आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकच प्याला, औषध आणि आपण !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोळी चालू केल्यापासून तसा काहीच त्रास नव्हता. पण अलीकडे कधी कधी मात्र संध्याकाळी आणि रात्री डोके भणभणते, जड होते, खूपच अस्वस्थ वाटते. गोळी बदलायला हवी असेल तर बघा ना प्लीज ?... ब्लड प्रेशरचा रुग्ण डॉक्टरांना सांगत होता. त्यावर डॉक्टरांनी त्याला तपासले व काही प्रश्न विचारले. त्यातला एक होता, ‘खाण्यापिण्यात काही बदल?’ आणि या प्रश्नाच्या उत्तरापाशी तो घुटमळला. ‘हो, गेली बरीच वर्षे मी ड्रिंक्स बंद केली होती. अलीकडे मात्र तसं वारंवार घेतोय.’ रुग्णाने कबुली दिली आणि नेमकं काय होत असेल, याची डॉक्टरांना कल्पना आली...

केमिस्टच्या दुकानात नेहमी औषधे घ्यायला येणारा कस्टमर पोट बिघडले म्हणून औषध घ्यायला आला होता. डॉक्टरांनी लिहून दिल्याप्रमाणे फार्मासिस्टने त्याला मेट्रोनिडाझोलच्या गोळ्या दिल्या. ‘पण हो, तुझी नेहमीची सवय आहे ना ती संध्याकाळची... ती जरा थांबव. निदान या गोळ्यांचा कोर्स संपेस्तोवर तरी. नाही तर खूप त्रास होऊ शकतो बरं.’ फार्मासिस्टने ताकीदवजा समजावणी केली...

आपण चर्चा करतोय, औषधांच्या परिणामांची. तीही दारूच्या संदर्भात. मद्यसेवन करणार्‍या रुग्णांमध्ये काही औषधांचे सुपरिणाम, दुष्परिणाम, औषधोपचारांना त्यांचा असणारा एकंदर रिस्पॉन्स हा इतर रुग्णांपेक्षा (मद्य न घेणार्‍या) वेगळा व कमी-अधिक असू शकतो. औषधांचा प्रकार, मद्यसेवनाचे प्रमाण, वय, यकृत व इतर अवयवांवर अल्कोहोलने केलेला परिणाम व त्यांची बदललेली कार्यक्षमता अशा अनेक घटकांवर हे औषध आणि अल्कोहोलचे नाते अवलंबून असते. मधुमेहामध्ये दिल्या जाणार्‍या काही औषधांचा साइड इफेक्ट म्हणजे, रक्तशर्करा नॉर्मलपेक्षाही कमी होणे किंवा रक्तातील लॅक्टिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढणे. या दुष्परिणामाची तीव्रता अल्कोहोलमुळे वाढू शकते. प्रसंगी रुग्णाला ते जीवघेणेही ठरू शकते. मधुमेहींमध्ये साखरेची पातळी स्थिर राखणे, हे मद्याचा अडथळा असल्यास आव्हानात्मकच ठरते. उदा. रक्तदाबामध्येही अल्कोहोल घेण्यामुळे रक्तदाबाचे नियमन कठीण होते. काही औषधांबरोबर अल्कोहोलची आंतरक्रिया होऊन रक्तदाब अचानक कमी होतो, तर कधी हृदयगती जास्त वाढते. लेखाच्या सुरुवातीस उल्लेख केलेल्या पहिल्या केसमध्ये नेमके हेच झाले होते. रुग्णाने बर्‍यापैकी जास्त प्रमाणात मद्यसेवन चालू केल्याने पूर्वी लागू पडलेली गोळी घेऊनही त्याला अस्वस्थ वाटत होते.

अनेक वेदनाशामकांच्या दुष्परिणामाने पोटात अल्सर, रक्तस्राव होऊ शकतो. अल्कोहोलमुळे हे दुष्परिणाम अधिक लवकर व तीव्र स्वरूपात होऊ शकतात. अल्कोहोलमुळे यकृताचे काम मंदावते, यकृत निकामी होत जाते. पॅरासिटॅमॉलही जास्त डोसमध्ये घेतल्याने यकृतावर दुष्परिणाम होतो. त्यामुळे सातत्याने अल्कोहोल घेणारी व्यक्ती ताप, डोकेदुखीसाठी वारंवार पॅरासिटॅमॉलही घेत राहिली, तर यकृत निकामी होण्याची प्रक्रिया अधिक जलद होण्याची शक्यता असते. अल्कोहोल मुख्यत: मेंदूवर परिणाम करते व मेंदूचे काम रोखतेे. जी औषधे मेंदूला डिप्रेस करून परिणाम साधतात, उदा. झोपेच्या गोळ्या, त्यांचा परिणाम अल्कोहोलमुळे अधिक वाढतो. दोन्हीच्या एकत्रित परिणामामुळे दुष्परिणामांचीच शक्यता वाढते. त्यामुळे झोपेच्या गोळ्या व अल्कोहोल मिश्रणाने झोप अधिक गहिरी होतेच, पण व्यक्ती बेशुद्धावस्थेतही जाऊ शकते. श्वसनास त्रास होऊ शकतो. अ‍ॅलर्जीवरील काही औषधांच्या साइड इफेक्ट‌्समुळे रुग्णास गुंगी आल्यासारखे होते, हालचालीतील जागरूकता कमी होते. सोबत अल्कोहोलचाही मारा असल्यास हा परिणाम अधिक तीव्र होतो.

