आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjiri Kalwit Article About Dr. Sanjeevani Tadegavakar's Souvenir 'Maninee'

स्‍त्री लेखणीचा प्रवास : मानिनी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
साधे-साजिरे रूप, डोळ्यात दृढ आत्मविश्वास अन् साहित्यरूपी ज्ञानाची प्रज्वलित ज्योत घेऊन निघालेली ‘नववधू’ ही ६ व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनातील स्मरणिकेची लक्षवेधी खूण. स्त्रीची सुरक्षितता, अभिव्यक्तीवर चहुबाजूंनी हल्ले होत असताना नुकतीच लावलेली ज्योत आपल्या हाताने सुरक्षित ठेवू पाहणाऱ्या या ‘मानिनी’तून मराठवाड्यातील लेखिकांची सद्य:स्थिती अत्यंत समर्पकपणे वाचकांसमोर उभी राहते. आद्य मराठी कवयित्रींची कविता, मराठवाड्यातील कवयित्रींच्या कवितेतील स्त्रीवाद, कादंबरी विश्व, कवितांतील स्त्री जाणिवांचा आविष्कार, महिला आंदोलनकार यासह स्त्री लेखिकांसमोरील आव्हाने या मुद्द्यांचा लेखाजोखा या स्मरणिकेतून मांडण्यात आला आहे. प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी आद्य कवयित्री महदंबेचा जीवन व साहित्यपट आपल्या लेखातून उत्तम उलगडला आहे.

मराठी कवयित्रींच्या कवितेचा प्रवास महदंबेच्या ‘धवळ्यां’पासून सुरू होतो, तर आजच्या स्त्रीवादी कवितेची प्राथमिक बीजंही तेथेच रोवण्यात आल्याचे लेखात वर्णन केले आहे. ६० च्या दशकानंतरचा स्त्रीवाद डॉ. समिता जाधव यांच्या लेखातून सविस्तरपणे मांडला गेला आहे. स्त्रीवाद म्हणजे पुरुषांना विरोध, कुटुंब संस्था धोक्यात आली, स्त्रीमुक्तीवादी स्त्री म्हणजे वाईट चालीची, असे गैरसमज आजही समाजात आढळून येतात, असे मत त्यांनी मांडले. स्त्रीवादाच्या संकल्पनेत बसू शकणारे लिखाण मराठवाड्यातून अभावानेच उमटल्याचा निष्कर्ष त्यांनी लेखाअंती समोर ठेवला.

मराठवाड्यातील कादंबरी विश्व उलगडताना चंद्रज्योती मुळे यांनी अनुराधा वैद्य, रेखा बैजल, शांता जोशी, मथू सावंत, छाया महाजन, कविता महाजन यांच्या कादंबऱ्यांवर नेमके भाष्य केले आहे. या कादंबऱ्यांचा थोडक्यात आढावा घेतला आहे.

मराठवाड्यातील कवयित्रींच्या कवितेतील ‘स्त्री’ जाणिवांना आविष्कार चितारताना प्रा. डॉ. मीनाक्षी देव यांनी सुहासिनी इर्लेकर, शैला लोहिया, अनुराधा पाटील, ललिता गादगे, डॉ. ऊर्मिला चाकूरकर, डॉ. वृषाली किन्हाळकर, डॉ. संध्या कांकरिया, डॉ. मंगला वैष्णव आदी कवयित्रींच्या कवितेतील विषय वाचकांसमोर उलगडले आहेत. वसुधा देव यांनी संमेलनाध्यक्षा छाया महाजन यांच्या विविध ललित लेखांची माहिती जागृत रसिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपल्या लेखातून केला आहे. नवोदित महिला साहित्यिकांसाठी मराठवाड्यातील लेखिकांचे भावविश्व सहज उलगडून दाखवत मानिनीने साहित्य संमेलनाच्या निमित्ताने लेखिकांसमोरील पुढील आव्हानांचाही मागोवा घेतला आहे. एकूणच, मराठवाड्याच्या साहित्यविश्वाचे वास्तव, साहित्यशृंगार, आव्हाने, अपेक्षांना सर्वांगांनी स्पर्श करणारी संपादिका डॉ. संजीवनी तडेगावकरांची ‘मानिनी’ ही खऱ्या अर्थाने स्मरणिका ठरावी अशीच आहे.