आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बच्चनजी, मर्द क्या होते है?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्वच्छ भारत अभियानाचे ब्रँड अॅम्बॅसॅडर अमिताभ बच्चन यांची एक नवी जाहिरात टीव्हीवर प्रदर्शित होत आहे. एक लहानगा मुलगा बच्चन यांना म्हणतो, ‘बच्चनजी, मैने आप की मर्द फिल्म देखी। मर्द वो ही होता है नं, जो गुंडे को पटक पटक कर मारता है?’ यावर अमिताभ बच्चन म्हणतात, ‘नहीं बेटे, मर्द वो होता है, जो परिवार की सुरक्षा करता है।’ इतक्यात एक तिसरा माणूस उघड्यावर शौच करण्यासाठी जाताना दिसतो, तेव्हा बच्चनजी आणि तो मुलगा त्या माणसाची ‘अशा’ मर्दानगीवरून खिल्ली उडवतात आणि तुम्ही खरे मर्द असाल तर अशा प्रकारे स्वत:ची आणि कुटुंबाची सुरक्षा धोक्यात न घालता घरात शौचालय बांधून घ्या, असा सल्ला देतात. ही जाहिरात पाहून कित्येक वर्षे मागे गेल्यासारखे वाटले. अजूनही आपण घरातील मर्दाला किती संकुचित व्याख्येत बसवले आहे. कुटुंबातील सदस्यांचे रक्षण करणे, ही मर्दाची जुनाट भूमिका शेकडो वर्षांपूर्वीची. बरं हा मर्द कुणाला संरक्षण देणार? तर घरातील बायको, आई, बहीण आणि लहानग्या मुलांना. लहान मुलांना काही वर्षं संरक्षण देण्याची गरज असतेच. त्यामुळे ते वगळूयात. पण आज पुुुरुषांच्या खांद्याला खांदा लावून अर्थार्जन करणाऱ्या महिलांना खरंच अशा प्रकारच्या संरक्षणासाठी घरातील मर्दाची गरज आहे का? आज किती महिलांना घरातील मर्दाकडून शंभर टक्के संरक्षण मिळते? घराबाहेर होणाऱ्या लैंगिक अत्याचारापेक्षा घरातील पुरुषांकडूनच होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण कित्येक पटींनी जास्त असते, हे दरवर्षीच्या आकडेवारीवरून ठळकपणे दिसते.

आपल्या शिक्षणाचा, बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा, मेहनतीचा यथोचित वापर करून स्वत:च्या पायावर उभी राहणारी प्रत्येक महिला घराबाहेर पाऊल टाकते, ती स्वत:च्या जबाबदारीवर. यासाठी कित्येक महिलांना घरातील पुरुषी वृत्तीशी संघर्ष करतच आपले पाऊल मोकळे करून घ्यावे लागते. तेव्हा आता घरातील आणि घराबाहेरील पुरुषांशी/पुरुषी वृत्तीशी कधी ना कधी सामना करावा लागणारच, हे वास्तव स्वीकारणाऱ्या अनेक जणी स्वसंरक्षणाचे धडेही गिरवत आहेत. लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिलाही पुन्हा खंबीरतेने उभे राहून अनेकींना अशा प्रसंगांना कसे सामोरे जायचे, याबद्दल मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे महिलांचे संरक्षण केवळ घरातील पुरुषच करू शकतात, ही खुळचट कल्पना आहे. आणि तुम्ही अजून त्याच कल्पनेला चिकटून असाल तर तुम्हीही कित्येक वर्षे मागे आहात, हे लक्षात घ्यायला पाहिजे. स्त्रीवादी लेखिका आणि सामाजिक कार्यकर्त्या वंदना खरे म्हणतात, शौचालय बांधणं हे काम पुरुषांचं आहे, ही जाहिरातीची मूळ संकल्पनाच चुकीची आहे. घरातील शौचालय हा महिलांच्या सन्मानाचा आणि सुरक्षेचा प्रश्न आहे. उघड्यावरील शौचामुळे कित्येक महिलांना जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते, यासाठी महिलाच सध्या पुढाकार घेत आहेत. ‘महाराष्ट्रातील लातूर, जालना, बीड, हिंगोली, बुलडाणा जिल्ह्यातील काही महिलांनी घरात शौचालय बांधून घेण्यासाठी कसा पुढाकार घेतला, कशी तडजोड केली, याच्या बातम्या माध्यमांमध्ये येत असतात. मी स्वत: अशा महिलांना भेटले आहे. कुणी आपली नथ, मंगळसूत्र गहाण ठेवते, तर कुणी दिवाळीत कपडे नको शौचालय बांधून द्या, अशी मागणी करते. ग्रामीण भागातील तरुणी तर लग्नासाठी स्थळ येताच आधी शौचालय आहे की नाही, याची विचारपूस करतात,’ असं त्या म्हणतात. केवळ घरातील पुरुषच शौचालय बांधू शकतो, ही धारणा खूप उथळ आणि पुरुषप्रधान विचारांतून आली आहे. त्यामुळे शौचालयाचा मुद्दा पुरुषांशी, पौरुषत्वाशी न जोडता तो महिलांशी जोडायला हवा. महिलांच्या सन्मानाशी जोडायला हवा, असं मत त्यांनी मांडलं.

