आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कव्हर स्टोरी: ऑनलाइन दत्तकाचे कंगोरे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मूल दत्तक घेण्याची परंपरा फार जुनी. पूर्वीही त्यासाठी नियमावली होतीच, गेल्या काही वर्षात कायद्यांनी ही दत्तकाची प्रक्रिया अधिक मजबूत केली. तसंच दत्तक घेण्याचं प्रमाणही सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या पालकांमुळे वाढतं आहे.

दत्तक प्रक्रियेचे नवे नियम एक ऑगस्टपासून लागू झाले असून त्यामुळे ही प्रक्रिया सोपी तर होतेय, मात्र त्यातील गुंताही तितकाच वाढतोय.

‘मूल' दत्तक घेणं हा काही लग्नानंतर वर्ष-दोन वर्षांतला निर्णय नसतो. आमच्यासारखे पालक किमान एका तपाच्या प्रतीक्षेनंतर दत्तक देणाऱ्या संस्थांच्या दाराशी पोहोचतात. या स्थितीला पोहोचेपर्यंत शरीराने कित्येक महागड्या आणि जीवघेण्या उपचारांचा मारा सहन केलेला असतो. जिथं वैद्यकीय प्रयत्न अन् आमची सहनशक्ती संपते तिथे ही प्रक्रिया सुरू होते. खूप चौकशीअंती एखाद्या संस्थेत जातो. मला आठवतं, पहिल्यांदा आम्ही अहमदनगरच्या स्नेहांकुरमध्ये गेलो, तेव्हा दुरूनच तिथली मुलं पाहता आली. त्या दिवशी घरी परतताना हाती काहीच नव्हतं, पण मुलांच्या किलबिलाटानं आशा पल्लवित झाल्या होत्या. त्यानंतरच्या भेटीत मुलांशी बोलता आलं. त्यांचे बोल, काहीतरी शोधणाऱ्या नजरा पाहून ती आईबाबांच्याच शोधात आहेत, असं वाटलं. संस्थेकडून आमचीही पूर्ण चौकशी झाल्यानंतर ‘समीर’सोबत आम्हाला जास्त वेळ घालवायला मिळाला. आम्ही त्याच्या आगमनाच्या पूर्ण तयारीत होतो. पण अचानक मागील महिन्यात संस्थेकडून कळवण्यात आलं की, नव्या नियमांनुसार आमच्यासारख्या पालकांची नव्यानं प्रतीक्षा यादी जारी होईल,’ स्नेहांकुरमध्ये मूल दत्तक घेण्यासाठी प्रतीक्षा यादीत असलेली अवनी सांगत होती.

‘आता नव्यानं प्रतीक्षा करायची. यादीत आपला क्रमांक आला की दिलेल्या सहा मुलांच्या फोटोंपैकी एका मुलाला निवडायचं. ज्या मुलाला आम्ही यापूर्वी कधी पाहिलंही नाही, त्या मुलाची फक्त ४८ तासांत निवड करायची, हे किती भयंकर आहे. पुरेसे आहेत का हे तास? या वेळात संस्थेपर्यंत पोहोचून मुलाला किती समजून घेणार आम्ही? आम्हाला मूल पसंत पडलं तरी त्याच्या भावविश्वाचं काय? चिमुकल्याच्या स्पर्शासाठी, सहवासासाठी आसुसलेले आम्ही आणि आई-बाबांच्या प्रेमळ स्पर्शाच्या प्रतीक्षेत असलेलं हे मूल असे या प्रक्रियेचे दोन महत्त्वाचे घटक. परंतु आता आम्ही निर्णय घ्यायचा तो संस्थेत पोहोचल्यानंतर काही तासांत. या नव्या नियमांमुळे आम्ही पूर्ण गोंधळलो आहोत,’ असं अवनीने नाराजीने सांगितलं.

प्रतीक्षा यादीत असलेल्या अनेक पालकांची अशीच अवस्था झालीय. ज्या मुलात शारीरिक, भावनिक व पर्यायानं आयुष्याची गुंतवणूक करायची आहे, त्याची निवड एवढ्या कमी मुदतीत कशी करायची, हाच प्रश्न अनेकांना सतावतोय. दत्तक प्रक्रियेसंदर्भात शासनानं नवे निर्णय करण्यामागेही अनेक कारणे आहेत. देशात ५० हजार मुलं अनाथ असताना दरवर्षी दत्तक जाण्याचं प्रमाण काही हजारांतच का आहे? अनाथाश्रम, आधारगृहांमार्फत होणाऱ्या दत्तक प्रक्रियेला एवढा विलंब का लागतो? वर्षानुवर्षं पालक वाट पाहतात, अनाथ मुलांच्या संख्येत वाढच होतेय, मग पाणी मुरतंय कुठे? कित्येक संस्था देणगीच्या नावाखाली पालकांकडून लाखो रुपये उकळतात. संस्थांकडे मुले असतानाही सध्या मूल उपलब्ध नाही, म्हणून पालकांना ताटकळत ठेवले जाते. विदेशी पालकांना मूल दत्तक देऊन जास्त पैसे उकळणाऱ्या संस्थांचीही कमी नाही. अशा एक ना अनेक कारणांमुळे दत्तक विधान प्रक्रियेवर कित्येक वर्षांपासून प्रश्नचिन्ह होते. अखेरीस केंद्र सरकारने १ ऑगस्ट २०१५पासून या सर्वांवर पडदा टाकत केंद्रीकृत प्रणाली विकसित करण्याच्या दृष्टीने नव्या मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. यानुसार देशभरातील मूल दत्तक घेऊ इच्छिणारे पालक आणि अनाथ मुलांची एकच यादी तयार केली जाईल. प्रत्येक पालकांची जिल्हा स्तरावरील अधिकृत संस्थेकडून होम स्टडी केली जाईल. यादीनुसार क्रमांक आलेल्या पालकांना सेंट्रल अॅडॉप्शन रिसोर्स इन्फर्मेशन अँड गाइडन्स अर्थात CARINGच्या वेबसाइटवर पर्सनल लॉग इनवर सहा मुलांचे फोटो दाखवले जातील.

अनाथाश्रमांतून मिळालेली या मुलांची जन्मापासूनची आणि इतर वैद्यकीय माहितीही पोर्टलवर दिसेल. पालकाला पुढील ४८ तासांत यापैकी एका मुलाची निवड करायची आहे. निवड केलेले मूल देशातील ज्या अनाथालयात असेल, तेथे जाऊन पालकाने त्याची भेट घ्यायची. यानंतरही ते मूल आवडले नसल्यास संबंधित पालकाचे नाव पुन्हा एकदा यादीतील शेवटच्या क्रमांकावर जाईल. मात्र, एकदा मुलाची निवड केल्यानंतर दत्तक प्रक्रिया केवळ १५ दिवसांत पूर्ण होईल, असे आश्वासन सरकारने दिलेल्या सूचनांमध्ये दिसून येते. एकूणच दत्तक प्रक्रिया लवकरात लवकर होऊन चिमुकल्याच्या स्पर्शासाठी, सहवासासाठी आसुसलेल्या पालकांना लवकर दिलासा मिळेल, असंच वरपांगी चित्र निर्माण झालंय. नव्या गाइडलाइन्समुळे प्रतीक्षेतील पालकांच्याही आशा पल्लवित झाल्या आहेत. पण मूल निवडीसाठीची केवळ काही तासांची ही मुदत पालकांना संभ्रमावस्थेत टाकणारी आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, शासनाच्या हाती काय येणार?
(manjiri.kalwit@dbcorp.in)