आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूलांच्या मेंदूचा समतोल विकास महत्त्वाचा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तंत्रज्ञानाशी झटपट मैत्री करणा-या मुला/मुलीच्या मेंदूवर काय परिणाम होतो, हे गंभीरपणे लक्षात घ्यायला हवे. मुलांवरच्या ताणाचा अभ्यास करून त्यांच्या समस्यांवर उपाय शोधण्यासाठी 17 वर्षांपासून संशोधन करणा-या डॉ. मनीषा जोशी यांच्याशी बालदिनानिमित्त साधलेला हा संवाद.
* डॉक्टर, तुमच्याकडे जास्त तक्रारी कशा प्रकारच्या येतात?
एडीएचडी (अटेन्शन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टिव्हिटी डिसऑर्डर) ही तक्रार हल्ली ब-याच मुलांमध्ये आढळते. अशी मुले वस्तूंची फेकाफेक करतात, सतत घाबरलेल्या अवस्थेत असतात, चिडचिड करतात, नीट जेवतही नाहीत. या मुलांच्या मेंदुलहरींची चाचणी केल्यास त्यात त्या मंदावलेल्या आढळते. अशी मुले ‘नॉर्मल’ मुलांप्रमाणेच दिसतात, पण त्यांच्यात शांतता, सौम्यपणा, एकाग्रता नसून आक्रमकता, चिडचिड, अस्थिरता, अतिचंचलता अशी लक्षणे आढळतात.
* मग यामागील कारणे काय?
लहान मुले अशी वागतच असतात म्हणून याकडे दुर्लक्ष केले जाते. पण मोठेपणीही याचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. अतिचंचलता, अस्थैर्य किंवा चिडचिड ही असंतुलित मेंदुलहरींचा परिणाम आहे. वेगवान जीवनशैली, गरजेपेक्षा जास्त टीव्ही किंवा गतिमान दृश्यं पाहणे, ज्यात व्हिडिओ गेम्सचाही समावेश होतो, यामुळे मेंदुलहरींचा तोल ढासळतो. प्रत्येकाच्या मेंदुलहरींची एक गती असते. त्या गतीपेक्षा जास्त गतीची दृश्ये किंवा हालचाली पाहिल्यास आपला मेंदू सक्षमपणे काम करू शकत नाही. टीव्हीसमोर बसलेल्या मुलाला आवाज दिल्यावर एका हाकेत ती कधी प्रतिसाद देत नाहीत. मुलांच्या कानावर आपले शब्द पडतात, पण मेंदूचे काम त्या वेळी मंदावलेले असते. म्हणजेच मेंदूतून बाहेर पडणा-या लहरींचा वेग मंदावतो. यासाठी ड-3 या जीवनसत्त्वाची कमतरतासुद्धा कारणीभूत आहे. जागतिक पातळीवर सध्या ड-3 जीवनसत्त्वाचा मुद्दा चर्चेत आहे.
* मेंदू, ड-3 जीवनसत्त्वाचा काय संबंध आहे ?
ड-3 हे जीवनसत्त्व मेंदूतील चेतापेशींमधील कॅल्शियम, आयन्ससाठी आवश्यक असते आणि त्याचा थेट परिणाम डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरवर व फ्रंटल लोबमधील बीटा मेंदुलहरी मंदावण्यावर होतो. इंद्रियांनी ग्रहण केलेली एखादी माहिती किंवा शरीरातून होणारा रक्तपुरवठा मेंदूकडे जात असताना मेंदूतील वाहिन्यांमध्ये असलेली ‘मेमरी पॉकेट्स’ उघडण्याचे काम ड-3 जीवनसत्त्वाचे असते. हे जीवनसत्त्वच कमी असेल तर मेंदूपर्यंत माहिती, ज्ञान किंवा आवश्यक घटक कमी पोहोचतील.
* ड-3 चे प्रमाण वाढवण्याचे उपाय काय?
सूर्यप्रकाश हा ड-3 जीवनसत्त्वाचा मोठा स्रोत आहे. सूर्यप्रकाशात सूर्यनमस्कार करणे हा प्रमुख उपाय आहे. पण सध्याच्या मुलांचा दिवस एवढा बिझी असतो की सूर्याची आणि त्याची भेटच होत नाही. सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळच्या उन्हात दररोज किमान अर्धा तास खेळले किंवा फिरले तरी या जीवनसत्त्वाचे प्रमाण भरपूर वाढते. याशिवाय संत्री, पपई, पेर, स्ट्रॉबेरी, राजगिरा, जवस, गायीचे दूध व दही यात हे जीवनसत्त्व मिळते.