पॉप्युलेशन फर्स्ट या लिंगभाव समतेवर काम करणाऱ्या संस्थेच्या अध्यक्षा ए. एल. शारदा म्हणतात, ‘लिंगभेद कमी करण्यासाठी आपण थेट पितृसत्ताक पद्धतीलाच का नाही आव्हान देत? पुरुष, पौरुषत्व आणि स्त्री, स्त्रीत्वाच्या तोडक्या- मोडक्या व्याख्येतच का खेळत बसतो? जाहिरातीत अशा प्रकारची व्याख्या केल्यामुळे समस्त पुरुषवर्गाला पुन्हा एकदा रक्षणकर्त्याच्या भूमिकेत बसवण्यात आले आहे. घरातील सदस्यांसाठी शौचालय बांधून दिले की आपण मर्द अाहोत, हे सिद्ध करण्याचा किती लाजिरवाणा प्रयत्न आहे हा.

कुमारवयीन मुलांमध्ये मर्दानगी या संकल्पनेबद्दल जागरुकता निर्माण करण्याचे काम मुंबईस्थित मावा (मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अब्यूज) संघटना करते. संघटनेचे अध्यक्ष हरीश सदानी म्हणतात, ‘अजूनही समाजात पुरुषाला स्त्रीचा रक्षणकर्ता म्हणून पाहिले जाते. रक्षणही फक्त तिच्या शरीराचे. स्त्रियांना मन आणि मत यांच्या रक्षणाची अपेक्षा आहे. स्त्रियांच्या हक्कांचे रक्षण करणे ही पुरुषांची मुख्य जबाबदारी आहे. स्त्रियांना समानता हवी आहे. केवळ एक स्त्री आहे म्हणून सहानुभूती दर्शवण्यापेक्षा तिचे मन समजून घेणे आवश्यक आहे. कामाच्या ठिकाणी पुरुषांप्रमाणे समान अधिकार देण्याची अपेक्षा आहे.’

मध्यंतरी एका मैत्रिणीने एका मोठ्या दैनिकाची जाहिरातही किती पुरुषकेंद्री आहे, हे दाखवून दिले होते. माझ्या घरातील बाबा, दादा संबंधित वृत्तपत्र वाचतात आणि म्हणून त्यांना सध्याच्या राजकीय, आर्थिक, सामाजिक विषयातील सर्व प्रश्नांची उत्तरे येतात, अशा आशयाची ती जाहिरात होती. मात्र या संपूर्ण जाहिरातीत कुठेही माझी आई, बहीण वर्तमानपत्र वाचतात, असा उल्लेख नव्हता. संहितालेखकाच्या हे ध्यानात आले नाही, कारण पुरुषकेंद्री विचार आपल्या समाजात प्रचंड खोलवर रुजलेले आहेत.

जाहिरात ही अन्य माध्यमांप्रमाणेच वाचक, प्रेक्षकांच्या मनात शिरणारे माध्यम असते. ती पाहून एखाद्या उत्पादनाबद्दल समाजाचे मत तयार होत असते. पण सेवा किंवा उत्पादनाचे महत्त्व पटवून देताना संहितालेखकाने अप्रत्यक्षपणे चुकीचा संदेश समाजापर्यंत पोहोचवता कामा नये. सध्याची स्वच्छ भारत अभियानाची जाहिरात म्हणजे खरी मर्दानगी कशात आहे, हा विषय अजूनही मोठमोठे दिग्गज अभिनेते, संहिता लेखक, निर्माते, दिग्दर्शकांनाही समजला नसल्याचे द्योतक आहे. मुळात स्त्री आणि पुरुष या लिंगाधारित संकल्पनांवरच घाव घालण्यासाठी म्हणजेच जेंडर इक्वॅलिटीवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना पुन्हा मर्द हा शब्द अधोरेखित करून नव्याने त्याची व्याख्या करण्याचा घाट या जाहिरातीतून विनाकारण घालण्यात आला आहे.

‘पिंक’ चित्रपटातही तीन अभिनेत्रींवरील संकट दूर करण्यासाठी धावून आलेला पुरुष अनेक समीक्षकांना खटकला होता. वकिलाच्या भूमिकेतील पुरुष हा केवळ योगायोग आहे, असे मानले तर महिलांनी काय करावे, काय करू नये, या सामाजिक संकेतांवर जोरदार हल्ला चढवण्याचे चांगले काम या सिनेमाने केले. पण स्वच्छ भारतच्या जाहिरातीत उघड उघडपणे मर्दानगीची अत्यंत बुरसटलेली व्याख्या सांगण्यापूर्वी बच्चनजींनी या संहितेतील संवादांचा एकदा तरी विचार करायला हवा होता.

मंजिरी काळवीट, औरंगाबाद
manjiri.kalwit@dbcorp.in
बातम्या आणखी आहेत...