आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकट्या द्यूतीची

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जणू सर्व जगानेच तिच्या विरोधात कट रचला होता. तिच्या स्वप्नांना सुरुंग लावले होते. तिचे विश्वभरारी घेऊ पाहणारे पंख छाटले होते. अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या एका आदेशाने तिच्या असण्यालाच आव्हान दिले होते. तो आदेश होता-तिची लिंग चाचणी करण्याचा. म्हणजे, ती स्त्री आहे की पुरुष, याचा छडा लावण्याचा. कारण, तिचा चेहरा पुरुषी दिसतो. तिच्या हातापायांचे स्नायू पुरुषांप्रमाणे पीळदार दिसतात. तिच्या वागण्यात-बोलण्यात आणि मुख्य म्हणजे धावण्यात पुरुषी रांगडेपण जाण‌वते, असे तिच्याविरुद्ध कट रचलेल्या या जगाचे आरोप होते. संशयी नजरांमधल्या विखाराची धग तिला अस्वस्थ करत होती. मानसिकदृष्ट्या खचवून टाकत होती. पण, तरीही ओरिसातल्या चाका गोपालपूर नावाच्या खेड्यातली एका विणकराच्या पोटी जन्माला आलेली ती सगळा धीर एकवटून एकटीच दिल्लीत दाखल झाली होती. फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी राष्ट्रकुल पात्रतेसाठी तिला ज्या क्लिनिकमध्ये आणले होते, तिथे रक्त, लघवी आणि काही अल्ट्रासाऊंड पद्धतीची पहिली तपासणी करण्यासाठी एकही महिला नर्स वा टेक्निशियन हजर नव्हती. पण त्या परिस्थितीला ती धीराने सामोरी गेली. पण तीनच दिवसांनी फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा विभागाला पत्र लिहिलं- ‘धावपटू द्युती चंदच्या लिंगाबाबत शंका आहे, त्यामुळे तिची लिंग पडताळणी चाचणी करावी लागेल.’ या पत्रामुळे पुन्हा एकदा तिचे मानसिक खच्चीकरण झालेे.

आंतरराष्ट्रीय अॅथलेटिक असोसिएशनच्या नियमानुसार, शरीरातील टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण मोजण्यासाठी योनी, योनीमार्ग आणि त्यासंबंधीच्या अवयवांची स्पर्शाद्वारे तपासणी केली जाणार होती. एवढंच नाही तर स्तनांचा आकार आणि जांघेतील केसांचे प्रमाणही मोजले जाणार होते. मात्र बंगळुरूमध्येही महिला डॉक्टर-टेक्निशियन असूनही दिल्लीच्याच अनुभवाची पुनरावृत्ती झाली. अत्यंत तुसडेपणाची वागणूक देत तिच्या रक्ताचे नमुने घेतले गेले. क्रोमोझोम तपासणी, एमआरआय आणि स्त्रीत्व सिद्ध करू पाहणाऱ्या अत्यंत क्लेशदायी तपासण्याही झाल्या. एकाच वेळी मानहानी, उपेक्षा आणि अपमान ती मुकाट्याने सहन करत राहिली...

जून २०१४मध्ये ग्लासगोमधील राष्ट्रकुल स्पर्धा तोंडावर असताना तिच्या शरीरात टेस्टोस्टेरॉन हार्मोनचे प्रमाण सामान्य महिलांपेक्षा जास्त आढळल्याने तिला या स्पर्धांसाठी अपात्र ठरवण्यात आले. याच महिन्यात तैवानमधील आशियाई ज्युनियर अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने २०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत आणि ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब केले होते. मात्र राष्ट्रकुलच्या काही दिवस आधीच ही घोषणा झाल्यामुळे द्युतीला मोठाच धक्का बसला. आंतरराष्ट्रीय असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशनने (आयएएएफ) तिला कोणत्याही धावपट्टीवर खेळण्यास मज्जाव केला. तिच्या वैद्यकीय चाचणीचे फर्मान सोडले. म्हणजे ज्यांनी तिचा सांभाळ‌ करायचा, समजून घ्यायचे, त्यांनीच तिला नकार दिला.

अर्थात, काही दिवसांतच चाचण्यांचा अहवाल आला. द्युतीच्या शरीरात पुरुषी हार्मोनचे प्रमाण जास्त असल्याचे सिद्ध झाले. सामान्य महिलांच्या शरीरात प्रति लिटर रक्तानुसार १.० ते ३.३ नॅनोमोल्स एवढे टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण असते. म्हणजेच, पुरुषांच्या तुलनेत एक दशमांश. द्युतीच्या शरीरात हे प्रमाण नेमके किती होते, हे सार्वजनिकरीत्या जाहीर झाले नाही, हेच काय ते नशीब. पण आयएएएफच्या नियमानुसार, महिला खेळाडूंसाठी हे प्रमाण १० नॅनोमोल्स एवढे असावे. ही पातळी त्यापुढे गेल्यास त्या खेळाडूची क्षमता पुरुषासमान असते. पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण अधिक असल्यास किंवा काही अवयवांची अनियमित वाढ दिसून आल्यास अशा व्यक्तींबाबत इंटरसेक्स (दोन्ही लैंगिक अवयव एकाच व्यक्तीत आढळणे) अथवा डीएसडी म्हणजे लैंगिक अवयवांची अनियमित वाढ असे निदान केले जाते.
एरवी, दर दहा महिलांपैकी एका महिलेच्या शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण अधिक आढळते. समाजातील इंटरसेक्स व्यक्तींचे प्रमाण दर ६० व्यक्तींनंतर एक ते पाच हजार व्यक्तींपरत्वे एक असे बदलत जाते. मात्र हार्मोन्सचे प्रमाण, लैंगिक अवयवांची वाढ यांत आढळणाऱ्या वैविध्यानुसार, नेमक्या कोणत्या बाबींवरून इंटरसेक्स व्यक्तींचे निदान करायचे, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. इकडे धावण्यावर बंदी येईपर्यंत द्युतीला टेस्टोस्टेरॉन अथवा इंटरसेक्स म्हणजे नेमके काय, याची माहितीच नव्हती. पण जेव्हा तिला या संकल्पनांचे ज्ञान झाले, ती खचली. आयएएएफचा निकाल आल्यानंतर मीडियामधून फोन सुरू झाले. तुमची अँड्रोजेन टेस्ट, जेंडर टेस्ट करण्यात आली होती का? महिला खेळाडूंच्या खोलीत सगळ्यांसोबत मोकळेपणाने वावरणेही तिला अवघड भासू लागले. आपण कोणतीही चूक केलेली नसताना हे का सोसायचे, भोगायचे? या प्रश्नाचे उत्तर मात्र तिला कुणी दिले नाही.

