आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रवास आरोग्यदायी होवो...

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुट्ट्या सुरू होण्याच्या महिना-दोन महिना आधीच डोक्यात ट्रीपचे विचार घोळू लागतात. मग त्यासाठी तिकिटांचे बुकिंग, हॉटेलचे रिझर्व्हेशन, ट्रान्सपोर्टची सोय या सगळ्याला महत्त्व देताना तब्येतीच्या गरजेनुसार औषधांची तजवीज करणे आपल्या गावीही नसते...

उन्हाळ्याची सुट्टी सुरू आहे. अनेक जणांना ट्रीपला जाण्याचे वेध लागले असतील. काही जण प्रवासाला रवानाही झाले असतील. नेहमीच्या रुटीनमधून ‘रिफ्रेश’ होण्यासाठी कुटुंबीय, मित्रमंडळींसोबत असा ‘ब्रेक’ साऱ्यांनाच हवाहवासा असतो. ही आपली ट्रीप पूर्ण एन्जॉय करता यावी, निर्विघ्न पार पडावी, यासाठी अजून एकाच पूर्वतयारीची गरज असते, ती म्हणजे वैद्यकीय अन्् औषधीय तयारी. पण या आघाडीवर मात्र आपल्यापैकी बरेच जण पुरेशी तयारी करताना दिसत नाहीत. मग कधी किरकोळ, तर कधी गंभीर प्रसंग उद््भवतात. ट्रीपचा मूडच बदलून जातो. प्रवासात हवा, पाणी, खाणे-पिणे सारेच बदलते. कधी दूर जंगलात, कधी दुर्गम पहाडात, ट्रीपचे ठिकाण असते. अशा ठिकाणी सुसज्ज हॉस्पिटल सोडाच; पण डॉक्टर, दवाखाना, केमिस्टचे दुकानही नसते. थोडक्यात, वैद्यकीय मदत चटकन मिळणे दुरपास्त असते. या बाबींचा विचार करून ही वैद्यकीय अन्् औषधीय पूर्वतयारी करणे गरजेचे असते.

यातील काही तयारी ही जनरल म्हणजे सर्वसाधारणपणे सर्वांसाठीच जरुरीची आहे व काही विशिष्ट तयारी ही मधुमेही, उच्च रक्तदाब किंवा तत्सम आजार असणाऱ्या रुग्णांसाठी गरजेची आहे. प्रथम जनरल तयारीचे बघू. प्रवासातील सार्वजनिक तक्रार म्हणजे, पोट बिघडून अतिसार(डायरिया) होणे. यात शौचास पातळ व वारंवार होऊन शरीरातील पाण्याची पातळी झपाट्याने कमी होते. यामुळे शुष्कता(डिहायड्रेशन) होऊ शकते व ते न रोखल्यास व डायरियाचे स्वरूप तीव्र असल्यास प्रसंगी प्राणघातकही ठरू शकते. त्वरित पुनर्जलीकरण(रिहायड्रेशन) चालू करणे हा यासाठी सोपा व जालीम उपाय आहे. म्हणून प्रवासात ‘ओरल रिहायड्रेशन सॉल्ट‌्स’(ORS) म्हणजे पुनर्जलीकरणासाठीचे क्षार व साखर यांचे मिश्रण सोबत असावेच. पावडर वा द्रव्य स्वरूपात या प्रकारातील अनेक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. उदा. इलेक्ट्राॅल, रिलाईट, ओआरएस वगैरे. पावडर स्वरूपातील मिश्रण मिनरल वॉटरमध्ये (प्रवासात उकळून थंड केलेले पाणी मिळणे मुश्कील आहे, हे लक्षात घेऊन) लेबलवरील सूचनेप्रमाणे योग्य प्रमाणात मिसळून ते वापरायचे असते. उपयुक्त जीवाणू, यीस्टचा शरीरात पुरवठा करण्यासाठी ‘प्रोबायॉटीक’ ही उत्पादने असतात. ती डायरिया नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त आहेत. उदा. स्पोरुलॅक, रिफ्लोरा, सोलीब वगैरे.

डायरियाचे लक्षण दिसल्यास ‘प्रोबायॉटिक’ व पुनर्जलीकरणाचे प्रयत्न चालू केल्यास गंभीर परिस्थिती उद््भवणार नाही. याखेरीज आतड्याची गती कमी करून डायरिया थांबवणाऱ्या गोळ्या असतात, पण त्या सर्रास व वारंवार वापरणे योग्य नसते. म्हणून डॉक्टरांचे मार्गदर्शन याबाबत घ्यावे. स्वमनाने अँटिबायॉटिक्स वगैरेचा मारा मात्र करू नये.

