फेसबुकवर फेरफटका मारताना एक प्रसंग वाचला. एका बाईने लिहिलेला. ‘मेक्सिकोत टॅक्सीत बसलेली असताना ड्रायव्हरच्या फोनची रिंग वाजली. बहुधा घरूनच फोन असावा. दोन- तीन वाक्यांत बोलणं झालं. पण फोन ठेवताना त्याचे डोळे पाण्याने थबथबले होते. चेह-यावर हसू उमटलं होतं. ते पाहून याच्याकडे नक्की काही तरी आनंदाची बातमी असणार म्हणून चौकशी केली. ड्रायव्हर म्हणाला, माझ्या मुलीला पहिले पिरियड्स आलेत. आज ती मोठी झाली. ‘आता तुम्ही काय करणार?’ ड्रायव्हरचे उत्तर होते, ‘मी माझ्या लेकीसाठी भरपूर गुलाबाची फुलं घेऊन जाणार...’
खरंच
आपल्याकडेही मुलगी वयात आल्यावर तिचं एवढ्या भावुक, मनमोकळ्या आणि सकारात्मक पद्धतीने स्वागत झालं तर? अस्वस्थ व्हायला लागलं. आपल्याकडे पहिल्यांदाच पाळी आलेल्या मुलीसाठी तो एकतर अपघात असतो किंवा त्याबद्दल माहिती असली तरी पाळी आल्यावर त्याची फारशी वाच्यता केली जात नाही. आई एक वेळ मायेने जवळ घेते, पण बाबा मात्र आजपासून मुलगी मोठी झाली म्हणून तिच्यापासून दूर राहू लागतात. अचानक घरात शांततामय वातावरण तयार होतं.
अगदी कालपरवाचा प्रसंग. ग्रामीण भागात शिक्षिका असलेल्या मैत्रिणीची नऊ वर्षांची मुलगी रेशम नुकतीच वयात आल्याचं कळलं. भेटायला जाणं जमलं नाही, पण आठवडाभरानंतर मैत्रिणीला कॉल केला. रेशमच्या तब्येतीची चौकशी केली. तेव्हा मैत्रीण बोलती झाली, ‘या उन्हाळ्याच्या सुट्यात मी रेशमला सगळं काही सांगणार होते, पण ती एवढ्या लवकर वयात येईल, असं वाटलंच नव्हतं. पहिल्या दिवशी शीतून रक्त पडतंय, म्हणून तिने कुणाला सांगितलंच नाही. शाळेत गेली. पण तिथेही रक्त पडेल म्हणून दिवसभर टॉयलेटला गेली नाही. घरी आल्यावरही टॉयलेटला न जाता सरळ वरच्या मजल्यावरच्या रूममध्ये जाऊन बसली. रात्र झाली तरी रेशम जेवायलाही खाली का येत नाही म्हणून मी आवाज दिला. तर रडक्या स्वरात ती म्हणाली, आई, तूच वर ये. मी वर गेले तरी माझ्याशी काही बोलायलाच तयार नव्हती. खूप वेळाने शीतून रक्त पडण्याचे सांगितले. तेव्हा तिचे सगळे कपडे भरले होते. मी तिची सर्व भीती दूर करत आधी तिला सॅनिटरी नॅपकीन दिला.’ त्यानंतरची कथा तर आणखीच करुणाजनक. हा प्रकार कळल्यानंतर आजीने आधी रेशमला बाजूला बसण्यास सांगितले. तब्बल अर्धा तास मायलेकी एकमेकीत अंतर ठेवून हमसून हमसून रडत होत्या. अखेर मैत्रिणीने आजीसमोर हात जोडून विनंती केली, केवळ आजच्या दिवशी मला रेशमजवळ झोपू द्या. उद्या सकाळी डोक्यावरून अंघोळ करीन.
मायलेकीच्या नात्यातील एवढा नाजूक प्रसंग, जुन्या विचारांना घट्ट चिकटून बसलेली आजी, शिक्षणामुळे गळून पडलेले प्रथांचे पिसारे आणि वडीलधा-या सासूचा हट्ट यात ताळमेळ साधताना मैत्रिणीची होणारी कसरत, कुचंबणा हे सगळं विचारांच्या पलीकडचं होतं. लग्न झाल्यापासून सासूचे या प्रकारचे हट्ट ६० टक्क्यांनी कमी झाल्याचे ती सांगत होती. पण या पिढीकडून शंभर टक्के बदलाची अपेक्षा करताच येणार नाही, अशीच परिस्थिती आज बहुतांश घरांमध्ये दिसून येते. पुढचे दोन दिवस रेशम शाळेत गेली नाही. कारण शाळेत सर्व मुलींसाठी एकच टॉयलेट. चार-पाच जणी एकदाच टॉयलेटला जातात. त्यामुळे आपल्याला पॅड नीट सांभाळता येईल, नाही, इतर मैत्रिणींनी हे पाहिलं तर त्या काय काय प्रश्न विचारतील, या सर्व विचारानंतर रेशमने सुटी मारली.