वयाच्या चौथ्या वर्षापासून धावण्याचा सराव करणारी द्युती चंद ही सात भावंडांपैकी एक. बहीण सरस्वती हीदेखील गुणी धावपटू. कालांतराने सरस्वती पोलिस दलात रुजू झाली. मात्र अॅथलिट म्हणूनच करिअर करावे, यावर द्युती ठाम राहिली. त्यासाठी आईवडिलांचाही रोष तिने पत्करला. खेड्यात सराव करत मोठे होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या द्युतीने २०१४पर्यंत एकाही स्पर्धेत हार पत्करली नाही. मात्र माध्यमांमधून पुरुष असल्याच्या बातम्या झळकू लागल्या, तशी द्युतीच्या नव्या संघर्षाला सुरुवात झाली. मात्र क्रीडातज्ज्ञ, संशोधक पायोष्नी मित्रा द्युती चंदच्या पाठीशी उभे राहिले. आयएएएफच्या या निर्णयाविरोधात स्वित्झर्लंडमधील हायपर अँड्रोजेनिझम कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन ऑफ स्पोर्ट‌्ससमोर आव्हान देण्यात आले. या आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादाने तिला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही स्तरावरील स्पर्धांमध्ये खेळण्यास परवानगी दिली. ज्या महिला अॅथलिट्समध्ये पुरुषी हार्मोन्सचे प्रमाण जास्त आहे, त्यांना खेळादरम्यान अतिरिक्त फायदा कसा होतो, त्याचे प्रमाण काय, हे लवादासमोर सिद्ध करण्यास आयएएएफला अपयश आले. २७ जुलै २०१५ रोजी लवादाने द्युतीच्या बाजूने निर्णय दिला. क्रीडा लवादाच्या अखेरच्या निर्णयानुसार, द्युती चंद आणि आयएएएफ या दोन्ही पक्षांची या निर्णयावर सहमती झाली की, उत्तेजक द्रव्य सेवनाने वाढलेली टेस्टोस्टेरॉनची पातळी ही महिला किंवा पुरुष अॅथलिटना उंच उडी किंवा अधिक वेगाने धावण्यास मदत करते. मात्र शरीरात जात्याच असलेले टेस्टोस्टेरॉन अशी भूमिका बजावते का, याबाबतचे ठोस उत्तर अद्याप मिळालेलेेे नाही. कॅनडातील कायदेतज्ज्ञ प्रो बोनो यांनी द्युतीचा खटला नि:शुल्क लढवला. त्यामुळे ही लढाई एका पातळीवर तिची एकटीची न राहता तिच्यासारख्या अनेकींची होऊन गेली. या खटल्याच्या निकालाने तिच्यातली बंडखोर मुलगी उसळून उठली. खेळेन तर देशासाठी. देशाने खेळू दिले तर झोकून देईन स्वत:ला, पण देशानेच खेळण्याचा अधिकार पुन्हा नाकारला तर धावणेच सोडून देईन... असा मनोमन इरादा तिने जाहीर केला.

रिओ ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या १०० मीटर धावण्याच्या शर्यतीत द्युती चंदने भारताचे प्रतिनिधित्व केले. मात्र हे अंतर कापण्यासाठी ११.६९ सेकंद लागल्याने पात्रता फेरीतच ती बाद झाली. अर्थात, पी. टी. उषानंतर तब्बल तीन दशकांनी एका भारतीय धावपटूने ऑलिम्पिकमध्ये आपला सहभाग नोंदवला, कुणी तरी तिला ‘राइझिंग स्टार’ म्हटले, पण त्याकडे मीडियाने फारसे लक्ष दिले नाही. शर्यत संपली. पाठोपाठ अवघे २० वर्षे वय असलेल्या द्युती चंदवरचा क्षणिक प्रकाशझोत इतरत्र वळला. द्युती पुन्हा एकटी उरली, जशी ती रिओ ऑलिम्पिकला जाताना दिसली होती. एकटीच. एअरपोर्टवरही आणि विमानातही. पदाधिकाऱ्यांची सोबत नाही की, कुणाच्या शुभेच्छांचा वर्षाव नाही...
मंजिरी काळवीट
manjiri.kalwit@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...