प्रवासादरम्यान अंगदुखी, उलट्या, ताप, अॅसिडीटी, सर्दी-खोकला, अॅलर्जी यासाठीची औषधेही सोबत असणे जरुरीचे आहे. प्रथमोपचाराच्या साहित्यात जंतुनाशक क्रीम, कॉटन रोल, बँडेडसारख्या पट्ट्या महत्त्वाच्या. डासांना पळवून लावणारी मलमे व आयुधेही सोबत असावीत. पाणी निर्जंतुक करण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेले क्लोरिवॅट किंवा तत्सम उत्पादन उपयुक्त होईल. प्रवासात हात न धुताच खाण्याची वेळ अनेकदा येते, म्हणून हात निर्जंतुक करण्यासाठी ‘हँड सॅनिटायझर’ही सोबत हवे. हे सगळे ठेवण्यासाठी डबा किंवा पाऊच हवा. शक्यतो गोळ्या प्रकाराची औषधे एका डब्यात व बाहेरून वापरायची औषधे दुसऱ्या डब्यात, असे दोन डबे केल्यास उत्तम.
वरील प्रकारची औषधे किंवा बाकी वस्तू ही झाली जनरल तयारी. पण ज्यांना आधीच काही आजार आहेत, त्यांनी अधिक काळजी घेणे महत्त्वाचे. रोज घ्यावी लागणारी सर्व औषधे व त्याचे प्रिस्क्रिप्शन सोबत हवे. आपण येथे वापरत असलेला ब्रँड ट्रीपच्या ठिकाणी असेलच असे नाही, हे लक्षात घेऊन आपल्या औषधांचा पुरेसा साठा जवळ असणे आवश्यक. मधुमेह, उच्च रक्तदाब असे काही आजार असतील तर लांबच्या व दीर्घ प्रवासाच्या दृष्टीने औषधाच्या डोसमध्ये काही अॅडजस्ट करणे, आजाराची सद्य:स्थिती तपासून घेणे अत्यंत गरजेचे असते. म्हणून प्रवासाचा प्लॅन ठरला की, त्वरित आपल्या डॉक्टरांकडे जाऊन चेकअप करून घेणे व त्यांच्याकडून ‘काय करावे व काय करू नये’ (Do's and Don'ts) हे जाणून घेणे महत्त्वाचे. पण बहुतेक रुग्ण अशा चेकअपसाठी जातच नाहीत व काही जण गेले तरी प्रवासाच्या आदल्या दिवशी वगैरे जातात व तेव्हा फारसे काही करणे शक्य नसते, असे तज्ज्ञ डॉक्टरांचे अनुभव आहेत. प्रवासात खूपदा साईट सीईंगच्या नादात दमछाक होते, खाण्या-पिण्याचे पथ्य फारसे पाळले जात नाही, परिणामी रक्तदाब, रक्तशर्करा प्रमाणाबाहेर वाढू शकते. काही रुग्ण स्वमनानेच औषधाचा डबल डोस घेतात व औषधाचा दुष्परिणाम ओढवून घेऊन हॉस्पिटल गाठायची वेळ येते. हे सर्व टाळणे शक्य आहे. म्हणूनच प्रवासाच्या कमीतकमी एक महिना आधी तरी डॉक्टरांची भेट घ्यावीच. ज्यांना अस्थमाचा त्रास होतो, त्यांनी अचानक तीव्र अस्थमा उद््भवल्यास काय करायचे, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर अतिउंच ठिकाणी पर्यटनासाठी जात असू तर हा मुद्दा अधिकच महत्त्वाचा ठरतो. प्रवासात, विशेषत: बस वा विमान प्रवास अनेक तासांचा असेल तर पायांच्या हालचाली खूप मर्यादित होतात व ज्यांना DVT(डिप व्हेन थ्रोम्बोसिस- म्हणजे रक्तप्रवाहात रक्ताच्या गुठळ्या- विशेषत: पायांकडील भागात)चा त्रास आहे त्यांचा हा त्रास बळावू शकतो. याबाबतही डॉक्टरांचा सल्ला घेऊन ठेवणे आवश्यक.
