आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjiri Kalwit Article About Bindhast Group, Women Travelers

बिनधास्त पर्यटन पर्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वयाच्या साधारण साठीनंतर कुठेही फिरायला जायचं म्हटलं की, आधी प्रश्न
येतो तो आपली तब्येत धडधाकट राहील की नाही हा. पण हे नाजूक वय ओलांडल्यानंतरही याची पर्वा न करता बिनधास्त फिरणाऱ्या या महिलांकडे पाहिलं की त्यांच्या या उत्साही, खळाळत्या पर्यटनाचा हेवा वाटायला लागतो. जाणून घेऊया या पऱ्यांच्या ‘जिंदादिलीचं’ रहस्य...

सुटी आणि ग्रुपचं नियोजन जमून आल्यावर, (की जमवून आणून?) फिरायला निघालेले पुरुष आपल्या माहितीत अनेक असतात. पण एकत्र येऊन पर्यटनाला निघालेल्या मैत्रिणी विरळाच. ज्या असतात, त्यातही तरुण मुलींचं प्रमाण जास्त असावं. औरंगाबादेत अशा हरहुन्नरी महिलांचा एक ग्रुप आहे, ज्यातील सर्व मैत्रिणी साठीपुढच्या आहेत. दहा वर्षांपूर्वी एका उपक्रमाअंतर्गत निघालेल्या सहलीत या मैत्रिणींची ओळख झाली. आपण सर्व जणी
औरंगाबादेतल्याच आहोत, या कंपनीने नियोजन केले म्हणून अशा सहलीला जाऊ शकतो, मग स्वत: नियोजन करून का नाही फिरायला जाऊ शकत, असा विचार पुढे आला. आणि यातूनच बिनधास्त ग्रुप बनला. सुरुवातीला प्रत्येकीने आपापल्या माहेरच्या गावात सहल काढली. गावाकडचं घर, शेती, हुरडा पार्टी झाली. त्यानंतर अष्टविनायक, कोकण किनारपट्टी अशी राज्यातलीच ठिकाणं झाली. गुजरात, राजस्थान, कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश अशा
राज्याबाहेरील सहलीही काढल्या. या पर्यटन पऱ्या श्रीलंकेलाही जाऊन आल्या. नुकताच त्यांनी भूतानचा फेरफटका मारला आहे.

