आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोमादा स्टूडिओ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मार्टफोनच्या फायद्या-तोट्याची चर्चा जगभरात चालू अाहे. पण यातील नकारात्मक गोष्टींचा गंधही मुलांपर्यंत न पोहोचू देता दृक् श्राव्य माध्यमांतून मुलांमध्ये शिक्षणाविषयी गोडी निर्माण करतोय पारगाव येथील जिल्हा परिषद शाळेचा शिक्षक. सोमनाथदादा. त्याच्या स्टुडिओची ही सफर...
ई-लर्निंगचे वारे अनेक जिल्हा परिषद शाळांमध्ये पोहोचलेय. या प्रवाहात सुसाट वेगाने धावत अनेक नवीन प्रयोग करणारे शिक्षक म्हणजे सोमनाथ वाळके. सध्या राज्यभरातील जिल्हा परिषद शिक्षकांसाठी तंत्रकुशल वा टेक्नोसॅव्ही कसे व्हावे, या विषयावरील कार्यशाळा घेणारा हा अवलिया त्यांच्या वर्तुळात सोमनाथदादा किंवा सोमादा म्हणून ओळखला जातो. बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी शाळेत त्याने स्थापन केलेला महाराष्ट्रातील पहिला ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग स्टुडिओ म्हणजे मुलांच्या आनंदी शिक्षणाचा एक मोठा स्रोत.

जिल्हा परिषदांच्या शाळेत सध्या ई लर्निंग सुविधेअंतर्गत संगणक, प्रोजेक्टर्स उपलब्ध आहेत. पण याहीपुढे जाऊन या प्रोजेक्टरवर जर मुलांना त्यांनीच अभिनय केलेले व्हिडिओ पाहता आले तर त्यांचं अभिनय कौशल्यही विकसित होईल आणि संबंधित विषयाची त्यांची गोडीही वाढेल, या उद्देशाने दादाने ही संकल्पना राबवली. इंग्रजी, मराठी कविता, परिपाठातल्या श्लोकांना चाली लावल्या. त्या मुलांच्याच आवाजात रेकॉर्ड केल्या. विविध धड्यांवरून मुलांकडून संवाद लिहून घेतले, नाट्यमय रूपांतर केलं आणि मुलांकडून या धड्यांवर नाटिका बनवून घेतल्या. या सर्व ऑडिओ-व्हिडिओ क्लिप्स मुलांना मेमरी कार्डमध्ये सेव्ह करून दिल्या. ग्रामीण भागातही आता स्मार्टफोन पोहोचले असल्यानं घराघरातून मुलांच्याच आवाजातील कविता वाजू लागल्या अन् नकळत अभ्यासही होऊ लागला. विशेष म्हणजे सोमनाथदादाच्या या स्टुडियोतील सर्व सामग्री त्यांनी स्वखर्चातून उभी केलीय. अद्ययावत कॅमेरा, ट्रायपॉड, कॅसिओ, ढोलकी, ढोल, झांजा, खंजिरी, हार्मोनिअम, स्पीकर्स, कॉर्डलेस माइक, कॉलर माइक आदी साहित्य सोमनाथदादाचे असले तरी शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ते हक्काने हाताळू शकतो. दादाच्या घरात भजनाची परंपरा असल्याने गळ्यात गाणं आणि हातात स्वरसाथ उपजत होती. आपली ही कला मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी तंत्रज्ञानाचा पुरेपूर उपयोग करून घेतला. यातून मुलांचे सुप्त गुण विकसित झाले. कुणी सुरेल गायला लागला तर कुणी गाण्यातल्या ठेक्यावर तालवाद्याची उत्तम साथ करू लागला. एकाला शिकवलेली कला विद्यार्थ्यांमार्फतच दुसऱ्यांपर्यंत पोहोचत गेली आणि हळूहळू सोमनाथदादाच्या या स्टुडिओतील प्रत्येक सामग्री, वाद्य वाजवण्यासाठीचे तंत्रज्ञ, कलाकार मुलांमधूनच तयार झाले. मुलांनी रेकॉर्ड केलेल्या ऑडिओ-व्हिडिओचं एडिटिंग सोमनाथदादा घरीच करतो.

केवळ भाषा आणि कलागुण विकसित करण्याबरोबरच मुलांना स्पर्धेच्या युगात टिकून राहण्याचे फंडेही सोमनाथदादा मुलांना देतो. पुस्तकातील तसेच पुस्तकाबाहेरील विविध विज्ञान प्रयोग या स्टुडिओत करून दाखवतो. अॅनाटॉमी 4D, अॅनिमल 4D या अॅपच्या माध्यमातून मानवी शरीर तसेच पृथ्वीवरील सर्व प्राण्यांची माहिती मुलांपर्यंत पोहोचवतो. गूगल स्केच अॅपद्वारे एखादी वस्तू पाच दिशांनी कशी पाहता येते, हेही इथल्या मुलांना येते. हॅलो इंग्लिश अॅपद्वारे मुले आता इंग्रजीही बोलू लागलीयत. शांत, संयमी, हसतमुख व्यक्तिमत्त्व असलेल्या सोमनाथदादाने आपल्या प्रयोगशील आणि शून्यातून विश्व उभारण्याच्या स्वभावामुळे शिक्षण विभागात चांगलेच नाव कमावले आहे. डीएड झाल्यावर प्रथमच पोस्टिंग मिळाली ती पैठण तालुक्यातील चिंचाळा या गावी. एक शिक्षकी शाळा, नगण्य विद्यार्थी संख्या असलेली ही शाळा. शाळेचे रूप पालटायचे म्हणून दादा जोमाने कामाला लागला आणि काही दिवसातच शाळेची पटसंख्या वाढू लागली. कालांतराने शिक्षकसंख्याही वाढली, आजूबाजूच्या शाळांतील विद्यार्थीही या शाळेत येऊ लागले. गुणवत्ता विकास कार्यक्रमाचे दोन पुरस्कार आणि स्वच्छ, सुंदर शाळेचे पुरस्कारही मिळवले. त्यानंतर बीडमधील जामगावात त्याची बदली झाली. तिथेही लोकसहभागातून साडेतीन लाख रुपयांचा निधी उभा करून शाळेत ई लर्निंग सुविधा उभी केली. सध्याच्या पारगाव जोगेश्वरी शाळेतही साडेसहा लाखांचा निधी लोकसहभागातून उभा केला असून त्यातून शाळेचा मोठा परिसर विकसित केला. टेक्नोसॅव्ही कसे व्हावे यासोबतच मूल समजून घेताना या विषयावर त्यांचे प्रयोग आणि अनुभव विविध कार्यशाळांतून राज्यभरातील शिक्षकांसाठी प्रेरणास्रोत ठरत आहेत. ‘माझ्या गुरुजीची गाडी’ हा सोमनाथदादाच्या कथेवरील लघुपट २८ देशांत स्पर्धेसाठी गेलाय. दादाच्या कलाकृती राज्य आणि देशपातळीवर नाव गाजवत असल्या तरी दादा रमतो फक्त मुलांमध्येच. दादाच्या या साधेपणाला सॅल्यूट.
manjiri.paithankar@dbcorp.in
पुढील स्लाइड्सवर वाचा, काय आहे टेक्नोसॅव्ही टेस्ट... आणि पाहा, फोटोज....
बातम्या आणखी आहेत...