आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधोपचारांची घातक मनमानी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या देशात सध्या तरी औषधांची वर्गवारी ही ‘प्रिस्क्रिप्शन’ औषधे व ‘नॉन-प्रिस्क्रिप्शन’ औषधे अशी आहे. तब्येतीच्या बारीकसारीक तक्रारींसाठी दवाखाना गाठणे शक्य होतेच असे नाही व ते वेळखाऊ, खर्चिकही असू शकते, म्हणूनच काही थोडी औषधे ही आपण स्वमनाने किंवा औषध दुकानातील फार्मसिस्टच्या सल्ल्याने घेऊ शकतो. यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. ताप, डोकेदुखी, अ‍ॅसिडिटी, बद्धकोष्ठ, त्वचाविकार अशा काही तक्रारींसाठीचीच काही औषधे जी तुलनेने अधिक सुरक्षित, कमी दुष्परिणाम असणारी आहेत, अशी औषधे या ‘नॉन-प्रिस्क्रिप्शन’ गटात मोडतात. यांनाच ओव्हर द काउंटर(ओटीसी) असेही सर्वसाधारणपणे म्हटले जाते. पॅरासिटॅमॉल, अ‍ॅस्पिरिन, काही अँटासिड (अ‍ॅसिडिटी कमी करणारी औषधे), रेचके, टॉनिक्स, मलमे, बाम, लोशन्स या गटात मोडतात.

बाकी दुसरा फार मोठा गट म्हणजे प्रिस्क्रिप्शन औषधांचा. सर्व अँटिबायॉटिक्स, स्टिरॉइड, हृदरोग, अस्थमा, थायरॉइड, मानसिक आजार, कॅन्सरवरील औषधे, अनेक वेदनाशामके, काही गुणकारी पण नशा आणू शकणारी औषधे इ. याच गटात मोडतात. म्हणजे, अगदी थोडीच औषधे ही ‘ओटीसी’ आहेत, आपण स्वमनाने घेऊ शकतो व त्यासाठी प्रिस्क्रिप्शनची गरज नाही. आता प्रश्न असा पडेल की, औषधांमध्ये हा जातिभेद, ही वर्गवारी का? कधी प्रिस्क्रिप्शन हवे, कधी नको. यासाठी हे समजून घेणे आवश्यक आहे की, प्रिस्क्रिप्शनने घ्यायची सर्व औषधे ही तुलनेने अधिक प्रभावी, अधिक दुष्परिणामही करू शकणारी आहेत. गंभीर आजारांवरील ते उपाय आहेत. ही औषधे डॉक्टरांनी रोगनिदान करून मगच रुग्णाला ती चिठ्ठीत (प्रिस्क्रिप्शनमध्ये) लिहून द्यावीत, जेणेकरून योग्य रुग्णाला, योग्य औषध, योग्य मात्रेत व योग्य कालावधीसाठी लिहिले आणि दिले जाईल.

औषधांचे अपेक्षित परिणाम व्हावेत, दुष्परिणाम होऊन रुग्णास त्रास होऊ नये, यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच, प्रिस्क्रिप्शननेच ही औषधे घ्यायची. ती फार्मसिस्टने प्रिस्क्रिप्शन असल्यासच विकायची, असा नियम आहे. ही सर्व औषधे कायद्यानुसार शेड्युल एक्स, एच वन अशा गटात मोडतात. हे प्रिस्क्रिप्शन औषध आहे, हे कसे ओळखायचे? तर औषध लेबलवरील डावीकडे तांबडी रेघ, Rx/NRx अशी खूण, एका बॉक्समध्ये ‘Schedule H/H1/X : केवळ रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिशनरच्या प्रिस्क्रिप्शननेच विकण्याचे औषध’ अशी सूचना म्हणजे, ते औषध प्रिस्क्रिप्शन गटात मोडते.
कोणे एके काळी डॉक्टरांनी थोड्या अवधीसाठी दिलेल्या औषधांनी गुण आला म्हणून वर्षानुवर्षं तीच औषधे, फेरतपासणीस न जाताच घेत राहणारे रुग्ण अनेकदा भेटतात. यथावकाश गंभीर दुष्परिणाम होतात, पण ते या औषधांमुळे असू शकतील, याची जाणीव बहुतेक वेळा रुग्णांना नसते. पूर्वी लागू पडलेले अँटिबायॉटिक प्रत्येक किरकोळ आजारासाठी वापरले जाते, वेदनाशामके वारंवार घेतली जातात.

