आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरज एका संधीची

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एएमसी-सीईटी अर्थात औरंगाबाद महापालिका निवडणुकांसाठी घेतलेली पात्रता परीक्षा. दैनिक दिव्य मराठीच्या वतीने देशात प्रथमच घेतलेल्या या अभिनव उपक्रमातून नगरसेवक बनू इच्छिणार्‍यांची खर्‍या आणि वेगळ्या अर्थाने परीक्षा घेतली गेली. पंचायत राज व्यवस्थेत महिलांना ५० टक्के आरक्षण असल्यामुळे यंदा इच्छुक उमेदवारांमध्ये महिलांचाही आकडा जास्त दिसला.

राजकारण आणि समाजकारण करू इच्छिणार्‍या या उमेदवारांना एकूणच महापालिका आणि प्रशासकीय व्यवस्थेचे किती ज्ञान आहे, यावर आधारित प्रश्नपत्रिका देण्यात आली होती. एकूण १६७ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. राजकारण म्हणजे केवळ नशीब आणि पैसा यांचा खेळ अशी धारणा मोडीत काढत इच्छुक नगरसेवकांनी आपली किती तयारी आहे, हे पाहण्यासाठी उत्साहाने या परीक्षेत सहभाग नोंदवला. या आगळ्यावेगळ्या परीक्षेचा निकालही ७९ टक्के लागला. यात उल्लेखनीय बाब म्हणजे एरवी राजकीय नेता-कार्यकर्ता असलेल्या नवर्‍याच्या वलयात झाकोळल्या गेलेल्या महिलांनीही आपण किती ‘तयार’ आहोत, हे या परीक्षेतून दाखवून दिले.

परीक्षेला आलेल्या काही महिला पूर्ण तयारीनिशी आल्या होत्या, तर कुणी परीक्षा तर देऊन पाहू म्हणून आल्या होत्या. यातील बहुतांश महिलांचे पती राजकीय पार्श्वभूमी असलेले तर बाकीच्या स्वबळावर सज्ज झालेल्या. परीक्षेत ४८ टक्के महिला उत्तीर्ण झाल्या.

महिला सरपंच, नगरसेवक, आमदार म्हणजे बोलविता धनी कुणी दुसराच अशी समजूत आतापर्यंत होती. पण या परीक्षेतून राजकारणात येऊ इच्छिणार्‍या महिलांचे समाजभान आणि ज्ञान समोर आले. यापैकी काही महिला मोठ्या संघर्षानंतर जिद्दीने उभ्या राहिलेल्या आहेत.

४७ वर्षांच्या सविता छापरवाल यांचे पती भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते. पण १८ वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. दोन मुलींसह नुकताच बहराला आलेला संसार एकटेपणाने चालवण्याची वेळ आली. शिवाय मोठ्या मुलीचे दोन्ही पाय अपघातात गमावल्यामुळे तिची काळजी घेताना दीड तप कुठे निघून गेले हे सविताताईंना कळलेच नाही. आता लहान मुलगी बीकॉम करतेय. पण महापालिका निवडणुकीत आईने उभे राहावे ही तिची तळमळ. खचलेल्या मनाला पुन्हा उभारी देत मुलीने सविताताईंची सर्व कागदपत्रे तयार केली.

घरात पूर्ण वेळ वाहून घेतले असले तरी नियमित वृत्तपत्र वाचन असल्यामुळे कोणतीही तयारी न करता सविताताई ‘दिव्य मराठी’च्या परीक्षेस बसल्या. यात त्यांना ५० पैकी ३८ गुण मिळाले. परिसरातील नागरिकांशी सतत संपर्कात असल्यामुळे निवडणुकीत विजयी झाल्यास येथील समस्या सोडवण्याचा पूर्ण आत्मविश्वास सविताताईंना आहे.

इच्छुक उमेदवारांच्या पात्रता परीक्षेत द्वितीय क्रमांकावर असलेल्या सिमरनकौर बिंद्रा हे एक डॅशिंग व्यक्तिमत्त्व. पती भाजप कार्यकर्ते आहेत. अध्यात्म आणि समाजकार्याची आवड असलेल्या सिमरन यांची दिनचर्या पूर्ण वेगळी आहे. सकाळी चार वाजता उठण्यापासून पहाटेच गुरुद्वार्‍यात जाणार्‍या सिमरन यांनी आजवर अनेक असहाय, गरजू महिला व मुलींना मदत केली आहे. त्यांना अनाथालयात प्रवेश मिळवून देईपर्यंत सिमरन यांनी स्वत: त्यांची आईप्रमाणे काळजी घेतली. पत्नीच्या धाडसीपणाचा अनुभव सांगताना श्री. बिंद्रा म्हणतात, एकदा ती सकाळी चार वाजता गुरुद्वार्‍यात जाण्यासाठी निघाली, तेव्हा काही चोर आमच्या बिल्डिंगखालील बँक लुटण्याच्या प्रयत्नात होते. तिने समयसूचकता दाखवत मला उठवले आणि बँकेतील मोठी चोरी टळली.

परीक्षेत पहिल्या आलेल्या वंदना मेठी सांगतात, पती शिवसेनेत २५ वर्षांपासून सक्रिय असल्यामुळे घरी राजकारणाचे वारे आहेच. शिवाय लग्न झाल्यापासून त्यांनी मला बँकेचे व्यवहार, ट्रेन रिझर्व्हेशन आदी सर्व कामे करायला शिकवली. त्यामुळे माझ्यात खूप आत्मविश्वास निर्माण झाला. वॉर्डमधील नागरिकांच्या सतत संपर्कात राहिल्याने येथील समस्यांची सखोल जाणही असल्याचे मेठी सांगतात. विविध बचत गट आणि व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून त्या अनेक महिलांच्या संपर्कात आहेत.

२९ वर्षांच्या सीमा नांदरकर यांचा परीक्षेत तृतीय क्रमांक आला. पतीच्या पाठिंब्यामुळेच आपण राजकारणात उतरत असल्याचे त्यांनी सांगितले. पण परीक्षेत उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्यांनी स्वत:ची चुणूकही दाखवून दिली.

घरातील माणसांना जोडून ठेवणारी, मुलांवर योग्य संस्कार करणारी, प्रसंगी उग्र रूप धारण करून वाईट प्रवृत्तींवर तुटून पडणारी स्त्री आता राजकारणात खर्‍या अर्थाने सक्रिय होण्यासाठी उत्सुक आहे. विशेष म्हणजे त्यासाठी मेहनत घेण्याचीही तिची तयारी आहे. आता पाहायचे हेच की, घराणेशाही आिण इतर मुद्दे बाजूला सारून किती राजकीय पक्ष महिलांना स्वतंत्रपणे काम करण्याची संधी देतात...
मंजिरी काळवीट, औरंगाबाद
manjiri.kalwit@ dbcorp.in