आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिबायोटिक्‍स घेऊ नका स्‍वमनाने ! (मंजिरी घरत)

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जुनी, गोळ्यांची रिकामी स्ट्रीप दाखवत रुग्णाने केमिस्टच्या दुकानात त्या गोळ्या मागितल्या. ‘मागच्या वेळी असाच घसा दुखत होता ना तेव्हा डॉक्टरांनी याच गोळ्या दिल्या होत्या. म्हणून या वेळी सरळ त्याच घ्यायला आलो’, असे तो रुग्ण म्हणाला. या रुग्णाच्या उद‌्गारांत नवल वाटावे असे काहीच नाही. स्वमनाने काऊंटरवर जाऊन औषधे घेण्याची सवय व त्यास पोषक वातावरण आपल्याकडे सर्वत्र आहेच. अँटिबायोटिक्स ही केवळ प्रिस्क्रिप्शन औषधे. यांच्या चुकीच्या व अतिवापरामुळे आज आपण अनेक अँटिबायोटिक्सना गमावून बसलो आहोत. अँटिबायोटिक्स जिवाणूंचा (बॅक्टेरिया) नाश करतात व म्हणून जिवाणूजन्य इन्फेक्शन्समध्ये ही प्रभावी ठरतात. १९४०ला पेनिसिलिनचा शोध लागल्यानंतर अँटिबायोटिक्स युग चालू झाले. तोपर्यंत जिवाणू वा तत्सम सूक्ष्मजीवांशी लढायला आपल्याकडे एकही अस्त्र नव्हते. आज १००हून अधिक अँटिबायोटिक्स व त्यांचे हजारो ब्रँड्स बाजारात उपलब्ध आहेत. उदा. अझिथ्रोमायसिन, सिप्रोफ्लोक्सासिन, सेफिक्झाईम इ. आजाराची तीव्रता, रुग्णाचे वय, इन्फेक्शनचा प्रकार बघून कोणते अँटिबायोटिक्स द्यायचे, हे ठरवायचे असते. पुन्हा त्याचा ठरावीक कोर्सही असतो. म्हणजे काही वेळा ५, ७, १० दिवस ते घ्यायचे असते. तर टीबीसारख्या आजारात ते तब्बल कमीत कमी ६ ते ८ महिने घ्यावे लागते. काही अँटिबायोटिक्स विशिष्ट जिवाणूंविरुद्धच काम करतात. तर काही अँटिबायोटिक्स ही अनेकविध जिवाणूंसाठी कर्दनकाळ ठरतात. अँटिबायोटिक्सचा कोर्स जर मध्येच सोडून अर्धवट उपचार घेतले तर सर्व जिवाणू मारले जात नाहीत व उलट जे जिवाणू वाचतात ते पुढे बंडखोर जिवाणूंच्या पिढ्या तयार करतात. हे बंडखोर जीव मग पूर्वी वापरलेल्या अँटिबायोटिक्सना दाद देत नाहीत व अशा प्रकारे ‘अँटिबायोटिक्स रेसिस्टन्स’ (प्रतिरोध) तयार होतो. एका रुग्णातील बंडखोर जिवाणू नंतर हळूहळू इतरत्र पसरून पूर्ण समाजातच काही अँटिबायोटिक्स निष्प्रभ ठरतात. सामाजिक आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो.

अँटिबायोटिक्स चालू केले की, कोर्स पूर्ण न करण्याकडे अनेकांचा कल असतो. समजा घशाचे इन्फेक्शन झाले आहे, डॉक्टरांनी ५ दिवसांचा कोर्स १० गोळ्यांचा दिला आहे. पहिल्या ३/४ डोसमध्येच जर रुग्णाला बरे वाटू लागले तर पुढचे डोस टाळले जातात. हे बरे वाटणे व बरे होणे यात फरक असतो. तात्पुरते बरे वाटले तरी जिवाणूंचा पूर्ण नायनाट न झाल्याने पुढे कधीतरी बंडखोर जिवाणू परत डोके वर काढतात व अधिक तीव्र इन्फेक्शन होऊ शकते व तेव्हा अधिक मोठी, महागडी अँटिबायोटिक्स वापरावी लागतात. म्हणूनच आपल्याला अँटिबायोटिक्स दिले आहे का, हे डॉक्टरांना विचारणे प्रत्येक रुग्णाने आवश्यक आहे. असेल तर कसोशीने त्याचा नेमका काय कोर्स दिला आहे, हे जाणून घेऊन ते पाळणे महत्त्वाचे.