परदेशी प्रवास असेल तर लागणारी सर्व औषधे, त्यांची प्रिस्क्रिप्शन्स बाळगणे जरुरीचे असते. विमानप्रवासात शक्यतो ही आपल्या जवळच्या सामानात म्हणजे ‘केबिन बॅग’मध्ये ठेवायची. काही देशांमध्ये ‘स्टिरॉइड्स’, झोपेच्या गोळ्या इ. औषधे नेण्यासाठी नियम आहेत व अशी औषधे कस्टममध्ये जाहीर करावी लागतात. म्हणून ज्या देशांना भेटी देणार असू, तिथले नियम माहीत करून घेणे आवश्यक असते. औषधांसोबत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व सर्टिफिकेट जवळ बाळगल्यास सहसा कुठे हरकत घेतली जात नाही. औषधे मूळ पॅकिंगमध्ये ठेवणेही गरजेचे आहे. काही देशांत जाताना विशिष्ट लसी टोचून घ्याव्या लागतात. उदा. काही अाफ्रिकन देश, किंवा ब्राझीलला जायचे तर ‘यलो फीवर’ या संसगर्जन्य आजाराविरुद्धची लस आवश्यक व ती प्रवासाच्या काही आठवडे आधी घ्यावी, असे नियम आहेत. परदेशात जाताना प्रवासी विमा (ट्रॅव्हल इन्श्युरन्स) घ्यायचा असतोच. त्याची कॉपी जवळ बाळगणे, त्याचा फोटो मोबाइलमध्ये काढणे वगैरे काळजी घेतल्यास अचानक गरज भासल्यास धावपळ होणार नाही. हीच काळजी कोणत्याही प्रवासात, देशांतर्गत किंवा परदेशी जाताना, स्वत:च्या मेडिकल इन्श्युरन्सबद्दल घेणे आवश्यक आहे. समजा ‘मेडिक्लेम’ हा इन्श्युरन्स आहे, तर त्याचा पॉलिसी नंबर किंवा कार्ड सोबत बाळगणे, मोबाइलमध्ये असणे आवश्यक अाहे. तसेच हे नंबर स्वत:ला/ नातेवाइकांना इमेल/ व्हॉट‌‌‌्सअॅप करून ठेवल्यास गरज पडल्यास ते सहजी उपलब्ध असेल.
तर आपण प्रवासाआधीची जनरल तयारी व विशिष्ट तयारी, अशी थोडक्यात चर्चा केली. मग ही तयारी सर्वच प्रकारच्या प्रवासासाठी लागू आहे. परदेशस्थ मुलांकडे भेट देणारे माता-पिता असोत, साहित्य/नाट्य संमेलन वगैरेंना जाणारे हौशी रसिक, ज्येष्ठ नागरिक असोत, किंवा आधी चर्चिल्याप्रमाणे ट्रीपला जाणारे हौशी पर्यटक असोत; आपला प्रवास ठरला की, डॉक्टरांकडे जाऊन तपासून घेणे, आपला ‘फिटनेस’ जाणून घेणे व तयारीसाठी मार्गदर्शन घेणे आपल्या प्रवासासाठी उपकारक होईल. औषधांचा डबा आपणास उघडावाच न लागाे, ही सदिच्छा. मात्र तो सोबत बाळगा मात्र जरूर. विश यू ऑल हॅपी अँड सेफ जर्नी!
तळटीप : ‘बहुमूल्य आरोग्यचिठ्ठी’ या मागील लेखात औषधांच्या ब्रँड्सच्या नावाची चर्चा करताना ‘डायमॉक्स’ या औषधाचा उल्लेख अनवधानाने अँटिबायॉटिक असा झाला. ते अँटिबायॉिटक नसून ‘डाययुरेटीक’ या गटातील औषध अाहे.

थोडक्यात महत्त्वाचे
- प्रवासाला जाण्यापूर्वी वैद्यकीय तपासणी व मार्गदर्शन आवश्यक.
- कायमस्वरूपी लागणाऱ्या औषधांचा पुरेसा साठा व डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन सोबत जरुरीचे.
- अतिसार, ताप, उलट्या, अंगदुखी, अॅलर्जी, सदी-खोकला यावरील औषधे आवश्यक.
- डास, इतर कीटकदंश यासाठीच्या उपाययोजना.
- मेडिकल इन्श्युरन्स, प्रवासी विमा याची प्रत सोबत.
- नेहमीचे डॉक्टर, फार्मासिस्ट यांचे फोन नंबर सोबत जरुरीचे.
- विशिष्ट आजार व काही औषधांची अॅलर्जी यांची नोंद ओळखपत्रावर असावी.
- औषधे डब्यात, पाऊचमध्ये ठेवावीत व सोबत औषधाचे नाव व उपयोग याची यादी ठेवावी.
- वैद्यकीय अन् औषधीय तयारी करताना डॉक्टर, फार्मासिस्टचे संपूर्ण मार्गदर्शन घेणे उत्तम.
symghar@yahoo.com