आयनुप्रोफेन, डायक्लोफेनॅक अशी वेदनाशामके अगदी गुणकारी, पण स्वमनाने अतिवापर मूत्रपिंड निकामी करण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात. अँटिबायॉटिक्सचा स्वमनाने वापर करून आपण रोगजंतूंना बंडखोर होण्यास मदत करून स्वत:च्याच पायावर धोंडा पाडून घेत असतो. शिवाय ‘बॉडी बिल्डिंग’साठी स्टिरॉइड्स घेतल्याने तरुण वयातच उच्च रक्तदाब, हाडे पोकळ होणे असे प्रकार होतात. सिल्डेनाफिलसारखी (उदा. व्हायग्रा) औषधे, कोडिनयुक्त कफ सिरप्स घेणारा वर्गही खूप मोठा आहे. सिल्डेनाफिलमुळे रक्तदाब खूप कमी होऊन मृत्यू झाल्याच्या घटनाही ऐकण्यात येतात. झोपेच्या गोळ्या, कफ सिरप याची सवय, नशा यास कित्येक जण बळी पडत असतात. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

अशा वेळी कायद्याची अंमलबजावणी कडक होणे, फार्मसिस्टने नियम व त्याची जबाबदारी ओळखून प्रिस्क्रिप्शन औषधे प्रिस्क्रिप्शनशिवाय न विकणे, हे महत्त्वाचे आहेच; पण त्याबरोबरच ग्राहकांनी जबाबदार होऊन अशा औषधांची ‘मागणी’च थांबवणे आवश्यक आहे. ‘मागितले’ म्हणून ‘दिले’ जाते, ‘दिले जातेय’ म्हणून ‘मागितले’ जाते, हे दुष्टचक्र कुठेतरी थांबणे आवश्यक आहे. आज अनेक फार्मसिस्ट अँटिबायॉटिक्स, झोपेच्या गोळ्या, स्टिरॉईड डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विकण्यास नकार देतात, तेव्हा ग्राहक अक्षरश: हमरीतुमरीवरही येतात. ‘हे काय नवीनच, आतापर्यंत प्रिस्क्रिप्शन मागत नव्हतात, आता का?’ असा त्यांचा सूर असतो. ‘मी दाम मोजतोय ना, मग हवे ते दे’ अशी दमदाटीही काही जण करतात. हे थांबले पाहिजे. फार्मसिस्ट उपस्थित असलेल्या दुकानातूनच औषधे विकत घेणे महत्त्वाचे. कधीकधी केवळ प्रिस्क्रिप्शन बंधनकारक आहे, म्हणून मग डॉक्टरांना आपल्याला हवे तसे प्रिस्किप्शन लिहून द्या अशी गळ घालणे, आपल्या राज्यात नियमांची अंमलबजावणी थोडी कडक झाल्यावर शेजारील राज्यातून झोपेच्या गोळ्यांसारखी औषधे शेकड्याने विना प्रिस्क्रिप्शन घेऊन येणे, असे उद्योगही काही ग्राहक करत असतात. मुळात औषधे व औषधविषयक नियम हे आपल्या सुआरोग्यासाठीच आहेत, औषधांचा बेजबाबदार वापर घातक ठरू शकतो, हे मनावर बिंबवणे आवश्यक ठरते.
symghar@yahoo.com