भूतानच्या सहलीचं वैशिष्ट्य म्हणजे, या प्रवासाचे तिकिटांपासून हॉटेल बुकिंग आणि प्रसिद्ध ठिकाणं पाहण्याचं संपूर्ण नियोजन ग्रुपमधील आजीबाईंनी इंटरनेटवरून स्वत: केलं. कोणत्याही टुरिस्ट कंपनीच्या प्लॅनपेक्षा भूतानमधील चार ठिकाणं जास्तीची पाहून आल्याचं त्या अभिमानानं सांगतात. प्रत्येकसहलीच्या वेळी सावरी देशपांडे ही मैत्रीण कॅशिअरची भूमिका बजावते. सहलीच्या ठिकाणी जेवल्यावर संपूर्ण जेवणाचं बिल देण्याची जबाबदारी वीणा
देशपांडे यांच्यावर. सहलीचा स्पॉट जरी सर्वानुमते ठरत असला तरी विशिष्ट एजंटशी बोलून कोणती ठिकाणं पाहायची, कसं फिरायचं, कुठे राहायचं हा सर्व प्लॅन बनवतात मालिनी लताड आणि शोभा शिंदे. ग्रुपमधील इतर सर्वजणींवरही महत्त्वाची जबाबदारी सोपवलेली असते. या सर्वांवर करडी नजर असते ती, ७५ वर्षांच्या माधुरी सपकाळ अर्थात ‘ताईमाँ’ची! यांना ताईमाँ का म्हटलंय, असं तुम्हाला वाटेल. पण पर्यटन म्हटलं की मजा, मस्ती, धिंगाणा आला आणि
माधुरीताईंचं पडलेलं नाव हे त्यातलाच एक भाग. ग्रुपमधल्या मैत्रिणींची अशी नावं पाहायला गेलं, तर इथे माला सिन्हा, रेखा, सीता और गीता आणि नूतनही भेटेल. प्रत्येक सहलीचा एक ड्रेसकोड ठरलेला असतो. यानुसार जीन्स-टीशर्ट, कुर्ता-पायजमा, शॉर्ट‌्स, रॅपअराउंड, घागरा, केप्रीही या सगळ्यांनी ट्राय केली आहे. बिनधास्त ग्रुपमधल्या मैत्रिणींची वयं पाहता, सहलीला गेल्यावर यांच्या औषधांचं आणि पथ्यपाण्याचं काय होत असेल, हा विचार येतो. पण प्रत्येकाने
आपली औषधं आणि पथ्याची काळजी घ्यायची, असा कडक नियम. शिवाय सहलीच्या आनंदावर विरजण पडणार नाही, इतपत प्रत्येक जण आपली आणि आपल्या मैत्रिणींची काळजी घेतात. गेल्या दहा वर्षांपासून सुरू असलेल्या या बिनधास्त पर्यटनाचा परिणाम म्हणजे, प्रत्येकीची प्रकृती एकदम ठणठणीत.
यातील काही जणींनी गेल्या पाचेक वर्षांत डॉक्टरच्या क्लिनिकची पायरीही चढलेली नाही.
विविध सहलींचा अनुभव सांगताना वीणाताई म्हणतात, एरवी घरात किंवा आपल्या गावात असताना आपण एवढ्या मोकळेपणाने धम्माल करू शकत नाहीत. पण अनोळखी ठिकाणी आम्ही खूप हैदोस घालतो. प्रवासात गप्पा, गाणी, नकला, डान्स करतो. एकदा हॉटेलमध्ये जेवण तयार होण्यासाठी खूप वेळ होता, तर आम्ही तिथल्या खुर्च्या एका रांगेत मांडल्या आणि तिथेच संगीत खुर्ची सुरू केली. लंगडी, कबड्डी, धप्पाकुट्टी सगळे खेळ आम्ही मैत्रिणी खेळतो.
भूतानच्या सहलीत तर एका सरदारजीच्या जोडप्यासोबत आम्ही खूप धम्माल केली. जिथे जिथे बर्फवृष्टी होत होती, तिथे उतरून आम्ही डान्स केला. एवढ्या बर्फात जाऊ नका, म्हणून ड्रायव्हर सारख्या सूचना देत होता. पण आम्ही त्याचं ऐकलं नाही. असा उत्साही ग्रुप आजवर पाहिला नाही, तुम्हाला कधीच विसरू शकणार नाही, हेच त्या ड्रायव्हरचे शब्द होते. कोकण ट्रिपमध्ये तर चिक्कार पाऊस पडत होता. आम्ही भिजत होतो, वाळत होतो. पण पाच दिवसांच्या ट्रिपनंतरही सगळ्या जणी ठणठणीत होतो.

सहलीवर नसतानाही या मैत्रिणी एकत्र येतात. गप्पा मारतात, वाढदिवस साजरे करतात. दिवाळीच्या सुटीत एक दिवस खास फराळ आणि फटाक्यांचा असतो. सगळ्या जणी व्हॉट्सअॅप, फेसबुकवर आहेत. सहलीतील वातावरण माणसं, ठिकाणं, या सगळ्यांचे अनुभव, टिप्पण्या त्यांच्या फेसबुक पेजवर पाहायला मिळतात. एवढं भरभरून आयुष्य जगणाऱ्या या पर्यटन पऱ्यांकडे पाहून आपल्यालाही यांच्यासारखं फिरता यावं, असं वाटलं ना? त्यात अशक्य काहीच नाही. योग्य नियोजन आणि भटकण्याची तीव्र इच्छा असेल तर आपणही हा आनंद लुटू शकतोच की!
manjiri.kalwit@dbcorp.in