आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘आप’लीच बायको...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

महागाई,भ्रष्टाचार, वशिलेबाजी, बेकारी, जातीपातीच्या राजकारणाला कंटाळून आम आदमी सत्ताधारी व सत्ताकांक्षी यांना सत्तेपासून दूर करण्याचा विचार करू लागला आहे. आणि असा निर्णय घेणे क्रमप्राप्त झाले आहे. शहरातील एका वॉर्डातील बहुसंख्य महिलांनी याच विचारसरणीतून ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले. गल्लीतल्या बायकांच्या ‘तू केले, मग मी का नको’ या विचारसरणीतून आम आदमीच्या टोप्या वाढत गेल्या. राष्ट्रीय पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या एका नगरसेवकाच्या बायकोचाही यात समावेश होता. आपल्या बायकोनेच ‘आप’चे सदस्यत्व स्वीकारले हे कळताच नगरसेवक भाऊने नव-याच्या पद्धतीने बाईवर रुबाब केला. सर्व ऐकून घेतल्यानंतर बाईनेपण भाऊला चांगलेच महिला राज दाखविले. नगरसेवक नव-यावर प्रश्नाचा एकच भडिीमार केला. ‘गेल्या अडीच वर्षांत आपल्या वॉर्डासाठी काय केले? आपल्या कार्यकाळात महिन्यातून किती वेळा गटारे साफ होतात? किती गोरगरिबांची कामे आपण केली? किती दाबाने नळाना पाणी येते?’ एक ना अनेक सार्वजनिक प्रश्नांबद्दल बाईने नव-यावर तोंडसुख घेतले. जातीपातीचे राजकारण करण्याचे दिवस आता गेलेत, असेही प्रखर शब्दांत सुनावले.
आठ दिवसांत वॉर्डातील सर्वच प्रश्न मार्गी लावले नाही तर मीच आपल्या विरोधात मोर्चा काढीन, धरणे धरेन, उपोषण करेन आणि एवढे करूनही नाही सुधारलात तर येत्या पंचवार्षिक निवडणुकीत मीच आपल्या विरोधात निवडणुकीला उभे राहीन, असा इशाराही बाईने दिला.
भाऊला 440 व्होल्टचा झटका चांगलाच लागला. काही वेळात भाऊला बायकांना नऊ सिलिंडर कमी पडू लागल्याचे स्वप्न पाहणारे राहुल गांधी दिसले. काही वेळात महाराष्ट्रात मुंडे विरोधात मुंडे गेल्याचे आठवले. दिल्लीतली राहुलविरोधातील मेनकाची प्रतिक्रिया आठवली. पण आपल्याच घरात आपल्याविरुद्ध बायको गेली तर काय, हा यक्षप्रश्न भाऊपुढे उभा आहे. भाऊला घरात आल्याबरोबर बायकोच्या डोक्यावर आम आदमीची टोपी दिसू लागली आहे. वॉर्डातील सर्वच महिला आता आम आदमीच्या टोप्या घातलेल्या दिसताहेत. भाऊनेही जुळवून घेण्याचे ठरविले आहे.
आपल्याच सत्ताधारी पक्षाच्या विरोधात जाऊन भाऊ आपल्या वॉर्डातील प्रश्नांना मार्गी लावण्याचा प्रयत्न करीत आहे. भाऊमधील संजय निरुपम जागा झाला आहे. वॉर्डातील बरेच प्रश्न मार्गी लागले आहेत. नव-याच्या कामावर बाईपण आता खुश आहे.
पण भाऊसमोर रोज वेगवेगळ्या पक्षांतील लोकांच्या प्रतिक्रिया पिंगा घालत आहेत. कधी भाजपचे शत्रुघ्न सिन्हा म्हणतात, ‘आप तो सबका बाप बनके उभर आया है.’ कधी भाऊला काँग्रेसचे जयराम रमेश आठवतात, तर कधी मनसेचे राज ठाकरे. श्रीगोंदा नगरपालिकेच्या निवडणुकीत बहुमतासाठी रात्रंदिवस घराघरात फिरणारे मंत्री बबनराव पाचपुतेंसारखी पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून भाऊ ईश्वराची प्रार्थना करीत आहे व आम आदमीला महत्त्व देऊ लागला आहे.