अ‍ॅसिडिटीवरील काही औषधे (उदा. रॅनिटिडिन) अल्कोहोलचे रक्तातील विघटन कमी करतात. ज्यामुळे अल्कोहोलची रक्तातील पातळी बराच काळ वाढलेलीच राहते व त्याचा प्रभाव अधिक काळ राहतो. काही औषधे, जसे की सुरुवातीस उल्लेख केलेले मेट्रोनिडाझोल, फंगल इन्फेक्शनसाठीची काही औषधे, मधुमेहाची काही औषधे, काही सल्फा गटातील औषधे अल्कोहोलचे शरीरातील विघटन अर्ध्यावरच थोपवतात. यामुळे अ‍ॅसिटाल्डिहाइड नावाचे रसायन रक्तात जमा होते व छातीत धडधड, उलट्या, चक्कर येणे, चेहरा लालेलाल व गरम होणे, अस्वस्थता असे अनेक अनुभव रुग्णास येतात. आता आपल्या लक्षात आलेच असेल की, लेखाच्या सुरुवातीच्या दुसर्‍या केसमध्ये फार्मासिस्टने रुग्णाला नेहमीची ‘सवय’ काही दिवस तरी सोड, असा सल्ला का दिला ते.

टीबी(क्षयरोग)चे उपचार कमीतक मी सहा ते आठ महिने घ्यावे लागतात, हे सर्वांनाच माहीत आहे. अनेक डॉक्टर्स/फार्मासिस्ट अल्कोहोलची सवय असलेल्या रुग्णांना निदान हे उपचार चालू असताना ही सवय सोड, नाही तर औषधे लागू पडणार नाहीत, यकृतावर अधिक दुष्परिणाम होतील, असे समुपदेशन करतात; पण हे ऐकून अनेक महाभाग रुग्ण एक वेळ औषधांनाच सोडचिठ्ठी देऊन आयुष्याची अधिकच विल्हेवाट लावतात.

वर्षानुवर्षे जे मद्य घेत असतात, त्यांचे शरीर काही औषधांनी नेहमीच्या डोसमध्ये दाद देत नाही. मग औषधाचा डोस वाढवणे किंवा दुसरे औषधे देणे, असा पर्याय डॉक्टरांपुढे उरतो. दारूमुक्तीसाठी काही एखादी ‘जादूची गोळी’ उपलब्ध नाही. पण स्वनिश्चय, पूर्णत: वैद्यकीय निरीक्षणाखाली अल्कोहोलविरोधी औषध घेणे, जोडीला शरीराला अल्कोहोलचा रतीब अचानक बंद झाल्याने होणारा त्रास कमी करण्यासाठी (withdrawl syndrome) पूरक औषधे घेतली तर काही आठवडे ते काही महिन्यांत व्यसनमुक्ती होऊ शकते. मात्र, काही वेळा औषधांच्या दिशाभूल करणार्‍या जाहिरातींना बळी पडून असा व्यसनमुक्तीचा प्रयत्न स्वमनाने वा नातेवाइकांनी मात्र नक्कीच करू नये. ते जिवावरही बेतू शकते. केवळ तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच व्यसनमुक्तीचा मार्ग चोखाळावा.

अलीकडे प्रसिद्ध झालेल्या संशोधनात ऑस्ट्रेलिया व ब्रिटिश संशोधकांनी पूर्वी प्रसिद्ध असलेला समज ‘थोडे मद्य हे आरोग्यासाठी उत्तम असते’ हा चुकीचा आहे व अल्कोहोलचा कोणताही विधायक फायदा आरोग्याला नाही, असे म्हटले आहे. हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे. अल्कोहोलमुळे साधारण २०० आजार होऊ शकतात व त्यात औषधोपचार करताना पुन्हा अल्कोहोलचा अडथळा येऊ शकतो, हेही जाणणे महत्त्वाचे.

मंजिरी घरत
symghar@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...