आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Manjusha Karmarkar Article About Young Girl Overcoming Poverty

स्वप्नपूर्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परवा शाळेतून घरी येताना नमिता भेटली. पोलिस कॉन्स्टेबलच्या वेशात. जवळपास 4-5 वर्षांनी भेटणा-या तिला पाहून मला खूपच आनंद झाला. नमिता आमच्याकडे वीस वर्षांपूर्वी पोळ्या करणा-या राधाबार्इंची मुलगी. राधाबार्इंना शिक्षणाची आस होती, त्यांनी तीन प्रयत्नांत दहावीची परीक्षा पास केली. रोज काम झाल्यानंतर अर्धा-पाऊण तास पेपरवाचन आणि त्यानंतर सामाजिक घडामोडींवर चर्चा हा त्यांचा नित्यक्रम. अशा जगावेगळ्या राधाबार्इंची नमिता ही मुलगी. तिला खूप शिकवायचं, स्वत:च्या पायावर उभं करायचं स्वप्न त्यांनी पाहिलेलं.


‘मॅडम, आईला बरं नाही थोडं, नाहीतर तिला घेऊन मीच आले असते तुमच्याकडे, तुम्हीच याल का? आईलाही खूप बरं वाटेल. मी तुम्हाला घ्यायला शनिवारी संध्याकाळी येते.’ तिच्या आर्जवाकडे पाहून मी नाही म्हणू शकले नाही. राधाबार्इंबद्दलही उत्सुकता होतीच. मी हो म्हणताच ती निघून गेली.


राधाबार्इंनी लहानपणीच नमिताला पोहण्याच्या क्लासला घातलं आणि तिने पोहण्यातलं कौशल्य सिद्ध केलंही. आठवीपासून ती माझ्या शाळेत, माझ्या वर्गातच होती. एके शुक्रवारी सरस्वती पूजनाच्या वेळी शाळेत भरजरी ड्रेस घातलेली नमिता पाहून मनात शंकेची पाल चुकचुकली. इतक्यात आईला बरं नसतं असं सांगत होती ही. मागच्याच आठवड्यात दोन-तीनदा शाळेत आली नाही. विचारलं तर आई आजारी आहे म्हणून घरी थांबावं लागलं, असं म्हणाली. फी नंतर भरेन म्हणाली, मग एवढा महागाचा ड्रेस हिच्याजवळ आला कुठून? नमिताला बाजूला बोलावून मी म्हटले, ‘छान आहे गं ड्रेस, कुठून घेतलास?’ माझ्या प्रश्नाचा रोख कळला असावा तिला. शेवटी राधाबार्इंचीच मुलगी नं ती! ‘मैत्रिणीचा आहे, तिने खूप आग्रह केला म्हणून आजच्यापुरताच घातलाय, आईला नाही माहीत. ‘नमिता, माझ्याकडे पाहून बोल, तू एका जिद्दी स्वाभिमानी आईची मुलगी आहेस, जिने तुझ्यासाठी खूप स्वप्नं पाहिली आहेत.’
नमिताच्या डोळ्यातील पश्चात्ताप मला ओळखू आला. आपल्या मुलीची शाळेची फीसुद्धा दुस-याला भरू न देणा-या आईची मुलगी ती! त्यानंतर शाळा सोडेपर्यंत नमिताला मला काहीही बोलावे लागले नाही. जिद्दीने, एकाग्रतेने अभ्यास करून तिने बारावी पास केली. स्विमिंग कोच म्हणूनही तिला बोलावणं आलं. हे सांगायला ती मला भेटली. ‘नमिता, आई जा म्हणते का?’ ‘हो, आई म्हणते, आलेली संधी सोडू नये, ती संधी आपल्याला पुढेच नेते, काही शिकवते पण.’ अशी ही नमिता मला चार-पाच वर्षांनी भेटली. ठरल्याप्रमाणे शनिवारी मला घ्यायला आली. जाताना भरभरून बोलत होती. ‘मॅडम, या आत, हे माझं घर. नव्हे माझ्या आईचं स्वप्न. नीट या हे इथून, पायाला लागेल नाहीतर.’ मधल्या खोलीत मला नमिताने बसवले. बाजूच्या पलंगावर एका अस्थिपंजर, लोळागोळा झालेले शरीर होते. मी आतल्या खोलीत राधाबार्इंना नजरेने शोधताना बघून पलंगावरच बसत नमिता म्हणाली, ‘आई, कोण आलं पाहिलंस का? तुझ्या वहिनी आणि माझ्या मॅडम, ओळखलंस नं?’


माझ्या पायाखालची धरणी दुभंगली, काही वर्षांपूवी धष्टपुष्ट शरीरयष्टी असणा-या, हस-या चेह-याच्या, याच का त्या राधाबाई? राधाबार्इंनी नजरेनेच मला ओळखलं, आजही त्यांना खूप बोलायचं होतं, नि:शब्द असूनही त्या खूप काही सांगत असाव्यात असं मला वाटलं. ‘मॅडम, आईला सांगा, मी पुढच्या परीक्षा देणार आहे, पण तिला थोडं बरं वाटलं की.’ राधाबाई हलक्याशा हसल्यासारख्या वाटल्या. नमिताने चहाचा खूप आग्रह केला, पण मी तो नाकारला. 10-12 मिनिटं कशीतरी काढल्यानंतर, मी नकळत डोळ्यात येणा-या अश्रूंना थोपवण्याचा प्रयत्न करत होते, त्याच वेळी जीवनात येणा-या विपरीत प्रसंगांना तोंड देणा-या नमिताच्या करारी नजरेला नजर मिळवण्याची हिंमतही माझ्यात नव्हती. राधाबार्इंना तब्येतीची काळजी घ्या, असे म्हणून मी घराबाहेर पडले. मी नको नको म्हणत असूनही नमिता कोप-यापर्यंत माझ्यासोबत आली. ‘मॅडम, मी आईचं स्वप्न पूर्ण केलं. शिक्षण पूर्ण करून नोकरी मिळवली. तिने शिक्षण, संस्कार दिले, स्वाभिमानाने जगायला शिकवले. कधी-कधी माझाच माझ्याबद्दलचा विश्वास उडायचा, पण तिचा माझ्याबद्दलचा विश्वास ढळला नाही.’ ‘नमिता, एवढं सोसलंस एकटीने? आता कधी एकटं वाटलं तर नक्की येशील ना माझ्याकडे?’ माझ्या आर्जवाकडे पाहत नमिताने मान डोलावली. स्वाभिमानाची, संस्काराची मर्यादा न सोडणा-या, तरीही स्वप्नांची सीमा पार करणा-या त्या जिद्दी मुलीकडे मी बघत राहिले, अनिमिष नेत्रांनी!