देशातील सहावीनंतरच्या मुलींच्या शिक्षणातील गळतीचे मुख्य कारण हेच आहे. युनिसेफच्या एका सर्वेक्षणानुसार मासिक पाळीदरम्यान ६० ते ७० टक्के मुली शाळेत येत नाहीत. मुलींसाठी स्वच्छ शौचालये, पाणी, हात धुण्यासाठी साबण, वापरलेले नॅपकिन्स फेकण्यासाठी डस्टबिन अशा सुविधायुक्त शाळा क्वचितच सापडतील.
हेच चित्र बदलण्यासाठी राज्य सरकारने युनिसेफच्या मदतीने शुद्ध जल व आरोग्य (WASH) उपक्रमांतर्गत मराठवाड्यातील उस्मनाबाद आणि जालना जिल्ह्यातील शाळांमध्ये जागृती अभियान उघडले आहे. जालना जिल्ह्यातील १२०९ आणि उस्मानाबादेतील १०८९ शाळांमध्ये सहावी ते दहावीतील मुलींसाठी हा मेनस्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट अर्थात एमएचएम उपक्रम राबवला जात आहे. जिल्हा, तालुका तसेच गावपातळीवर शिक्षिका, सुगमकर्ती, अंगणवाडी ताई, आशा कार्यकर्त्या तसेच काही मुलींनाही या उपक्रमात सहभागी करून घेण्यात आले आहे. पाळी येणे ही एक सामान्य शरीर प्रक्रिया आहे, हे मुलींपर्यंत पोहोचवण्याचे तसेच याची मुलींनी कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, हे समजावून सांगितले जात आहे. मुलींना नव्यानंच उलगडलेल्या या विषयाबाबत प्रचंड कुतूहल असून शिक्षकांमार्फत मुलींच्या प्रत्येक प्रश्नांना शास्त्रशुद्ध उत्तरे दिली जात आहेत. शाळा सुरू झाल्यावर तीन महिने आणि दिवाळीच्या सुटीनंतर तीन महिने असे विशेष वर्गही कुमारवयीन मुलींसाठी घेतले जाणार आहेत. या विषयाची पुरेशी कल्पनाही नसलेल्या मुलींना अचानक रक्तस्राव सुरू झाल्यावर आपल्याला खूप मोठा आजार झाल्यासारखे वाटणे किंवा प्रचंड भीती वाटणे, असे प्रकार होतात. असे अनुभव आलेल्या मुलींसाठी हा एक अपघातच असतो. कुमारवयात पदार्पण करताना शरीरात होणा-या बदलाची कल्पना लहानपणापासूनच मुलींना तसेच मुलांना करून देणे, हे पालकांचे कर्तव्य आहे. मुलांच्या शिक्षणासाठी वाट्टेल तेवढा पैसा खर्च करण्याची तयारी असलेल्या पालकांनी मुलांना स्वत:च्या शरीरविषयक ज्ञानापासून वंचित ठेवता कामा नये. पण दुर्दैवाने आपल्याकडे याउलट चित्र दिसते.
खरं तर पाळी येणं म्हणजे आपल्या घरातील लाडक्या लेकीचं स्त्रीमध्ये रूपांतर होणं. निसर्ग अर्थात ऋतू प्राप्त झालेली ही ऋतुमती ख-या अर्थाने निर्मितीसाठी सिद्ध होतेय, हा केवढा आनंदाचा अन् भावुक क्षण असतो. किंबहुना प्रत्येक आई-बाबांसाठी तो एक उत्सव असायला हवा. एखादी स्त्री गर्भार राहिल्यावर तिचं किती कोडकौतुक केलं जातं, मग नवनिर्मितीच्या क्षमतेसाठी आवश्यक असलेली पाळी सुरू होताच या विषयावर एवढं मौन का बाळगलं जातं? हल्ली शिक्षणामुळे ‘विटाळशी’ने बाजूला बसण्याचं प्रमाण कमी झालं असलं तरी आजही अनेक घरांमध्ये हा प्रकार दिसून येतो. विशेष म्हणजे सुशिक्षित महिलाही या प्रकरणी शास्त्रीय कारण माहिती असूनही दैवी कोपाच्या भीतीपायी बाजूला बसतात. घरातील वडीलधा-यांसमोर वाद घालायचा नाही, या नियमामुळेही अनेक मुली या प्रथा पाळतात. पण कोणत्याही प्रकारचा वाद न घालता अतिशय मोकळेपणाने सकारात्मक चर्चा करून आपण या विषयाच्या अनुषंगाने आलेल्या प्रथा बाजूला सारत आपल्या शरीरातील या ऋतुचक्राला अधिक वैज्ञानिक पद्धतीने अभ्यासू शकतो. या दिवसात होणारी चिडचिड, उदासीनता किंवा भावनांचे चढ-उतार कसे संतुलित करायचे, याबाबत पूर्ण माहिती देण्यासाठी एखाद्या डॉक्टरांकडून समुपदेशनही करून घेता येते. पण या सगळ्यांसाठी पाळी हा बोलण्यासाठी, विचार करण्यासाठी निषिद्ध मानला जाणारा विषयच नाही, तर ही केवळ मलींच्या शरीरातील एक क्रिया आहे, हे पटणे आणि पटवून सांगणे आवश्यक आहे.