* मॅजिकल टूर मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी आहे, त्याबद्दल सांगा.
आम्ही काही वर्षांपूर्वी निवडक मुलांना रायगड, मुंबई दर्शन तसेच मुख्यमंत्री, गृहमंत्री, डॉ. विजय भटकर यांची भेट घडवून आणली. 2009मध्ये संसद भवन, भारतीय हवाई दलाची प्रात्यक्षिके, मुंबई हल्ल्यात प्राणांची बाजी लावणा-या राष्ट्रीय सुरक्षा दलाच्या जवानांची भेट, राष्ट्रपती भवन, दिल्लीतील अक्षरधाम, कुतुबमिनार, इंदिरा गांधीजींचे स्मृतिभवन दाखवून आणले. अशा कर्तृत्ववान व्यक्तींना भेटल्यावर मुलांच्या मेंदुलहरींवर काय परिणाम होतो, याचा अभ्यास मी केला. या मुलाखतींमध्ये मुलांनी खूप वेगवेगळे प्रश्न विचारले. भेटीनंतर मुलांच्या मेंदुलहरींमधील ताण कमी होऊन संतुलन झालेले दिसून आले. यामुळे मुलांंमधील आत्मविश्वासाचे प्रमाणही खूप जास्त वाढलेले आढळून आले. त्यामुळे वर्षातून एकदा किंवा दोनदा निसर्गरम्य, ऐतिहासिक ठिकाणी भेट द्यावी तसेच होईल तेवढ्या महान व्यक्ती आणि आपल्या मुलाची भेट घालून द्यावी, त्यांची चरित्रे मुलांना वाचायला द्यावीत.
* मेंदुलहरींबद्दल तुम्ही संशोधन केले आहे त्याबद्दल सांगा.
मुलांचं मन आणि मेंदू या विषयावर मी विशेष संशोधन केलं आहे. आयुर्वेदात हिमालयात आढळणा-या जटामांसी या मेध्य (बुद्धिवर्धक) वनस्पतीचा उल्लेख होता. त्याचा मुलांच्या मेंदुलहरींशी काय संबंध आहे, यासाठी एमडी करत असताना मी संशोधन सुरू केले. यासाठी राज्यभरातील 4,000 मुलांवर संशोधन केलं. जटामांसी तूप, प्लासिबो यांचे परिणाम पडताळून पाहिले. जटामांसीच्या सेवनानंतर मेंदुलहरींमध्ये विलक्षण फरक दिसून आला.
* सध्या मुलांच्या अभ्यासयशावर तुम्ही एक संच तयार केला आहे.
17 वर्षांच्या संशोधनातून या पिढीच्या काही वेगळ्या समस्या आहेत, असे लक्षात आले. प्रत्येक मुलाच्या समस्या सोडवताना, त्यांना अभ्यासात येणा-या अडथळ्यांवर उपाय शोधताना आम्हाला मुलांची जीवनशैली सुधारण्याचा एक धागा सापडला. अगदी मुलांच्या दिनचर्येपासून आहार, अभ्यास, परीक्षा तंत्र या सगळ्यांना भारतीय परंपरा, आयुर्वेदाच्या साच्यात घालून मुलांसाठी खास अभ्यासयशाची पुस्तके आणि सीडीज आम्ही तयार केली आहेत. या संचात अभ्यास कसा करावा, आरोग्य व आहार, सूर्यनमस्कार, ध्यानधारणा, नमस्कार विज्ञान, स्मरणशक्ती, एकाग्रता या विषयांवर चार पुस्तिका, अभ्यासयश व ई शिक्षणक्रांती हे सॉफ्टवेअर तसेच टीव्हीच्या कचाट्यातून मुलांना सोडवण्यासाठी एक फिल्म व पुस्तिका सोबत दिली आहे. हा फक्त एक संच नसून आमच्या 17 वर्षांच्या संशोधनाचे, तपश्चर्येचे फलित आहे. पालकांच्या थोड्या दुर्लक्षामुळे मुलांच्या अभ्यासावर, वर्तणुकीवर आणि एकंदरीत आयुष्यावर गंभीर परिणाम होऊ नये, यासाठी हा सर्वंकष संच शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांसाठी तयार केला आहे.