लक्षात ठेवायला हरकत नाही.
चाइल्ड ओबेसिटीचे (मुलांमधील लठ्ठपणा) प्रमाण वाढत आहे. अलीकडे झालेल्या दिल्लीमधील २५०० मुलांच्या सर्व्हेमध्ये तब्बल २३% मुलांमध्ये ‘एलडीएल’चे प्रमाण जास्त व ‘एचडीएल’चे प्रमाण कमी होते. खाण्यापिण्याच्या सवयी सुधारणे, आवश्यक तेथे डॉक्टर, आहारतज्ज्ञ यांचा सल्ला घेणे, न कंटाळता आवडेल त्या प्रकारचा व्यायाम नियमित करणे आणि अर्थातच धूम्रपानासारख्या व्यसनांपासून दूर राहणे यातच आपले सर्वांचे भले आहे.
symghar@yahoo.com