आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साथ मधुमेहाची !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुमेह हासुद्धा उच्च रक्तदाबासारखाच ‘सायलेंट किलर’ आहे, चोरपावलांनी येतो. लक्षणे दाखवेलच, असे नाही. आपल्याला बेसावध ठेवून एकदम कधीतरी गंभीर प्रसंग आणू शकतो. मग त्याचे अस्तित्व आपल्या लक्षात येते.
‘लाडू आणि करंजी नको बरं, शुगर आहे ना मला.’ असे म्हणत काकांनी कष्टाने लाडू-करंजीची प्लेट बाजूला सारत चिवडा तोंडात टाकला. अशा स्वादिष्ट मोहाच्या क्षणांना बळी न पडणे किती जिकिरीचे आहे, हे जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे. मंडळी, आपल्या लक्षात आले असेल, आजची चर्चा मधुमेहावर, ‘गोड’ आजारामागील कडू सत्य जाणून घेण्यासाठीची.
आपल्या शरीरातील प्रत्येक पेशीला ऊर्जेची गरज असते. ही ऊर्जा मिळते, ग्लुकोज म्हणजे साखरेपासून. आपण खाल्लेल्या पिष्टमय पदार्थांचे रूपांतर पचनसंस्था ग्लुकोजमध्ये करते. ग्लुकोज रक्तामार्गे प्रत्येक पेशीत पोहोचते. या प्रक्रियेत स्वादुपिंडाने बनवलेल्या ‘इन्सुलिन’ संप्रेरकाची भूमिका कळीची असते. काही कारणाने शरीरात इन्सुलिनची निर्मिती झाली नाही किंवा कमी झाली, तर मग साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच साठून राहते. त्यामुळे साखरेमुळे जाडसर झालेल्या रक्ताचा सर्व अवयवांना नीट रक्तपुरवठाही होत नाही. पेशींचे काम मंदावते. एकंदर शरीरात सर्वदूर परिणाम होतात. नेमके हेच होते मधुमेहात. साखरेची रक्तातील पातळी नॉर्मलपेक्षा खूप वाढते (हायपरग्लायसेमिया). ‘टाइप वन’ प्रकारच्या मधुमेहात शरीर इन्सुलिन अजिबातच बनवत नाही. हे साधारण लहान वयात लक्षात येते. रुग्णाला बालपणापासूनच आयुष्यभर इन्सुलिन इंजेक्शनवर अवलंबून राहावे लागते. ‘टाइप टू’ हा प्रकार प्रौढपणी अाढळणारा. यात इन्सुलिन कमी बनते किंवा इन्सुलिनला शरीर दाद देत नाही. ९० टक्के रुग्णांमध्ये हाच प्रकार आढळतो. साधारणपणे, हा आपण ओढवून घेतलेला डायबेटिस असतो. सुस्त व अनियंत्रित जीवनशैली, गोड पिष्टमय पदार्थांचे अतिसेवन, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा यामुळे हा मधुमेह होतो. अर्थात आपले जीन्स, वाढत जाणारे वय हे घटकही कारणीभूत असतातच. खूप तहान, भूक लागणे, वारंवार लघवीस होणे, वजन घटणे, थकवा, सारखा जंतु-संसर्ग होणे, जखमा लवकर बऱ्या न होणे, अंधुक दिसणे, हातापायांना मुंग्या अशी अनेक लक्षणे मधुमेहाची असतात. धोकादायक बाब म्हणजे, मधुमेह हासुद्धा उच्च रक्तदाबासारखाच ‘सायलेंट किलर’ आहे, चोरपावलांनी येतो. लक्षणे दाखवेलच, असे नाही.
खरं तर साध्या रक्त तपासणीने मधुमेहाचे निदान करता येते. रक्तशर्करा उपाशीपोटी (फास्टिंग) १२६ मि.ग्रॅ.च्या वर किंवा खाल्ल्यानंतर २०० मि.ग्रॅ.हून अधिक म्हणजे, मधुमेह. या चाचण्यांमध्ये साखरेचे रक्तातील तत्कालीन प्रमाण समजते. पण ग्लायको सिलेटेड हिमोग्लोबीन या टेस्टमध्ये मात्र १०-१२ आठवड्यांतील रक्तशर्करेच्या सरासरी प्रमाणाचा अंदाज येतो. मधुमेह नियंत्रित न ठेवल्यास डोळ्यात काचबिंदू, मोतीबिंदू, हृदयविकार, मेंदूस रक्तपुरवठा न होणे, वा रक्तस्राव (स्ट्रोक), किडनीचे व मज्जासंस्थेचे काम मंदावते. हातापायातील संवेदना हळूहळू कमी होतात. त्यामुळे दुखले-खुपले, तरी जाणवत नाही. जखमा, जंतूसंसर्ग होऊन बोटे, हात-पाय कापण्याची वेळही येऊ शकते.