अँटिबायोटिक्स ही स्वत:च्या मनाने घ्यायची नाहीत. पूर्वी लागू पडलेले, घरात अर्धवट उरलेले किंवा मित्रमंडळाने वगैरे ‘प्रिस्क्राइब’ केलेले अँटिबायोटिक्स केमिस्टच्या दुकानात जाऊन घेणे हा ‘शॉर्टकट’ पुढे घातक ठरू शकतो. केवळ स्वत:साठीच नव्हे तर सर्व समाजासाठीही. सर्दी हे विषाणूजन्य इन्फेक्शन असून त्याला अँटिबायोटिक्सचा काही उपयोग नसतो. पण अर्थातच अशा स्वमनाने केलेल्या अति व चुकीच्या वापराने अँटिबायोटिक्स रेसिस्टन्सच्या समस्येला खतपाणी घातले जाते.
कोणत्याच अँटिबायोटिक्सना दाद न देणारे ‘सुपरबग्ज’ही (Superbugs-महाजंतू) आढळत आहेत. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘अँटिबायोटिक्स वापरा जरा जपून’ हे घोषवाक्य ठरवून या वर्षी नुकताच १६ ते २२ नोव्हेंबरला अँटिबायोटिक्स सप्ताह जगभर पाळला. थोडक्यात डॉक्टर, रुग्ण, फार्मासिस्ट यांनी अँटिबायोटिक्सचा वापर शहाणपणाने करणे सर्वांसाठी हिताचे आहे. किरकोळ पोट बिघडले तरी थेट ओफ्लोक्सासिनसारखे अँटिबायोटिक्स घे, घसा जरा खवखवू लागला तर जाऊन अझिथ्रोमायसिन घे, असे अँटिबायोटिक्सचा ‘हौसेने’ वापर करणारे रुग्ण सर्वत्र आढळतात. अर्थात त्यांना अनेकदा आपण अँटिबायोटिक्स वापरत आहोत, याची जाणीव व त्याचे गांभीर्य माहीत असतेच असे नाही. काही अँटिबायोटिक्स जेवणाआधी तर काही जेवणानंतर घ्यायची. सहसा काही खाल्ल्यानंतर अँटिबायोटिक्स घेतल्यास मळमळ, अॅसिडीटी होत नाही. अँटासिड, कॅलशियम, लोह गोळ्या, दूध यासोबत काही अँटिबायोटिक्स घ्यायची नाहीत (उदा. सिप्रोफ्लोक्सामिन), तर काही तासांच्या अंतराने घ्यायची. याबाबत डॉक्टर, फार्मासिस्टचा सल्ला घेणे उचित होईल. अँटिबायोटिक्सना काही दुष्परिणाम असू शकतात. काही रुग्णांना डायरिया होतो. अँटिबायोटिक्स आपल्या शरीरात उपयुक्त जिवाणूनांही उपद्रवी जिवाणूंसोबत मारतात व त्यामुळे डायरियासारखा त्रास होऊ शकतो. अशा वेळी उपयुक्त जिवाणूंचा पुरवठा करणारी प्रोबयॉटिकसारखी उत्पादने (उदा. स्पोरूलॅक, सोलीब वगैरे) फार्मासिस्टच्या/डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावीत. तसेच गोड, ताज्या दह्याचे सेवन केल्यास त्यातूनही उपयुक्त जिवाणूंचा पुरवठा होतो. काही अँटिबायोटिक्सने काही रुग्णांना अॅलर्जी येऊ शकतो. सूज, त्वचेवर पुरळ, श्वासास त्रास वाटल्यास त्वरित डॉक्टरांस सांगावे व कोणत्या अँटिबायोटिक्सचा त्रास झाला, हे िलहून ठेवावे. पुढे कधी परत आजारी पडल्यास ही अँटिबायोटिक्स अॅलर्जी डॉक्टरांना जरूर सांगावी.

थोडक्यात महत्त्वाचे
} अँटिबायोटिक्स ही जिवाणू (bacteria) निर्मित्त इन्फेक्शनविरुद्ध वापरतात.
} ही प्रिस्क्रिप्शन औषधे (शेड्युल एच व एच वन) केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
} अँटिबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करणे, जरी त्या आधीच बरे वाटू लागले तरीही, आवश्यक.
} सर्दी, किरकोळ आजार यासाठी फार्मसीमध्ये जाऊन अँटिबायोटिक्स मागू नयेत व ‘स्ट्राँग’ औषध द्या, असा दबावही डॉक्टरांवर आणू नये.
} डॉक्टरांकडून निघताना आपल्याला अँटिबायोटिक्स दिले आहे का, असल्यास ते नेमके कोणते, त्याचा कोर्स कसा, हे नीट जाणून घेणे अत्यावश्यक आहे. व याच बाबतीत फार्मासिस्टचा सल्ला घेणेही जरुरीचे आहे.
} उरलेसुरले अँटिबायोटिक्स घरात ठेवून नंतर कधीतरी स्वमनाने वापरणे चुकीचे आहे.
मंजिरी घरत
symghar@yahoo.com
बातम्या आणखी आहेत...