मधुमेहात आयुष्यभर औषधोपचार, आहार पथ्य व इतर काळजी घ्यावी लागते. ‘टाइप वन’ मधुमेहात इन्सुलिन इंजेक्शनद्वारे रोज घ्यावे लागते. अजून तरी इन्सुलिन तोंडावाटे घेता येत नाही. इन्सुलिन इंजेक्शनचा डॉक्टरांनी सांगितलेलाच प्रकार, त्याला योग्य असणारीच सिरिंज आणि योग्य डोस, ही काळजी घेणे अत्यावश्यक असते. इंजेक्शनची जागा बदलती ठेवावी लागते. जेवणाच्या आधी इंजेक्शन घ्यायचे. नेमके किती वेळ आधी, इंजेक्शनचे तंत्र हे सर्व डॉक्टर/फार्मसिस्टकडून जाणून घेणे महत्त्वाचे. ‘इन्सुलिन पेन’ वापरणेही सोयीस्कर असते, वापरण्याचे यंत्र मात्र नीट जाणून घेणे आवश्यक. इन्सुलिन फ्रीजमध्ये ठेवायचे, फ्रीजरमध्ये नाही.
टाइप टू डायबेटिससाठीची ग्लिसेपिराईड, ग्लिकाझाइट, मेटफॉमिन, सिताग्लिप्टिज इ. ही औषधे (मेटफॉर्मिन वगळता) जेवणाच्या पाच-दहा मिनिटे अगोदर किंवा जेवणासोबत घ्यायची. टाइप टू मधुमेहात गोळ्यांसोबत कधीकधी इन्सुलिन इंजेक्शनही घ्यावे लागते. इन्सुलिन वा गोळ्या यांच्यामुळे ‘हायपोग्लायसेमिया’ म्हणजे रक्तातील शर्करा नॉर्मलपेक्षाही कमी होणे, असा ‘साइड इफेक्ट’ होऊ शकतो. औषधे घेतली; मात्र वेळच्या वेळी जेवले नाही, किंवा डोस जास्त घेतला, तर हायपोग्लायसेमियाची शक्यता वाढते. थरथर, धडधड, चक्कर, मळमळणे, घाम, डोकेदुखी, मानसिक गोंधळ, विचित्र वागणे असा त्रास रुग्णास होतो. रुग्ण बेशुद्धही होऊ शकतो. अशी लक्षणे दिसताच साखर, मध, बिस्किट, चहा, कॉफी, ज्यूस असे जे त्या क्षणी उपलब्ध असेल ते रुग्णास खायला द्यायचे. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढेल. व्यायाम, अतिश्रम, दारूचे सेवन यामुळे ही स्थिती मधुमेहींमध्ये होऊ शकते.
थोडक्यात महत्त्वाचे
- वैद्यकीय सल्ल्यानुसार इन्सुलिन, गोळ्या न विसरता, ठरावीक वेळी घ्यायच्या. विसरलेला डोस न घेता ठरलेल्या वेळी पुन्हा डोस घ्यायचा. डबल डोस मात्र कधीही घ्यायचा नाही.
- वेळच्या वेळी (पथ्याचे) खाणे, उपासतापास न करणे.
- वेळोवेळी तपासणी, ब्लड टेस्ट करणे.
- इन्फेक्शन, इतर काही आजार, लांबचा प्रवास, शस्त्रक्रिया अशा वेळी डोस कमी-जास्त अॅडजेस्ट करावा लागतो.
- उपचार करणाऱ्या प्रत्येक डॉक्टरांना आपण मधुमेही असल्याचे सांगणे.
- मधुमेहाचा इतर अवयवांवर अपरिहार्य परिणाम होत असतो. डोळे, हृदय, मूत्रपिंड व पूर्ण वैद्यकीय तपासणी वर्षातून आवश्यकच. रोज पाय, तळपाय निरखणे, त्वचेची काळजी महत्त्वाची. अनवाणी न चालणे उत्तम.
- आयुर्वेदिक, हर्बल वा इतर ‘पॅथी’ची औषधे चालू करणे व नेहमीच्या गोळ्या बंद करणे, हे धोकादायकच ठरू शकते. आपल्या नेहमीच्या डॉक्टरांच्या साहाय्याने व इतर ‘पॅथी’चा तज्ज्ञांच्या सल्ल्याने वागावे. मुळात दोन-तीन प्रकारच्या पॅथींची औषधे एकत्र घ्यावी का, हा अधिक संशोधनाचा विषय आहे.
- घरच्या घरी ‘ग्लुकोमीटर’ वापरून शुगरवर नजर ठेवता येते. याबाबत आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधणे.
- आपल्या सोबत डायबेटिस ओळखपत्र ठेवणे, वा नेहमीच्या ओळखपत्रावर ‘डायबेटिक’ अशी नोंद असणे उपयुक्त होईल.
- मधुमेहामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, टीबीसारखे इन्फेक्शन होण्याची शक्यता वाटते.
- दारू-तंबाखूला सोडचिठ्ठी देणे गरजेचे.
symghar@yahoo.com